अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र जाधव यांची माहिती : कॉलेज तात्पुरत्या स्वरुपात रत्नागिरीतच : 30 नोव्हेंबरला जागेचा प्रस्ताव पाठवणार
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजसाठी जागेचा प्रश्न प्रश्न मार्गी लागला आहे. कापडगाव येथे जागा निश्चित झाली असली तरी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी शहरातील सिव्हील हॉस्पीटल, मनोरूग्णालय व महिला रूग्णालय या तीन ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कामकाज सुरु करण्याची योजना आहे. मेडिकल कॉलेजची नवीन इमारत पूर्ण होईपर्यत सिव्हील हॉस्पीटल हाच केंद्रबिंदू असेल, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र जाधव यांनी दिली.
कापडगाव येथील जागा मेडिकल कॉलेजसाठी निश्चित करण्यात झाली आहे. पालकमंत्री अनिल परब यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत या जागेची पाहणीही केली आहे. मात्र या जागी विविध शासकीय प्रक्रिया, इमारत उभारणी व अन्य आवश्यक बाबींची रचना करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात सध्या उपलब्ध व्यवस्थेच्या माध्यमातूनच मेडिकल कॉलेज सुरु करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. सिव्हील हॉस्पीटल, महिला रूग्णालय आणि मनोरूग्णालय येथील सुविधांचा एकत्र विचार करता निकषाप्रमाणे या ठिकाणी मेडिकल कॉलेज तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याबाबत नियोजन सुरु आहे. तशा स्वरुपाचा प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत दिल्ली येथे नॅशनल मेडिकल सेंटरला पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. शैलेंद्र जाधव यांनी सांगितले.
या तीन रूग्णालयाचा सातबारा मेडिकल कॉलेजच्या नावावर करण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही निर्णय घेतले जात आहेत. सुरूवातीला कॉलेजसाठी आवश्यक परवानग्या घेण्याचे काम गतीमान करण्यात आले आहे. ही परवानगी मिळताच प्रत्यक्ष कार्यवाही वेगाने करण्यासाठी नियोजन सुरु असल्याचे सांगण्यात आले.