तरुण भारत

नेतृत्व विभागणीची संकल्पना आपल्या संस्कृतीत बसत नाही

माजी भारतीय कर्णधार कपिलदेव यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘कोणत्याही बहुउद्देशीय संस्थेचे दोन सीईओ असू शकत नाहीत’, असे उदाहरण देत माजी भारतीय कर्णधार कपिलदेव यांनी नेतृत्वविभागणी आपल्या संस्कृतीत अजिबात बसत नाही, असा पवित्रा घेतला. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकून दिल्यानंतर विराटवरील भार थोडा हलका करत रोहितकडे किमान टी-20 क्रिकेटमध्ये तरी नेतृत्वाची धुरा सोपवावी, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कपिलदेव बोलत होते.

‘माझ्या मते, नेतृत्व विभागणीची ही संकल्पना आपल्या संस्कृतीला अजिबात साजेशी नाही. जर कोहली टी-20 खेळत असेल आणि उत्तम प्रदर्शन साकारत असेल तर यात धक्का लावू नका. अन्य काही खेळाडूही दमदार प्रदर्शन साकारत आहेत. पण, सर्व क्रिकेट प्रकारात आपला संघ किमान 70 ते 80 टक्के समसमानच आहे. प्रत्येक क्रिकेट प्रकारासाठी स्वतंत्र कर्णधार असणे आपल्या संघाला, खेळाडूंना मानवणारे नाही. असे केल्यास खेळाडूंमध्येच अधिक मतभेद निर्माण होऊ शकतात’, असे ते म्हणाले.

61 वर्षीय कपिलदेव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची अलीकडेच अँजिओप्लॅस्टी झाली असून एचटी लीडरशिप समिटमध्ये त्यांनी व्हर्च्युअल सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 1983 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱया या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने सध्याचे जलद गोलंदाज विनाकारण अनेक प्रयोग राबवत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

वेगापेक्षा स्विंग महत्त्वाचे

‘अलीकडील कालावधीत मी जलद गोलंदाजांबद्दल बराच नाराज आहे. पहिला चेंडू कधीही क्रॉस सीम असू नये. आयपीएलमधील खेळाडूंना वेगापेक्षा स्विंग अधिक महत्त्वाचा आहे, याची जाणीव झाली. अगदी प्रतितास 120 किमी वेगाने गोलंदाजी करणारा संदीप शर्मा देखील चेंडू वळवत असल्याने अधिक प्रभावी ठरला’, असे निरीक्षण त्यांनी पुढे नोंदवले.

‘वेग महत्त्वाचा नसतो तर स्विंग महत्त्वाचा असतो, हे गोलंदाजांनी स्वतःवर बिंबवायला हवे. त्यांनी ही कला आत्मसात करायला हवी. पण, उलट ते यापासून दूर जात आहेत. आयपीएलमध्ये नटराजन हा माझा हिरो होता. त्याने बेधडक, बिनधास्त गोलंदाजी केली आणि अपेक्षेपेक्षा अधिक यॉर्कर्सची बरसातही केली’, अशा शब्दात कपिलने सनरायजर्स हैदराबादच्या युवा टी. नटरायजनचे कौतुक केले.

जर चेंडू स्विंग करता येत नसेल तर गोलंदाजीत वैविध्य आणण्याचे सर्व प्रयत्न फोल जाण्यासाठीच असतात, असे कपिल यांचे मत आहे. ‘आपले मनगट सरळ ठेवावे, चेंडू सीम-अप पद्धतीने धरावा. चेंडू वळू लागतो, त्यावेळी कसोटी सामने महत्त्वाचे ठरतात. वासिम, बोथम, विलिस, हॅडली, मॅकग्रा त्यामुळेच महान गोलंदाज ठरले. स्विंग गोलंदाजीची कला परत यायला हवी. नकल चेंडू शिकणे तर नितांत गरजेचे’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

भारतीय गोलंदाजांची मुक्त कंठाने प्रशंसा

भारतीय जलद-मध्यमगती गोलंदाजांचे मात्र त्यांनी कौतुक केले. ‘शमी व बुमराह यांच्यामुळे बराच फरक पडला आहे. आपण आपल्या जलद गोलंदाजांवर अवलंबून असतो, हे सांगताना मला आज खूप आनंद होतो आहे. आपले गोलंदाज सामन्यात 20 बळी घेण्याची क्षमता राखून आहेत. काही कालावधीपूर्वी आपल्याकडे कुंबळे, हरभजन असे फिरकीपटू होते. पण, आता आपल्याला कोणताही देश त्यांना उसळत्या गोलंदाजीला पोषक खेळपट्टी द्या, असे म्हणण्याचे धाडस करणार नाही’, असे ते म्हणाले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी मालिका जो संघ जिंकेल, तोच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपही जिंकेल, असा अंदाज कपिल यांनी शेवटी व्यक्त केला.

टी-20 साठी अन्य क्रिकेट प्रकारांचा बळी देऊ नका

‘टी-20 क्रिकेटच्या मोहात कसोटी क्रिकेटचा बळी जाणार नाही, याची आयसीसीने गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे. पण, क्रिकेट खरोखरच बदलले आहे. सध्याचे खेळाडू फक्त आयपीएल, बीबीएल व तत्सम क्रिकेट स्पर्धाच खेळणे पसंत करतात. यातील आयपीएल आपले बलस्थान ठरले. कौंटी क्रिकेटचे इंग्लंडमध्ये असेच स्थान आहे. मात्र, सध्या आयपीएल आपल्याला याचे अनेक लाभ करुन देत आहे. पण, फक्त आयपीएल, टी-20 चा विचार करुन चालणार नाही. याच बरोबरीने कसोटी व वनडे क्रिकेटचा देखील विचार करायला हवा. पैशाचा मुद्दा विसरण्याचे कारण नाही. पण, परंपरा देखील तितकीच महत्वाची असते. विम्बल्डन स्पर्धा अद्यापही हिरवळीवर खेळवली जाते, याची आपण नोंद ठेवणे आवश्यक आहे’, याचा कपिल यांनी येथे उल्लेख केला.

Related Stories

विश्व संघटनेकडून अमेरिकन बॅडमिंटन स्पर्धा तहकूब

Patil_p

आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याची क्षमता कोहलीच्या टीम इंडियाकडे : लारा

Patil_p

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू सना मीरची निवृत्ती

Patil_p

टी-10 क्रिकेट ऑलिम्पिकसाठी योग्य

Patil_p

मुष्टियोद्धा डिंको सिंग कोरोनातून मुक्त

Patil_p

चिनी प्रायोजक हटवण्यात कायदेशीर अडचण?

Patil_p
error: Content is protected !!