प्रतिनिधी/ मडगाव
सांकवाळ येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती संध्या सुभाष नाईक (56) यांचे काल शनिवारी सकाळी मडगावच्या इएसआय कोविड हॉस्पिटलात दुःखद निधन झाले. शनिवारी सायंकाळी मडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग झाल्याने, त्यांना अगोदर नव्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना इएसआय कोविड हॉस्पिटलात स्थलांतरीत करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असतानाच काल सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्या शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य स्व. सुभाष यशवंत नाईक यांच्या पत्नी तसेच डॉ. सितम योगेश नाईक (सांकवाळ), संकेत नाईक यांच्या आई. तर युवांश नाईक यांच्या आजी होत. श्रीमती सविता मोहन रेडकर यांची मुलगी, संदीप (दै. तरूण भारतचे क्रीडा प्रतिनिधी) आणि श्रीधर (दिकरपाल-नावेली) यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या.
संध्या सुभाष नाईक या गेली 31 वर्षे शिक्षकी पेशात कार्यरत होत्या. गेल्या सहा वर्षापासून शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून त्यांनी योगदान दिले होते. हायस्कूल स्थरावर त्या ‘गणित’ शिकवायच्या तर उच्च माध्यमिक मध्ये ‘अकाऊन्टन्सी’ विषय शिकवित होत्या. विद्यार्थी प्रिय शिक्षिका अशी त्याची ओळख होती. सांकवाळ सारख्या भागात असंख्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले होते. काल, सकाळी त्यांच्या दुःखद निधनाचे वृत्त मिळताच सांकवाळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या विद्यार्थ्यांना देख्नील धक्काच बसला.