तरुण भारत

महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

वृत्तसंस्था / दुबई

दक्षिण आफ्रिकेत होणारी महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा तीन महिन्यांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला. आता ही स्पर्धा फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली जाणार आहे. 2022 मध्ये होणाऱया प्रमुख स्पर्धा तसेच खेळाडूंवरील कामाच्या ताणाचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आयसीसीने जाहीर केले.

आधीच्या नियोजनाप्रमाणे नोव्हेंबर 2022 मध्ये महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा घेतली जाणार होती. पण आता ती फेबुवारी 2023 मध्ये घेतली जाईल. यावर्षी ऑगस्टमध्ये आयसीसीने न्यूझीलंडमध्ये होणारी महिलांची वनडे विश्वचषक स्पर्धा 2021 ऐवजी 2022 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना महामारीच्या कारणास्तव हा निर्णय त्यांनी घेतला होता. तसेच 2022 मध्ये बर्मिंगहम येथे राष्ट्रकुल स्पर्धा होणार असून त्यात महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्याचे निश्चित झाले आहे.

‘आयसीसी कार्यकारिणी मंडळाने 2022 च्या अखेरीस होणारी महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकून 9-28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा जर लांबणीवर टाकली गेली नसती तर 2022 मध्ये तीन मोठय़ा स्पर्धा पहावयास मिळाल्या असत्या. जुलै 2022 मध्ये राष्ट्रकुल आणि नोव्हेंबर 2022 मध्ये महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा घेतली गेली असती. 2023 मध्ये सध्या तरी महिलांची कोणतीही मोठी स्पर्धा नियोजित नसल्याने मंडळाने टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळाडूंना तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल आणि महिला क्रिकेटला मिळालेला जोम पुढे नेता येणार आहे,’ असे आयसीसीने सांगितले. खेळाडूंवर पडणारा कामाचा भार आणि महिला क्रिकेटला दीर्घकाळ प्रोत्साहन देण्याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

बोल्ट, लॅथमच्या सहभागाबद्दलही साशंकता

Patil_p

हैदराबाद एफसी-बेंगलोर एफसी लढत गोलशून्य बरोबरीत

Patil_p

यजमान इंग्लंडचा डाव 204 धावांत खुर्दा

Patil_p

जर्मनीतील फुटबॉल लीग स्पर्धा मे अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न

Patil_p

कोरोना चाचणीत मोहम्मद आमीर निर्दोष

Patil_p

बार्सिलोनाचा फुटबॉलपटू कोरोना बाधीत

Patil_p
error: Content is protected !!