वार्ताहर/ हुबळी
धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवरील सुनावणी धारवाड तृतीय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने पुन्हा लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे जामीन याचिकेवर 18 नोव्हेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
मागील आठवडय़ात मंगळवारी विनय कुलकर्णी यांनी वकिलांमार्फत न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी सदर याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआयला आक्षेप दाखल करण्यासाठी मुदत दिली. त्यामुळे सीबीआय अधिकारी कुलकर्णी यांच्या जामीनाविरोधात 18 ऑक्टोबर रोजी आक्षेप दाखल करतील. त्यानंतरच विनय कुलकर्णी यांना जामीन द्यावा का? याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.