तरुण भारत

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता 2021 च्या अखेरीस

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

गोव्यात होणाऱया नियोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात काल गुरूवारी गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो येथील अधिकृत निवासस्थानी चर्चा केली. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची शिफारस यावेळी करण्यात आली.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांत गोवा ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस गुरुदत्त भक्ता, वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव जयेश नाईक, गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे, गोवा जलतरण संघटनेचे सचिव सुदेश नागवेकर, गोवा टेनिस संघटनेचे सचिव राजेंद्र गुदिन्हो, गोवा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष सुदेश ठाकूर व असोसिएशन ऑफ गोवा स्क्वॉशचे पंकज जोशी उपस्थित होते.

टोकियो ऑलिम्पिकनंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची शिफारस यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आली. गोवा ऑलिम्पिक भवन स्थापनेची गरज समजून घेऊन, हा महत्वाकांक्षी प्रकल्प बांधण्यासाठी गोवा ऑलिम्पिक संघटनेला जमीन देण्याचा विचार करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्याबरोबर आमची बैठक सकारात्मक झाली. राष्ट्रीय खेळांचे आयोजन ही गोव्याची प्रतिष्ठा आहे आणि आम्हाला हा निर्णय डिसेंबरमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेला पोहचविणे आवश्यक आहे. लवकरच परत एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत समवेत आमची बैठक होणार आहे. आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात आशावादी असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.

Related Stories

होल्डर, कॅम्पबेल यांची अर्धशतके

Patil_p

हैदराबादचा राजस्थानवर तडाखेबंद विजय

Patil_p

आयपीएलच्या विस्ताराला भरपूर वाव : राहुल द्रविड

Omkar B

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून उत्तर कोरियाची माघार

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये होणार

Patil_p

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा 20 जणांचा संघ

Patil_p
error: Content is protected !!