तरुण भारत

कोरोना फैलावाच्या भीतीने सरकार धास्तावले

प्रतिनिधी/ पणजी

देशाच्या राजधानीत कोरोना रुग्णांची झपाटय़ाने वाढणारी संख्या लक्षात घेता गोव्यात येणाऱया पर्यटकांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि अन्य राज्यांनी अवलंबिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.

कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटकांमुळे गोव्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी पत्रकारांना वरील माहिती दिली आहे. सध्या उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, बिहार, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात आदी राज्यात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्याने हाहाकार माजला आहे. त्या परिस्थितीला कंटाळून तेथील बरेच लोक पर्यटक बनून गोव्यात येत आहेत, या पर्यटकांमध्ये काहीजण बाधितही असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पर्यटकांचा गोव्याकडे ओढा

एका बाजूने गोव्यातील रुग्णांची संख्या घटत चालली असली तरी दुसऱया बाजूने पर्यटकांची संख्या प्रचंड वाढत आहे. सध्या गोवा हे सर्वात सुरक्षित राज्य अशी जाहिरात झाल्यामुळे पर्यटकांची पावले गोव्याकडे वळत आहेत. किनारी भाग, हॉटेल्स आणि अन्य पर्यटन स्थळांवर पर्यटकांची झुंबड उडालेली दिसत आहे. मात्र हे पर्यटक कोरोनासंबंधी कोणतीही मार्गदर्शक तत्वे पाळत नाहीत. राज्यात प्रवेश करतानाही त्यांची कुठेच तपासणी, चाचणीही होत नाही. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

आरोग्यमंत्र्यांचे आरोग्य सचिवांना पत्र

ही बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरित हालचाली सुरू करताना राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांशी बोलणी करण्यास सांगितले. खास करून दिल्लीतून येणाऱया पर्यटकांवर जादा लक्ष ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.

आम्ही कठोर पावले उचलणार नसलो तरी विमानतळावर मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही याकडे लक्ष ठेवणार आहोत. तसेच त्यापलीकडे जाऊन आणखी काही उपाययोजना घेण्याची गरज आहे का? याचाही अभ्यास होईल, असे श्री. राणे म्हणाले. अत्यंत विचारपूर्वक आखलेली आणि कार्यक्षम, फायदेशीर अशी उपाययोजना हवी, असे ते पुढे म्हणाले.

नववर्षाच्या पूर्वसंध्येसह संपूर्ण डिसेंबर महिना हा दरवर्षी पर्यटकांच्या तुफान गर्दीने भरून जात असतो. त्यामुळे आता स्वस्थ बसून चालणार नाही. त्याशिवाय छठपूजेनंतर राज्यात स्थलांतरीत कामगारांचीही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढू लागणार आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्वे अधिक प्रभावीपणे कार्यवाहित आणणे अत्यावश्यक आहे, असे राणे म्हणाले.

रेल्वे प्रवाशांसंबंधी अद्याप अनभिज्ञता

दरम्यान, मार्गदर्शक तत्वांची विमानतळावर कठोरतेने अंमलबजावणी करता येणे शक्य असले तरी रेल्वे मार्गाने येणारे प्रवाशी, पर्यटक वा स्थलांतरीत कामगारांवर कशाप्रकारे लक्ष ठेवावे आणि खबरदारीचे कोणते उपाय घ्यावे, याबद्दल सरकार अद्याप अनभिज्ञ आहे, तरीही रेल्वेलाही एसओपी लागू करणार असे श्री. राणे यांनी सांगितले.

कॅसीनो ठरू शकतात कोरोनास्फोटक

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या नुकतीच कुठे कमी होत असतानाच आता मांडवीतील तरंगत्या पॅसिनोमधून मोठय़ा प्रमाणात बाधित सापडू लागल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पॅसिनोमधून कोरोनाबाधित सापडण्याचे प्रकार घडत आहेत. पैकी एका पॅसिनोतच तब्बल 20 बाधित सापडले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

पेडणे, सांखळी, जुने गोवे, काणकोणात पावसाचे शतक

omkar B

उत्तरप्रदेश सरकारने मुलांवर होणारी छळणूक थांबवावी गोवा महिला काँग्रेसची मागणी

GAURESH SATTARKAR

वाळपई नवोदय विद्यालयाच्या अर्धवट दुरूस्तीमुळे विद्यार्थी, शिक्षकांना अडचणी

Patil_p

पर्वरीत भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार खंवटे यांचा निषेध

Patil_p

‘प्रोग्रेसिव्ह प्रंट’च्या कार्यकर्त्यांना अटक

omkar B

मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे पंतप्रधानांशी चर्चा करतील

omkar B
error: Content is protected !!