तरुण भारत

काका-बाबांची दिलजमाई ही परिवर्तनाची नांदी

साताऱयासह देशात काँग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी सज्ज व्हा-प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱया कराडमध्ये विलासकाका उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांची झालेली दिलजमाई ही परिवर्तनाची नांदी आहे. यातून केवळ कराडच नव्हे तर सातारा जिल्हय़ात काँग्रेस बळकट होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात संदेश जाणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हय़ासह महाराष्ट्रात व देशात काँग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

येथील पंकज लॉनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी अपूर्व उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रीमती सोनल पटेल, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या उपस्थितीत  काका व बाबा गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हय़ात काँग्रेसचा विचार बळकट करण्याचा निर्धार केला. दोन्ही नेते बऱयाच वर्षांनी एकत्र आल्याने प्रचंड जोशपूर्ण वातावरणात मेळावा पार पडला.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. शेतकऱयांना चार पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली की निर्यातबंदीचे धोरण केंद्र सरकारने आणले. केंद्राने केलेले तीन कायदे शेतकरी विरोधी आहेत. यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आणलेली बाजार समित्यांची व्यवस्था मोडून काढण्याचा तसेच धनदांडग्यांना स्वस्तात शेतमाल खरेदी व साठा करून टंचाई करण्याचा डाव आहे. यातून शेतकरी मोडीत काढण्याचे षडयंत्र आहे. हे कायदे धनदांडग्यांच्या हिताचे व बहुजनविरोधी आहेत. माणसामाणसात भेद करायचा आणि सत्ता मिळवायची हे धोरण आहे. भाजपच्या राज्यात अर्थव्यवस्था डबघाईला आली असून यात फसून चालणार नाही. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून सुरूवात करावी.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशात धर्मावर आधारित हुकूमशाही आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असून यात काँग्रेस विचारांचा अडथळा येत आहे. यासाठीच काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात संपवून टाकण्याचा प्रयत्न मोदी-शहा आणि फडणवीस-चंद्रकांतदादा या जोडीने केला. महाराष्ट्रात फडणवीस सत्तेत आले असते तर त्यांनी हेच केले असते. त्यामुळे काँग्रेसचा विचार बळकट करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या एकत्रीकरणाने संपूर्ण सातारा जिल्हय़ाची राजकीय दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेत ट्रम्प यांच्या हुकूमशाहीचा पराभव झाला असून भारतातही लोक हुकूमशाही विचार सहन करणार नाहीत. जिल्हय़ात दोन्ही गटात काही काळ संघर्ष झाला. आता एकत्र काम करण्याचे ठरले आहे. बाळासाहेब थोरात यांनी आशीर्वाद द्यावेत. जिल्हय़ात दोन्ही गटाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे संधी मिळेल.

विलासराव उंडाळकर म्हणाले की, देश आर्थिक, सामाजिक अडचणीत आहे. विरोधक जे मुद्दे मांडतात. तेच काँग्रेस कार्यकर्ते मांडत आहेत. त्यांचे प्रबोधन होत नाही. नोटबंदीने देश उद्ध्वस्त झाला. शेतकरी विरोधी कायदे केले. ते आक्रोश करत आहेत. मात्र तो केंद्राला ऐकू जात नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला शिबिरांशिवाय पर्याय नाही. एकेकाळी महाराष्ट्र हे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मोहोळ होते. ते उडून गेले. आम्ही ज्यांना खाऊ घातले, तेच निघून गेले. धर्माच्या नावाने राजकारण करून तुमची पोटे भरणार नाहीत. मात्र मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो, महाराष्ट्र पुरोगामीच राहिल. जातियवाद्यांचा होणार नाही. काँग्रेसमध्ये आता बेरजेचे राजकारण होणे गरजेचे आहे. जे गेलेत, त्यांना परत बोलवा. मंत्रिपद दुय्यम मानून हे करावे लागेल. शिबिरांची परंपरा पुन्हा सुरू करावी लागेल. काँग्रेस विचारधारा हे आमचे ऍसेट आहे. नवीन जिल्हाध्यक्षांचा पायगुण चांगला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

उदयसिंह पाटील म्हणाले की, प्रांत, धर्म, राष्ट्रवादाच्या जोरावर देशात राजकारण सुरू आहे. आज लोक याच्या मागे लागले असून काँग्रेसचा विचार विसरले आहेत. आम्ही हा विचार स्वीकारला असता तर सत्ता मिळाली असती. मात्र वाडवडिलांकडून मिळालेले काँग्रेस विचारांचे ऍसेट मिळाले नसते. आज नैतिकतेच्या जोरावर इथे उभा आहे. बाबा आमच्याबरोबर आहेत. मात्र पक्षाने ताकद देण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी गट विसरून जिल्हय़ात पक्ष मजबुतीसाठी सक्रीय व्हावे. जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांचेही भाषण झाले.

तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आभार मानले.

उदयसिंह पाटील यांना प्रदेशमध्ये संधी देणार

विलासकाका आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे आशीर्वाद घेऊन उदयसिंह पाटील हे काँग्रेस पक्षात सक्रीय होत आहेत. मात्र काँग्रेस आणखी ताकदवान करण्यासाठी त्यांना प्रदेश काँग्रेसवर संधी देणार आहे. सातारा जिल्हय़ासह त्यांनी अन्य जिल्हय़ातही संघटनेचे काम केले पाहिजे. ही जबाबदारी त्यांनी पार पाडावी. यापुढे त्यांना विश्रांती नाही. या जबाबदाऱयांतूनच त्यांचे व्यक्तिमत्व फुलत जाईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

प्रांताध्यक्षाचा मुलगा कमळ घेऊन आला, दुसरा राईट हॅण्ड कुठे गेला?

माजी मुख्यमंत्री फडणवीस कराडजवळच्या एका हॉटेलात मुक्कामी होते. त्यावेळी त्यांना भेटायला काँग्रेसच्या नेत्यांची रांग लागली होती. माजी प्रांताध्यक्षांचा मुलगा, बाबांचा राईट हॅण्ड गेला आणि कमळ घेऊन आला. दुसरा राईट हॅण्ड कुठे गेला? हे कळलेच नाही, असा टोला विलासकाकांनी आपल्या भाषणात लगावला.

Related Stories

कोल्हापूर एमआयडीसी १६ मे पासून आठ दिवस राहणार बंद

Abhijeet Shinde

शिरोळमध्ये विनाकरण फिरणाऱ्यांवर कारवाई

Abhijeet Shinde

पालिका कर्मचाऱयांचा संप घेतला मागे

Patil_p

साखळय़ा तोडण्याचे आव्हान

Patil_p

कबनूर ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करावी : शिवसेना

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,011 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!