तरुण भारत

कोरोनामुळे सरकारी शाळांच्या पटसंख्येत वाढ

प्रतिनिधी/ बेळगाव

ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांनी कोरोनाच्या लढाईत सरकारी शाळांना पाठबळ दिले असून यामुळे सरकारी शाळांना पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात तब्बल 1806 विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला असून यामुळे सरकारी शाळा उपयुक्त ठरल्या असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाकाळात सरकारी शाळांकडून विद्यार्थ्यांना करण्यात येणारे मार्गदर्शन विचारात घेता आर्थिक कुवतीनुसार पालकांचा सरकारी शाळांकडे कल वाढला आहे. प्रामुख्याने पाचवीत 264 तर आठवीमध्ये 288 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे कोरोना महामारीत सरकारी शाळांना अच्छे दिन आले आहेत.

2020-2021 या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणगंगा सुरू आहे. मात्र यावेळी खासगी व्यवस्थापनाच्या शाळांकडून नियोजित तपशीलानुसार फी वसूल केली जात आहे. परिणामी आर्थिकदृष्टय़ा कमकुवत तसेच लॉकडाऊनमुळे नोकरी-व्यवसाय गमावलेल्या पालकांनी सरकारी शाळेची वाट धरली असून ही बाब सरकारी शाळांसाठी सकारात्मक ठरली आहे. इ. 1 ली पासून इ. 10 वीपर्यंतचे जिल्हय़ातील 1806 विद्यार्थी खासगीतून सरकारीत दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या ही पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची आहे. इ. 1 ली ते इ. 4 थी, इ. 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते इ. 10 वी हा शैक्षणिक स्तर विचारात घेता कनिष्ठ प्राथमिकमधून उच्च प्राथमिक अर्थात पाचवी व उच्च प्राथमिकमधून हायस्कूलमध्ये म्हणजे आठवीत दाखल होणाऱया विद्यार्थ्यांनी खासगीची वाट सोडत सरकारी शाळांचा मार्ग धरला आहे.

जिल्हय़ातील 954 मुले व 852 मुली सरकारी शाळांमध्ये दाखल झाल्या आहेत. यामुळे खासगीच्या आक्रमणात सरकारी शाळांच्या घटत चाललेल्या पटसंख्येला आधार मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सरकारी शाळांची पटसंख्या वाढली असून शाळास्तरावर उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिवाय पटसंख्या वाढल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून डिजिटल क्लासरूम तसेच विविध उपक्रम राबवित शाळांचा शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

Related Stories

खुनी हल्ला प्रकरणी विशाल चव्हाणला अटक

Patil_p

बसस्थानकासमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी

Patil_p

हनुमान नगर येथे मंदिरात चोरी

Patil_p

संकेश्वर शहर सीलडाऊन मुक्त

Patil_p

कॅम्प येथील पोलीस हवालदाराचे आजाराने निधन

Patil_p

बिग बॉस फेम सई लोकुर विवाहबद्ध

Patil_p
error: Content is protected !!