तरुण भारत

पर्यटन हंगाम सुरू, मात्र सावधगिरी हवी

आता पर्यटन हंगाम सुरू झाला असून दिवाळीचा सणही आला आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेची शक्यताही वर्तवली गेली आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून सावधगिरी बाळगायला हवी.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात कोरोनाचा जोर ओसरला आहे. सर्व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. आता तर पर्यटन हंगाम सुरू झाला असून दिवाळीचा सणही आला आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेची शक्यताही वर्तवली गेली आहे. अशा परिस्थितीत गेले आठ महिने बेक लागलेल्या पर्यटन व्यवसायाला चालना देत असताना कोरोनाची लाट रोखण्यासाठी मात्र कोरोनापासून सावधगिरी बाळगायला हवी.

Advertisements

मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जाहीर केली. या टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसायावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ातील पर्यटनाला मोठा फटका बसला होता. मार्चपासून टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे एप्रिल, मे या दोन्ही महिन्यातील पर्यटनाचा हंगाम चुकला. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ातील पर्यटन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. किनारपट्टीवरील सर्व गजबज थांबली होते. हॉटेल व्यावसायिकांनाही त्याची मोठी झळ पोहोचली. त्यानंतर आता राज्य शासनाने जून महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करायला सुरुवात केली. मात्र पावसाळी हंगाम सुरू होता. त्यामुळे पर्यटकही येऊ शकत नव्हते. तसेच हॉटेल सुरू करण्यासही परवानगी नव्हती. ऑक्टोबरपासून हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता हळूहळू पर्यटन व्यवसायाला चालना मिळू लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने आणि सिंधुदुर्गातील तारकर्ली हे पर्यटन स्थळ जागतिक स्तरावर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटक येत असतात. रत्नागिरी जिल्हय़ातही गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दोन्ही जिल्हय़ात दरवर्षी लाखोंनी पर्यटक येत असतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यात पर्यटन व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. आता आठ महिन्यानंतर दोन्ही जिल्हय़ातील कोरोनाची परिस्थिती निवळू लागली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ात आता पर्यटन व्यवसायाला संधी प्राप्त झाली आहे. मात्र हा पर्यटन व्यवसाय करीत असताना कोरोनापासूनची सावधगिरी तेवढीच बाळगावी लागणार आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांनीच पुढे येत ‘जनता कर्फ्यू’ लागू केला, तर राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविली. त्यामुळे दोन्हींचा प्रभाव चांगला पडून कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झाले. दोन्ही जिल्हय़ात कोरोनाची स्थिती निवळली असून जनजीवन पूर्ववत सुरू झाले आहेत. या दोन्ही जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा जोर ओसरला असला तरी कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने गाफिल न राहता खबरदारी घेणे आवश्यकच आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे कोरोना मुक्तीकडे वाटचाल करू लागले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्हय़ात आता पर्यटकही येऊ लागले आहेत. टाळेबंदीमुळे गेले आठ महिने पर्यटनाला ब्रेक लागला होता. परंतु, आता टाळेबंदी शिथिल झाली आहे. कोरोनाही कमी झाला आहे. अशा स्थितीत दोन्ही जिल्हय़ातील हॉटेल्स खुली झाली आहेत. किनारपट्टीवर पर्यटकांची गजबज सुरू झाली आहे. पर्यटन हंगामही सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात पर्यटक आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध पाळण्याची गरज आहे. दिवाळीचा सण आणि त्यानंतर थंडी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू होणार असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पर्यटन हंगामाचा फायदा घेत असताना प्रत्येक पर्यटक व्यावसायिक, हॉटेल, लॉज व्यावसायिक यांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी मास्क वापरणे, हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे हा त्रिसूत्री मंत्र दिला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोर होणे आवश्यक आहे. तरच पर्यटन हंगामामध्ये पर्यटन व्यवसाय करताना कोरोनाची दुसरी लाट परतवून लावणे शक्य होणार आहे.

कोकणातील दोन्ही जिल्हय़ात दिवाळीनंतर गावोगावी जत्रोत्सव भरवले जातात. या जत्रोत्सवांमध्ये मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोका जत्रोत्सवांमध्येही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जत्रोत्सव हा पारंपरिक उत्सव असला, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालून कोरोना रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करायला हव्यात. तरच दोन्ही जिल्हे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू शकतात. अन्यथा जत्रोत्सव आणि पर्यटन हंगामातील जिल्हय़ाबाहेरून येणाऱया पर्यटकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढून कोरोनाचे संकट ओढवले जाऊ शकते. अशा परिस्थितीत कोरोना निर्मूलनासाठी जी नियमावली घालून दिली आहे, त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करायला हवे. निष्काळजीपणा न करता आपल्यापासून दुसऱया व्यक्तीला कोरोनाचा धोका निर्माण होणार नाही आणि आपणही दुसऱया व्यक्तीपासून बाधित होणार नाही, याची काळजी घेतल्यास पर्यटन हंगामातून चांगला व्यवसाय करता येईल.

आता टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नागरिकही बाहेर पाडू लागले आहेत. गेल्या काही दिवसात दोन्ही जिल्हय़ांमध्ये पर्यटकांचा ओघ हळूहळू सुरू झाला आहे. आता तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही गर्दी होऊ लागली आहे. आठ महिन्यांच्या टाळेबंदीमुळे विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी पर्यटन व्यवसाय चांगला व्हायला हवा किंवा बाजारपेठांमधील व्यावसायिकांनाही चांगला व्यवसाय व्हायला हवा, हे जरी खरे असले तरी कोरोनापासूनची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. तरच चांगला पर्यटन हंगाम जाईल आणि कोरोनापासूनही कोकणी जनता बचाव करू शकेल.

संदीप गावडे

Related Stories

हरिभक्ती कशी करावी

Patil_p

काही तरी शिजतंय…

Patil_p

कोरोना-मानवी जीवनावर बहुआयामी परिणाम

Patil_p

सखुबाई आणि डॉक्टर

Patil_p

महादेव कृष्णस्तुती गातात

Omkar B

सिंहप्रेत पडिलें आहे

Patil_p
error: Content is protected !!