तरुण भारत

शिक्षक,पदवीधरमध्ये रंगणार बहुरंगी सामना

कोल्हापूर / कृष्णात चौगले

पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार निश्चित झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. फेसबुक, व्हॉटस्ऍप, ट्विटर आदी सोशल मिडियावरील प्रचारासह त्यांनी थेट भेटीगाठी सुरु केल्या आहेत. पण ज्यांना दोन्ही पक्षीय आघाड्यांकडून उमेदवारी मिळालेली नाही, अशा इच्छूकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. तर `एकला चलो रे’ च्या माध्यमातून अनेक इच्छूकांनी दोन ते तीन वर्षांपासून मतदार नोंदीबरोबरच संपर्क मोहिम कायम ठेवली आहे. त्यामुळे शिक्षक व पदवीधरसाठी बहुरंगी सामना रंगणार हे निश्चित झाले असून पक्षीय उमेदवारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

पदवीधर'मध्ये साडेतीन लाख, तरशिक्षक’ मतदारसंघात 72 हजार मतदार आहेत. अवघ्या 15 दिवसात पाच जिह्यात विखुरलेल्या या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उमेदवारांसमोर आव्हान आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होत असली तरी बंडखोरांचे मोठे आव्हान आहे. कोणता बंडखोर किती मतदान घेणार, आणि त्याचा कोणाला फायदा, तोटा होणार यावरच निकालाचा कौल अवलंबून आहे. महाविकास आघाडीत पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अरुण लाड (सांगली) तर महायुतीकडून भाजपचे संग्राम देशमुख (सांगली) यांच्यामध्ये कुस्ती रंगणार आहे. त्यामुळे पुणे विभागाची ही निवडणूक असली तरी पश्चिम महाराष्ट्र हा लढतीचा केंद्रबिंदू राहणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लाड यांच्याकडू सोशल मिडियाचा खुबीने वापर केला जात असून त्यांनी आघाडी घेतली आहे. त्या तुलनेत देशमुख हे सध्या पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. पण या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय संपादन केलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांच्या प्रचाराची रणनिती निश्चित केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सोशल मिडियावरील प्रचाराला दुय्यम स्थान देत थेट भेटीगाठीला प्राधान्य दिले जात असल्याचे समजते.

शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा.जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सोलापूरचे जितेंद्र पवार यांना आखाड्यात उतरवले आहे. त्यामुळे ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध सोलापूर अशी होणार असून पुणे, सातारा आणि सांगली जिह्यात प्रचाराला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून वीसहून अधिक उमेदवार इच्छूक होते. पण पक्षीय उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काहींनी माघार घेतली आहे. तर पाच वर्षांपासून मतदारसंघाचा दौरा करून मतदारांशी संपर्क ठेवलेल्या अनेक उमेदवारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. यामधील अनेक उमेदवार तगडे असल्यामुळे पक्षीय उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

    प्रचाराचे रान तापवण्याची जबाबदारी मंत्र्यांवर 

महाविकास आघाडीकडून शिक्षक व पदवीधर मतदारसंघात प्रचाराचे रान तापवण्याची मोठी जबाबदारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आहे. त्यांच्याकडून किती योगदान दिले जाते, आणि उमेदवार मतदारांपर्यंत कसे पोहोचतात ? यावरच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. तर महायुतीच्या उमेदवारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पाच जिह्यांतील स्थानिक नेत्यांची मदत होणार आहे.

       अनेक पक्षांची निवडणुकीत उडी 

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांबरोबरच बहुजन वंचित आघाडी, संभाजी ब्रिगेड, मनसे, माकप आदी अनेक पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

`शिक्षक’ निवडणुकीतील प्रचाराचे प्रमुख मुद्दे

-जुनी पेन्शन योजना लागू करणे
-शाळांचा टप्पा अनुदानाचा प्रश्न
-मुल्यांकन होऊन देखील जाचक अटींमध्ये अडकलेले शाळांचे अनुदान
-रखडलेली शिक्षक भरती
-भरती बंद असल्यामुळे अपुरे शिक्षकेतर कर्मचारी

     `पदवीधर'मधील प्रमुख मुद्दे
 • बेरोजगारी
 • बेरोजगार भत्ता
  -रखडलेली शासकीय नोकरभरती

Related Stories

मित्रास काहीतरी सांगितल्याच्या गैरसमजातून एकास मारहाण

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण शनिवारी, तयारी पूर्ण

triratna

वाहने -भाजी विक्रेते रस्त्यावर

triratna

जयसिंगपूर बाजार समितीमध्ये रेशीम कोष बाजारपेठ सुरू होणार

triratna

कोडोली सरपंचपदी शंकर पाटीलांची बिनविरोध निवड

triratna

अब्दुल लाट परिसरात राज्य उत्पादन शुल्क खात्याची मोठी कार्यवाही

triratna
error: Content is protected !!