तरुण भारत

काश्मीर ते कन्याकुमारी …नव्या विक्रमाची सायकलस्वारी

नाशिकच्या ओम महाजनचा पराक्रम, 8 दिवस, 7 तास 38 मिनिटात 3600 किलोमीटर्स अंतर कापले

मुंबई / वृत्तसंस्था

ओम महाजन पुढील महिन्यात 18 व्या वर्षात पदार्पण करेल. पण, त्यापूर्वीच त्याने भारतातील सर्वात वेगवान सायकल प्रवासाचा विक्रम मोडीत काढला आहे. महाराष्ट्रातील नाशिकचा रहिवासी असलेल्या ओमने श्रीनगर ते कन्याकुमारी हे 3600 किलोमीटर्सचे अंतर 8 दिवस, 7 तास व 38 मिनिटात पार केले. शनिवारी दुपारी त्याने या विक्रमाला गवसणी घातली.

‘मी नेहमी सायकलिंगमध्येच असायचो. पण, एका प्रकारे ते स्प्रिन्टिंगप्रमाणे असायचे. सातत्याने सायकलिंगचे मी नेहमीच स्वप्न पाहिले आणि लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर रेस ऍक्रॉस अमेरिकामध्ये सहभागी होणे, हे मी माझे ध्येय ठरवले. नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार होती. पण, 600 किमीच्या पात्रता फेरीत सहभागी होण्यापेक्षा मी रेस ऍक्रॉस इंडियाला प्राधान्य दिले’, असे ओमने कन्याकुमारीत पोहोचल्यानंतर सांगितले.

मागील आठवडय़ातील एका रात्री त्याने श्रीनगरपासून सुरुवात केली आणि मध्य प्रदेशमधील संततधार पावसातून मार्ग काढत दक्षिणेच्या दिशेने वळला व तेथून तो आपल्या इच्छित स्थळी पोहोचला. आश्चर्य म्हणजे श्रीनगर ते कन्याकुमारी सर्वात वेगवान सायकल प्रवासाचा विक्रम यापूर्वी ओमच्या काकांच्याच नावे होता. पुढे तो विक्रम भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी मोडला. पन्नू यांनी 8 दिवस 9 तासात हे अंतर पार केले. गिनीज बुकमध्ये त्या विक्रमाचा समावेश होणे बाकी होते. त्यापूर्वीच, ओम महाजनने नवा विक्रम नोंदवला.

‘काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल प्रवासात झोपणे किंवा अगदी विश्रांती घेणे म्हणजे देखील स्वर्गसुखासारखे होते. थंडी सोसणे हे या प्रवासातील सर्वात खडतर आव्हान होते’, असे ओमने पुढे नमूद केले. सोशल मीडियावर ओमवर स्तुतिसुमने सुरु झाली व लेफ्टनंट कर्नल पन्नू यांनी 17 वर्षीय ओमशी संपर्क साधत त्याचे आवर्जून अभिनंदन केले.

ओमचे वडील हितेंद्र व काका महेंद्र यांनी एकत्रित संघ करत 2015 मध्ये रेस ऍक्रॉस अमेरिका स्पर्धा जिंकली. त्यांच्या खात्यावर सर्वात जलद गोल्डन क्वॉड्रिलेटरलचा विक्रमही नोंद आहे. कोव्हिड-19 च्या संकटामुळे कन्सास, अमेरिका येथे लवकर जाता आले नाही. तेथे त्याने क्रीडा व्यवस्थापनात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. पण, यामुळे जो वेळ मिळाला, तो त्याने सरावासाठी सत्कारणी लावला. ओमचे वडील, काका तसेच रेस ऍक्रॉस अमेरिकाचे सोलो फिनिशर कबीर रायचुरे यांनी ओमसाठी काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासात सपोर्ट टीम म्हणून सहभाग घेतला. ‘मी फक्त अंतर कापून काढले. या यशाचे सर्व श्रेय सांघिक प्रयत्नांना जाते’, असे ओम येथे म्हणतो.

ओमचे पुढील लक्ष्य रेस ऍक्रॉस अमेरिकाचे आहे. ही स्पर्धा पृथ्वीतलावरील सर्वात कठीण मानली जाते. यात यश संपादन करण्यासाठी 12 दिवसात 4800 किलोमीटर्स सायकलिंग करावे लागते. सध्या तरी आणखी विचार न करता कन्याकुमारीच्या बीचवर सुर्यास्ताचा आनंद घेणे पसंत करेन, असे ओमने शेवटी नमूद केले आहे.

Related Stories

अन् म्हणूनच मुंबईचा हार्दिक पंडय़ा गोलंदाजी करत नाही!

omkar B

आगामी आय लीग फुटबॉल स्पर्धेत दिल्ली दोन संघ उतरविणार

Patil_p

मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी पोग्बा, रेसफोर्ड उपलब्ध

Patil_p

दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजू वरचढ : स्मिथ

Patil_p

विश्वनाथन आनंदचा पहिला विजय

Patil_p

लिव्हरपूलकडे प्रिमियर लीग फुटबॉल करंडक

Patil_p
error: Content is protected !!