तरुण भारत

काँग्रेसची 33 टक्के उमेदवारी युवकांना

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष चोडणकर यांची माहिती

प्रतिनिधी/ मडगाव

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवकांना पसंती देणार आहे. एकूण 40 उमेदवारांपैकी 33 टक्के उमेदवार हे नव्या दमाचे तरूण असतील. जे पक्षाशी प्रामाणिक असतील व अन्य कोणत्याही पक्षाचा आधार न घेता राज्यात काँग्रेस पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. माजी मंत्री ज्योकीम व त्यांचे पुत्र युरी आलेमाव यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशावेळी श्री. चोडणकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस, एम. के. शेख, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, संकल्प आमोणकर, जनार्दन भंडारी, अमरनाथ पणजीकर इत्यादी मान्यवर उपस्थिती होते. यावेळी ज्योकीम व युरी आलेमाव यांच्या मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.

आम आदमी पार्टी ही भाजपची ‘बी’ टीम असून काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी भाजप आपचा वापर करीत असल्याचा आरोप यावेळी श्री. चोडणकर यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आलेला आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी देखील सतर्क राहिले पाहिजे. आप बरोबरच अन्य दोन राजकीय पक्ष भाजपला मदत करीत असल्याचे श्री. चोडणकर यावेळी म्हणाले.

हिंमत असेल लोकविरोधी प्रकल्प रद्द करा

गोव्यात जेव्हा काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर होते, त्यावेळी काँग्रेस पक्षाने कधीच जनतेच्या हिताआड जाऊन प्रकल्प आणले नाहीत. मात्र, राज्यातील भाजप सरकार जनेतच्या हिताआड प्रकल्प आणत आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठे उद्योगपती जिंदाल व अंदानी यांना शरण गेल्याचा आरोपही श्री. चोडणकर यांनी केला. जर भाजप सरकारला हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसप्रमाणे लोकविरोधी प्रकल्प रद्द करून दाखवावेत, असे आव्हान यावेळी दिले.

कुंकळळीच्या विकासात ज्योकीम यांचे योगदान

ज्योकीम आलेमाव हे आपल्या सरकारात मंत्री होते, त्यावेळी त्यांनी कुंकळळी मतदारसंघात तसेच सांगे मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली. खास करून कुंकळळी मतदारसंघात तर अनेक प्रकल्प आले. त्याचे श्रेय ज्योकीम आलेमाव यांना जात आहे. ज्योकीम आलेमाव यांच्या नंतर दोन आमदार निवडून आले, त्यांनी किती प्रकल्प आणले व किती विकासकामे मार्गी लावली याची पूर्ण कल्पना व माहिती कुंकळळीतील जनतेला आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.

राजकारणात संयम हा खुपच महत्वाचा असतो. संयम असलेली व्यक्ती मोठी मजल गाठू शकते आणि युरी आलेमाव हे अत्यंत संयमी असल्याने, ते राजकारणात नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास श्री. कामत यांनी व्यक्त केला. राज्यात विधानसभेच्या निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सज्ज असले पाहिजे. आम्ही रंणागंणावर आहोत, त्यामुळे जे कोण पक्ष सोडून गेले याचा विचार न करता, जे सोबत आहेत, त्यांना घेऊन पुढे जायचे आहे व यश मिळवायचे आहे असे श्री. कामत म्हणाले. 

काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहणार

यावेळी बोलताना युरी आलेमाव म्हणाले की, आपण काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहणार असून काँग्रेस पक्षाची संस्कृती जपली जाईल. आपल्या वडिलानंतर कुंकळळीच्या मतदारसंघात विकासकामात खंड पडला आहे. विद्यमान आमदार व त्यापूर्वीच्या आमदारांना विकासकामे राबविण्यात अपयश आले. आपण स्वत: विमान पायलट असलो तरी आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. सद्याच्या भाजप सरकारचा गैरकारभार सुरू आहे. त्यामुळे लोकांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. गेल्या निवडणुकीत आपल्या वडिलांचा केवळ 17 मतांनी पराभव झाला तरी आम्ही जनतेकडे दुर्लक्ष केले नाही. जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच समस्येच्यावेळी त्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे कुंकळळीतील जनता आजही आमच्या सोबत आहे व त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आज काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे युरी म्हणाले.

विकासकामांत मदतीचा हात मिळाला

आपण प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो व दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारात मंत्री होतो, त्यावेळी या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विकासकामांत मदतीचा हात दिल्याचे ज्योकीम आलेमाव म्हणाले. कुंकळळीत आपण अनेकांना सरकारी नोकऱया मिळवून दिल्या, त्यासाठी कुणाकडूनही एक पैसा देखील घेतला नाही. कुंकळळीतील लोकांना सरकारी नोकऱया मिळणे कठीण होते. अशावेळी आपण नोकऱया मिळवून दिल्या होत्या असे ते म्हणाले. आज आपले पुत्र युरी आलेमाव हे सक्रिय राजकारणात येत असून जनतेने त्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी लुईझिन फालेरो यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास असून काँग्रेस पक्षाने देशाला नावलौकीक मिळवून दिलेला आहे. त्यामुळे या पक्षाशी सर्वांनी प्रामाणिक रहावे. सुरुवातीला ज्यो डायस यांनी सर्वांचे स्वागत केले तर शेवटी आशिश यांनी आभार मानले.

Related Stories

पणजीतील बेवारस वाहने मनपाकडून जप्त

Patil_p

गोव्याच्या बाजारपेठेत आता ‘गोवा गोल्ड’ दूध

tarunbharat

दहावीचा निकाल 92.69 टक्के

tarunbharat

अस्नोडा येथे आमवृक्ष कोसळून रस्ता खोळंबला

tarunbharat

शाळा 15 ऑक्टोबरनंतर सुरू करण्याच्या हालचाली

Patil_p

हवाई प्रवाशांसाठी आता दाबोळी विमानतळावर आरोग्यदायी काढा उपलब्ध

omkar B
error: Content is protected !!