तरुण भारत

दिवाळी सणांवर कोरोनाचे सावट

मडगाव बाजारपेठ सजली तरी…

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisements

दिवाळी सण हा गोव्यातील एक महत्वाचा सण. पण, यंदा या सणांवर कोरोना महामारीचे सावट आहे. मडगावची बाजारपेठ दिवाळी सणांसाठी सज्ज झाली तरी लोकांकडून दरवर्षाप्रमाणे यंदा प्रतिसाद मिळत नसल्याच्या प्रतिक्रीया व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. कोरोनामुळे लोक खरेदीसाठी बाहेर पडण्याचे टाळत असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त झालेल्या आहेत.

दिवाळी सणांसाठी मिठाईची खरेदी ही सर्वाधिक होत असते. तसेच दिवाळीला नवीन कपडे खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, यंदा त्यात बरीच घट झालेली आहे. अनेकांनी ऑनलाईन खरेदीवर भर दिल्याने, त्यांचाही स्थानिक बाजारपेठावर परिणाम झालेला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱयां गेल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्याचा ही परिणाम झाल्याचे मत बाजारपेठेतून व्यक्त होत आहे.

मडगावचे न्यू मार्केट व गांधी मार्केट सद्या दिवाळी सणांसाठी आकाश कंदिल, गावठी पोहे, नरकासूराचे मुखवटे, फरसाण, विद्दूत रोषणाई यांनी सजली आहेत. पण, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने व्यापारी नाराजीचा सूर व्यक्त करतात. दरवर्षी दिवाळी सणांच्या खरेदीसाठी मडगावच्या या दोन्ही मार्केटात लोकांची तुफान गर्दी व्हायची. त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील व्हायची. पण, यंदा हे चित्र बाजारपेठेत दृष्टीस पडत नाही.

कपडे खरेदीवर 40 टक्के परिणाम

मडगावातील ‘क्रिस क्रोस’ या रेडिमेड गार्मेन्ट आस्थापनाचे मालक अनिल रहेजा म्हणाले की, कोरोना महामारीमुळे कपडे खरेदीवर जवळपास 40 टक्के परिणाम झालेला आहे. यंदा दिवाळीला 60 टक्केच व्यवसाय झाला असून तो समाधानकारक म्हणावा लागेल. गेल्या वर्षी दिवाळीच्या सणांला जो प्रतिसाद मिळाला होता, तो उत्स्फूर्त होता. यंदा तशी परिस्थिती नसली तरी ग्राहक खरेदीसाठी येतात हे महत्वाचे आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर हळूहळू परिस्थितीत सुधारणा झालेली आहे. परंतु, गेल्या वर्षाशी तुलना होऊ शकत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

नरकासूराच्या मुखवटय़ांना अल्प प्रतिसाद

यंदा कोरोना महामारीमुळे राज्यातील बहुतेक नरकासूर स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचा परिणाम नरकासूराच्या मुखवटे विक्रीवर झालेला आहे. मडगावच्या गांधी मार्केटातील विक्रेते उत्तम आजगांवकर म्हणाले की, पूर्वी जास्त प्रमाणे खरेदी करायला ग्राहक येत होते. यंदा मात्र कमी प्रमाणात नरकासूरांच्या मुखवटाची विक्री झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पुर्वी मुलांना लोक नरकासुर करायला देणगी देत होते. मुलांना मिळालेल्या देणगीतून मुले मुखवटे व नरकासुराला लागणारे इतर वस्तू खरेदी करुन नरकासुर तयार करत होते. यंदा कोरोनामुळे मुलांनी घरोघरी फिरून देणगी मिळविण्याचे बंद केलेले आहे.

यंदा कागदापासून आकाश पंदील करण्यावर भर

कोरोनामुळे यंदा प्लास्टीकपासून बनविण्यात येणाऱया आकाश कंदीलांची विक्री  करण्यात आलेली नाही. कारण, यंदा मुंबई येथून आकाश कंदील न आणता गोमंतकीयांनी कागदापासून तयार केलेल्या आकाश कंदीलांची विक्री करण्यावर भर दिलेला अशी प्रतिक्रीया आकाश कंदील विक्रेता योगेश कवळेकर यांनी व्यक्त केली आहे. लोकही आता कमी प्रमाणात बाजारपेठेत येत असून ज्या पद्धतीने ग्राहक अपेक्षित होते, तसे ग्राहक बाजारपेठत आलेले नाही. त्यामुळे विक्रीवर परिणाम झाल्याचे मत त्यांनी मांडले.

पोहे खरेदीवर ही परिणाम

आज कोरोनामुळे प्रत्येक व्यावसायिकाला त्रास झालेला आहे. त्यामुळे आपण निराश न होता जगण्याची गरज आहे. गावठी पोहे खरेदी करायला लोक मोठय़ा प्रमाणात येत नाही. दरवर्षी प्रमाणे जे नेहमीचे ग्राहक होते तेच पोहे खरेदी करायला येतात. देवावर भरोसा ठेऊन जगण्याची वेळ आलेली अशी प्रतिक्रीया गांधी मार्केटातील पोहे विक्रेता दामोदर नाईक यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

दुचाकी अपघातात पर्रात वयोवृद्ध ठार

Amit Kulkarni

भोम पंचायत क्षेत्रात बायोमेडीकल प्रकल्प नकोच-ग्रामस्थ ठाम

Amit Kulkarni

ज्येष्ठ साहित्यिक पु.शि.नार्वेकर निवर्तले

Amit Kulkarni

कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पा परिसरांत विजेचा लपंडाव

Amit Kulkarni

पंक्चरमुळे लॉकडाऊन ऑक्सिजनवाहू टॅकरला गावकरने दिला मदतीचा हात

Amit Kulkarni

कळंगूटचे माजी भाजपा अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांचा भाजपला रामराम

Amit Kulkarni
error: Content is protected !!