तरुण भारत

जीवघेणी चुरस…अखेर रालोआच सरस

बिहारमध्ये मध्यरात्रीनंतरही मतमोजणी : सत्ताधारी आघाडीला 125 जागांसह पुन्हा बहुमत

वृत्तसंस्था / पाटणा

Advertisements

प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढविणाऱया बिहारच्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या लढाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 125 जागा मिळवत बहुमत प्राप्त केले. या आघाडीला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील 5 पक्षांच्या ‘महागठबंधन’ने अत्यंत कडवी लढत शेवटच्या क्षणापर्यंत दिली. तथापि या आघाडीचा प्रवास 110 जागांवर थांबला. अशा प्रकारे सलग चौथ्यांदा या राज्यात रालोआच प्रभावी ठरली.

या निवडणुकीचा शेवटचा परिणाम मध्यरात्री 3.30 नंतर घोषित करण्यात आला. 243 पैकी किमान 35 जागांवर दोन्ही आघाडय़ांमध्ये अगदी शेवटच्या काही मतगणना फेऱयांपर्यंत स्पर्धा होती. प्रत्येक फेरीनंतर पुढाव्यामध्ये फेरफार होत स्पर्धकांचा जीव खालीवर होत होता. शेवटच्या मतगणना फेरीत 1000 हून कमी अंतर राहिलेल्या 16 जागा होत्या. यापैकी 8 रालोआने तर 8 महागठबंधनाने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेवटपर्यंत परिणामांचे चित्र स्पष्ट नव्हते. भाजपचे नंदकिशोर यादव, राजदचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, त्यांचे बंधू तेजप्रताप यादव, नितीशकुमार मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या निवडणुकीत यशस्वी झाले आहेत.

 त्याचप्रमाणे 8 मंत्र्यांना पराभवाचे तोंडही पहावे लागले आहे. एकंदर सत्ताधाऱयांसाठी ही निवडणूक संमिश्र यशाची ठरली आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिलेले नेते आणि माजी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव यांना राजदच्या तिकीटावर पराभव पत्करावा लागला तर काँगेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या शरद यादव यांच्या कन्येचाही पराभव झाला.

जवळपास समान मते

रालोआला या निवडणुकीत 36.2 टक्के मते पडली. तर महागठबंधनही 35.8 टक्के मतांसह विजयी आघाडीच्या अगदी नजीक पोहचले होते. ऐनवेळी बिहारमधील रालोआतून बाहेर पडून स्वतंत्ररित्या निवडणूक लढविलेल्या चिराग पास्वान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा दारूण पराभव झाला असला तरी त्या पक्षाला 1 जागा आणि 5.3 टक्के मते मिळाली आहेत.

डावे, एमआयएमचे बळ वाढले

हैदराबाद येथे प्रभाव असणारा इतेहादुल मुसलमीन या असदुद्दिन ओवैसी यांच्या नेत्वृत्वातील पक्षाने बिहारमधील सीमांचल प्रदेशातील काही मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. या पक्षाचे पाच उमेदवार विजयी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पक्षाला 1.25 टक्के मते मिळाली. तसेच डाव्या पक्षांनीही महागठबंधनाचा भाग म्हणून मैदानात उतरून 29 पैकी 16 जागा जिंकत मोठे यश संपादन केले. सीपीआयएमएलने 12, सीपीआयएम ने 2 तर सीपीआयने 2 जागांवर विजय मिळविल्याचे स्पष्ट झाले.

अधिक उंचावला मोदींचा मान

या निवडणूक प्रचाराची धुरा रालोआने नितीशकुमार यांच्यावर सोपविली असली तरी नरेंद्र मोदींच्या झंझावाती प्रचारामुळे वातावरण रालोआच्या बाजूने फिरले, असे स्पष्ट होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नितीशकुमारही मोदींवरच अधिक अवलंबून राहिले, असे निरीक्षण अनेक पत्रकारांनी नोंदविले आहे. नितीशकुमारांना पंधरा वर्षांच्या प्रस्थापित विरोधी भावनांचा सामना करावा लागला. तसेच कोरोनामुळे विविध राज्यांमधून परतणाऱया कामगारांचा प्रश्न, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न अशा अनेक अडचणींमुळे वातावरण प्रारंभी राज्य सरकारच्या विरोधात होते. तथापि, मोदींच्या प्रभावामुळे या नाराजीचे रूपांतर रालोआच्या पराभवात झाले नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मणीपूर आणि तेलंगणा आदी राज्यांमधील 59 पोनिवडणुकांमध्येही भाजपने 40 जागा जिंकून मोठे यश प्राप्त केले. यामुळे पंतप्रधान मोदींची राष्ट्रीय लोकप्रियता आणखी वाढली आहे.

तेजस्वी यादवांचे स्पृहणीय यश

राजदचे नेतृत्व करताना आपल्या पहिल्याच मोठय़ा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या प्रचारामुळे राजद हा 75 जागांसह या निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरला. तसेच या पक्षाला सर्वाधिक 23.2 टक्के मतेही मिळाली. या निवडणुकीवर आपला ठसा त्यांनी अशाप्रकारे उमटविला. आजही त्यांना त्यांचे वादग्रस्त पिता लालू प्रसाद यादव यांच्या छायेत रहावे लागते. तरीही त्यांनी ज्याप्रकारे रालोआला कडवी झुंज दिली, त्यावरून त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे मतही अनेक जाणकारांनी व्यक्त केले.

काँगेसच्या पदरी पुन्हा अतिनिराशा

मोठय़ा उमेदीने महागठबंधनाचा भाग म्हणून या निवडणुकीत उतरलेल्या काँगेसला पुन्हा एकदा मतदारांनी दणका दिला आहे. काँगेसचे 70 उमेदवार होते. त्यापैकी केवळ 19 विजयी होऊ शकले. भाजप आणि काँगेस यांच्यात 36 मतदारसंघांमध्ये थेट लढत होती. त्यापैकी 32 जागांवर भाजप विजयी झाला. त्यामुळे अद्यापही उत्तर भारतातील थेट लढतीत काँगेस भाजपसमोर कमजोर आहे हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. महागठबंधनात काँगेसने तिच्या सामर्थ्यापेक्षा जास्त जागा लढविल्या पण अतिशय कमी जिंकल्या. यामुळे महागठबंधनाचे मोठे नुकसान झाले असे तज्ञांचे मत आहे. ही बाब या पक्षासाठी चिंताजनक आहे.

काँगेसशी युती म्हणजे अपयश ?

गेल्या काही वर्षांमध्ये काँगेसशी युती करून निवडणूक लढविणाऱया पक्षांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने काँगेसशी युती केली. पण दारूण पराभव पत्कराला लागला. आंध्र प्रदेशातील नेते चंद्राबाबू नायडू यांनीही तेलंगणातील विधानसभा निवडणूक काँगेससह लढविली. तेथेही असेच घडले. कर्नाटकात काँगेस आणि निजद यांनी एकत्रितरित्या लोकसभा निवडणूक लढविली. पण या युतीला 28 पैकी अवघ्या 2 जागा मिळाल्या. आता बिहारमध्येही हाच अनुभव आहे. त्यामुळे भविष्यात काँगेसशी युती करण्यास इतर पक्ष तयार होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे निरीक्षण अनेक तज्ञांनी प्रसारमाध्यमांवर व्यक्त केले.

चिराग पास्वान, ओवैसींची बिघाडी

बिहार रालोआतून बाहेर पडलेले चिराग पास्वान आणि मुस्लीम बहुल भागांमध्ये निवडणूक लढविलेले असदुद्दिन ओवैसी यांनी अनुक्रमे रालोआ आणि महागठबंधन यांचा अनेक मतदारसंघांमध्ये घात केला असे काही तज्ञांचे मत आहे. पास्वान यांच्यामुळे रालोआचा किमान 30 जागांवर पराभव झाला. यात दोन मंत्रांचाही समावेश आहे. तर ओवैसी यांनी मुस्लीम मतांमध्ये विभागणी केल्याने महागठबंधनाला किमान 10 जागा गमवाव्या लागल्या असाही मतप्रवाह आहे.

बिहारमधील पक्षीय बलाबल, मते

एकंदर जागा 243

रालोआ 125 (भाजप 74, संदज 43, हम 4, विइपा 4)

महागठबंधन 110 (राजद 75, काँगेस 19, डावे पक्ष 16)

एमआयएम 5

बसप 1

लोजप 1

अपक्ष 1

Related Stories

भारत – चीन ‘एलओसी’वर गोळीबार

Patil_p

‘पीएसएलव्ही-सी 51’चे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

प्रेमविवाहाने त्रस्त, रेल्वेमार्गाची तोडफोड

Patil_p

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 3,18,695 वर 

pradnya p

पंजाब : 802 नवे कोरोना रुग्ण; 31 मृत्यू

pradnya p

येस बँकप्रकरणी अंबानींना समन्स

tarunbharat
error: Content is protected !!