तरुण भारत

एटीके बागानची विजयी सलामी

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

आयएसएल सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत काल गतवर्षीय विजेता एटीके मोहन बगानने विजयाची सलामी देताना केरळ ब्लास्टर्सचा एकमेव गोलने पराभव केला. बांबोळी ऍथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यातील विजयी गोल सामन्याच्या 67व्या मिनिटाला त्यांचा फिजी देशाचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णाने नोंदविला.

नव्या मोसमात स्पेनच्या आंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली एटीके बागानने या विजयाने तीन गुणांची कमाई केली. बदली स्ट्रायकर मानवीर सिंगने एटीकेच्या लाख मोलाच्या गोलाची चाल रचली. 63व्या मिनिटाला प्रशिक्षक हबास यांनी त्याला आघाडीफळीत उतरविले होते. मध्यफळीत खेळणाऱया प्रोणोय हलदर याच्याऐवजी त्याला संधी देत आक्रमण भक्कम करण्यात आले. मानवीरने हा डावपेच यशस्वी ठरविताना डावीकडून मुसंडी मारली आणि चेंडू गोलक्षेत्रात मारला.

मानवीरने मारलेला फटका केरळ ब्लास्टर्सच्या व्हिन्सेंट गोमेझ आणि सर्जिओ सिंदोचा या मध्यफळीतील प्रतिस्पर्ध्यांना तो सफाईने अडविता आला नाही. सिंदोचा याच्या डोक्याला लागून चेंडू रॉय कृष्णापाशी गेला. मग रॉयने मैदानालगत सफाईदार फटका मारत ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सला भेदले व गोल केला.

गत मोसमात कृष्णाने 21 सामन्यांत 15 गोल केले होते आणि सर्वाधिक गोल करणाऱया खेळाडूंमध्ये त्याने संयुक्तपणे अव्वल स्थान मिळविले होते. केरळ ब्लास्टर्सला सामन्याच्या 54व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, मध्यफळीतील नोंगदांबा नाओरेमने हाणलेला फटका बाहेर गेला. त्यापूर्वी जेसल कार्नेरोचा केलेल्या क्रॉसवर कार्ल मॅकहय़ुजने केलेल्या हेडींगवर साहल अब्दुल समदला फिनिशिंग करता आले नाही. व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने प्रारंभ करण्याचे ध्येय बाळगलेल्या ब्लास्टर्सकरिता सुरुवात अपयशी झाली. या सामन्यात त्यांची सुरुवात डळमळीत होती. पहिल्या सत्रात एटीकेच्या रॉय कृष्णाच्या गोल करण्याची संधी हुकली.

Related Stories

असाही खेळाडू…जो 8 प्रँचायझींकडून खेळला!

Patil_p

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून नादालची माघार

Patil_p

यष्टीरक्षणातील हिरोचा नवा विक्रम

Patil_p

अझारेन्का-ओसाका आज जेतेपदाची लढत

Patil_p

हॉकीची कार्यशाळा ऑनलाईनवर

Patil_p

फ्रान्सचा त्सोंगा दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!