तरुण भारत

परिवर्तनाचा खंदा सेनानी- बाळासाहेब जाधव

महाराष्ट्रात घडणाऱया विविध परिवर्तनवादी चळवळींना बाळासाहेबांनी केवळ उचलूनच धरले नाही तर वैचारिक नेतृत्वही दिले. आपल्या शक्तीचा वापर विधायक कामांसाठी करून घेतला. महापूर, दुष्काळ, किल्लारीचा भूकंप अशा सार्वजनिक आपत्तींमध्ये निधी उभारून पुनर्वसनाची कामे उभी केली.

आपल्या वृत्तपत्राचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिवर्तनासाठी माध्यम म्हणून उपयोग करून उदंड कार्य उभे करणाऱया संपादकांची मांदियाळीच स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात उभी राहिली. स्वातंत्र्यानंतर हा समृद्ध, तेजस्वी वारसा चालविणारे जे मोजके संपादक आपल्याला दिसतात त्यामध्ये ‘पुढारी’कार प्रतापसिंह जाधव यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. गेल्या 40-45 वर्षात बाळासाहेबांनी परिवर्तनाचा ध्यास घेऊन जी प्रचंड कामे उभी केली, त्यामधून हा वारसा सिद्ध झाला आहे.

Advertisements

सुदैवाने बाळासाहेबांना दोन प्रकारचा वारसा लाभला. पहिला वडिलांचा आणि दुसरा सामाजिक परिवर्तनाचे मानबिंदू असणाऱया राजर्षी शाहू महाराजांचा. त्यांचे वडील व ‘पुढारी’चे संस्थापक डॉ. ग. गो. जाधव यांना महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महान नेत्यांचा निकट सहवास लाभला होता. डॉ. आंबेडकरांच्या नाशिकच्या काळाराम सत्याग्रहात आणि महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात ते सहभागी होते. एक दशक सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला स्वातंत्र्य आंदोलनात आणि सामाजिक परिवर्तनात आणण्यात त्यांचा वाटा मोठा. या क्रांतिकारी संस्कारातच बाळासाहेब वाढले. महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी चळवळींना ‘पुढारी’ने वैचारिक नेतृत्वही दिले. ‘एक गाव, एक पाणवठा’सारखे आंदोलन बाबा आढावांनी जरी पुणे जिह्यात सुरू केले तरी त्याची सर्वाधिक चर्चा ‘पुढारी’तून झाली. देवदासींचा प्रश्न तर कोल्हापुरात महत्त्वाचा. या प्रथेतील सामाजिक अन्याय आणि स्त्राr स्वातंत्र्याची गळचेपी हे सारे ‘पुढारी’ने उघडे पाडले. त्यामधून देवदासी निर्मूलन आंदोलन उभे राहिले आणि शेवटी सरकारला कायदा करावा लागला. हे सर्व करीत असताना बाळासाहेबांची भूमिका शोषणविरोधी होती, धर्मविरोधी नव्हती. म्हणूनच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जोतिबा परिसराच्या विकासाचा प्रश्न त्यांनी आपला मानला. परिसर विकास निधी समितीचे ते अध्यक्ष झाले. सरकारी यंत्रणेचा वापर न करता परिसर विकासाची कल्पना त्यांनी मांडली.

महापूर, दुष्काळ, किल्लारीचा भूकंप अशा सार्वजनिक आपत्तींमध्ये निधी उभारून विविध परिसरात पुनर्वसनाची कामे उभी केली. गुजरातमधील भूज व कच्छ या भूकंपात तर त्यांनी एक कोटी रुपये जमा केले. या सर्वांवर सोन्याचा कळस चढला तो कारगील युद्धात ‘आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा’करिता ‘पुढारी’च्या माध्यमातून अडीच कोटी रुपये जमा झाले.

राजर्षी शाहू महाराज हे केवळ करवीरचे नव्हे तर देशभरातील समतावादाचे दैवत. 1974 मध्ये राजर्षींची जन्मशताब्दी सरकारी पातळीवर साजरी करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी बाळासाहेबांच्या पुढाकाराने कोल्हापुरात समिती स्थापन झाली. बाळासाहेबांना या निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांचे एखादे कायमस्वरूपी स्मारक व्हावे असे वाटत होते. त्यांनी पुन्हा निधी जमविला तो 51 लाखांचा. या निधीतून राजर्षी शाहू ट्रस्ट आणि राजर्षी शाहू स्मारक भवन याची उभारणी झाली.

महाराष्ट्राच्या विधान भवनात अनेक नेत्यांचे पुतळे होते. पण शाहू महाराजांचा पुतळा नव्हता. बाळासाहेबांनी हा विषय लावून धरला. 4-5 वर्षांच्या अथक प्रयत्नातून अखेर 27 मे 2003 रोजी या पुतळ्याचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. मी तेव्हा मुख्यमंत्री असल्याने मलाही या सोहळ्यात सहभागी होता आले. दिल्लीत संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा हवा, असा विषय पुढे आला तेव्हा मी पुतळ्याचा खर्च राज्य सरकार करेल, असे सांगितले. कारण तो केवळ आमचाच नव्हे तर राज्याच्या अभिमानाचा विषय होता.

कोल्हापूरचे नवे गॅझेटियर 1990 मध्ये प्रकाशित झाले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांची बदनामी करणारा व तत्कालीन समाजाबद्दल चुकीची माहिती देणारा मजकूर आहे हे प्रथम ‘पुढारी’ने शोधून काढले. इतिहास तज्ञ अनंतराव करवीरकर यांचा परखड लेख तर त्यांनी प्रकाशित केलाच. शिवाय तीन खणखणीत अग्रलेख लिहून सर्वांचे या विषयाकडे लक्ष वेधले. यामधून एक मोठा लोकलढा उभा राहिला. संपादक मंडळ बरखास्त झाले. वादग्रस्त मजकूर वगळला गेला. नवीन संपादक मंडळ आले. नवा सुधारित मजकूरही तयार झाला. एवढे सगळे घडूनही गॅझेटियरची अंतिम छपाई होत नव्हती. मला कोल्हापुरात भाई माधवराव बागल पुरस्कार 9 ऑक्टोबर 2003 रोजी दिला गेला. तेव्हा हे प्रकरण माझ्यासमोर आले. मुख्यमंत्री म्हणून मी आदेश देऊनही अनेक अडचणी येत होत्या. त्या दूर करीत आम्ही अखेर नवे गॅझेटियर प्रसिद्ध केले. 26 जुलै 2004 रोजी याचा लोकार्पण सोहळा बाळासाहेब जाधव यांच्याच हस्ते झाला. ‘पुढारी’तून बाळासाहेबांनी आणखी एक विषय उपस्थित केला तो शाहू महाराजांच्या खऱया जन्मतिथीचा. ऍड. मानसिंग खांडेकर यांनी ‘पुढारी’त चिकित्सक लेख लिहून या विषयाला वाचा फोडली. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्याची पूर्ण शहानिशा केल्यावर भाई बागल विद्यापीठाने जन्मतारीख बदलण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला. शाहू जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यास मीच सुरुवात केली होती. साहजिकच मी या प्रस्तावावर कार्यवाही सुरू केली. दरम्यानच्या विधानसभा निवडणुका, नवे सरकार हे अडथळे पार करीत त्याला अखेर मान्यताही मिळाली. बाळासाहेबांनी गेल्या 50 वर्षात संपादक म्हणून सामाजिक परिवर्तनाची आणि अन्याय निवारणाची मोठी कामे केली, लढे उभारले. ‘परिवर्तनाचा खंदा सेनानी’ अशी त्यांची प्रतिमा त्यातून उभी राहिली आहे.

बाळासाहेब जाधव, माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख आणि मी आम्ही तिघे समकालीन. मला बाळासाहेबांची सर्वधर्मसमभावाची वृत्ती मनापासून आवडते.   ‘पुढारी’कारांनी शाहू महाराजांच्या विचारांच्या ध्वजवहनाची परंपरा समर्थपणे सुरू ठेवली आहे. ती अखंडपणे सुरू राहील, हा माझा विश्वास आहे आणि यासाठीच मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो!

सुशीलकुमार शिंदे    

Related Stories

यक्षप्रश्न!

Omkar B

कृष्ण कुलदैवत एक

tarunbharat

इतुके दोष माझ्या ठायीं

Patil_p

मोदींची सप्तपदी

Patil_p

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाणी संकट!

Patil_p

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p
error: Content is protected !!