तरुण भारत

विरोधी पक्षांना नेता मिळेल का हो नेता ?

नरेंद्र मोदींनी दोनदा दिमाखाने विजय मिळवल्यावर त्यांच्या पांगलेल्या विरोधकांच्या तंबूत एकच प्रश्न विचारला जात आहे-मोदींना टक्कर देईल असा सर्वमान्य नेता कधी उदयाला येणार? पण एखाद्या बादलीत घातलेल्या खेकडय़ांप्रमाणे मोदी विरोधकांची अवस्था आहे.

‘कोणी घर देता का, घर?’ असा आर्त टाहो ‘नटसम्राट’मध्ये गणपतराव बेलवलकरांनी फोडला होता. त्या नटसम्राटाची शोकांतिका त्यातून केवळ झळकली नाही तर रसिकांना तिने हेलावून सोडले. आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दोनदा नवी दिल्लीवर दिमाखाने विजय पताका झळकवल्यावर त्यांच्या पांगलेल्या विरोधकांच्या तंबूत एकच प्रश्न विचारला जात आहे-मोदींना टक्कर देईल असा सर्वमान्य नेता कधी उदयाला येणार? सर्वमान्य नेता उदयाला आल्यावर सत्ताधाऱयांचे काही खरे नाही, असाही मोदी विरोधकांमध्ये विश्वास आहे. पण एखाद्या बादलीत घातलेल्या खेकडय़ांप्रमाणे मोदी विरोधकांची अवस्था आहे. कोणी एक खेकडा वर चढू लागला तर इतर त्याला खाली खेचतात. अशातच कोरोना महामारी सत्ताधाऱयांकरता राजकीयदृष्टय़ा इष्टापत्ती ठरली आहे. कारण महामारीमुळे सर्व राजकीय हालचालीच सध्या तरी ठप्प झाल्या आहेत.

Advertisements

मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधी पक्षांना टाळे लागले आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील भाजप-संजदच्या विजयाने त्यांच्यामध्ये एक प्रकारचे नैराश्य परत पसरले नसते तरच नवल होते. कालपरवापर्यंत काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम केलेले संजय झा हे आता गांधी-नेहरू घराण्याबाबत एवढे कडवट झाले आहेत की जाणते अजाणतेपणी काँग्रेस ही आता भाजपची बी टीम बनत चालली आहे असे दिसत आहे असा त्यांचा दावा आहे. जर बिहारमध्ये काँग्रेसने त्याच्या वाटय़ाला आलेल्या 70 जागांपैकी निम्म्या जिंकल्या असत्या तरी गैरभाजप सरकार आले असते असे पक्षाचे हितचिंतक तसेच विरोधकदेखील म्हणत आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकात दहा टक्के जागादेखील जिंकू न शकलेल्या काँग्रेसला ‘दुखतंय कुठं, कळंना नीट’ असे झाले आहे अशी कोपरखळी भाजपची नुकतीच धुरा सांभाळलेल्या जगतप्रकाश नड्डा यांनी मारली आहे. जोपर्यंत राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचा हव्यास सोनिया गांधी सोडत नाहीत तोपर्यंत भाजपची बल्ले बल्ले आहे असे भाजप नेते सांगत आहेत. अशाच प्रकारचे तर्क आम आदमी पक्ष देखील देत आहे. आता काँग्रेसला बाजूला ठेवून विरोधी ऐक्मयाची खेळी करणे जरुरीचे आहे. कारण राहुल आणि सोनियाच या मार्गातील अडसर आहेत. पाप्याचे पितर झाले असले तरी काँग्रेस गतवैभवाची आठवण कुत्रे जसे हाड जसे चघळत राहते तसे सारखे काढत राहते. त्याने फक्त काँग्रेस नेतृत्वाचा अहंकारच वाढतो. ‘बडा घर पोकळ वासा’ अशी स्थिती आहे. गेले दीड वर्षे पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षच नाही अशा वेळेला सुकाणू कोणाच्या हातात नसल्याने जहाज भरकटणारच. राहुल आणि प्रियांका हे फक्त समाज माध्यमांवर सक्रिय आहेत अशी टीका पक्षांतर्गत ऐकायला मिळते. अशातच सोनिया गांधींच्या नावाने काँग्रेस संघटना चालवणारे त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे अतिशय आजारी आहेत. कोरोनामुळे ते येथील एका पॉश हॉस्पिटलमध्ये चिंताजनक अवस्थेत असल्याने पक्षाची चिंता अजून वाढली आहे. मनमोहनसिंग सरकार हे अहमदभाई चालवायचे असा समज होता आणि तो सर्वस्वी खोटा नव्हता.

शरद पवारांकडे विरोधी पक्षांना देण्याकरता नेतृत्व आहे हे महाराष्ट्राने दाखवून दिले असले तरी गांधी घराण्याचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास नसल्याने अखिल भारतीय स्तरावर त्यांना रोल मिळालेला नाही. मायावती या भाजपच्या बगलबच्चा म्हणून काम करू लागलेल्या आहेत तर मुलायमसिंग यादव यांची सद्दी म्हातारपणामुळे कधीच संपली आहे. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले असले तरी त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची परिपक्वता आलेली नाही. तेजस्वी यादवनी बिहारमध्ये भाजपशी जोरदार झुंज देऊन आपले नेतृत्व प्रस्थापित केलेले आहे. अखिलेश यांना उत्तर प्रदेशात ते जमलेले नाही. काल परवापर्यंत स्वतःला राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाकरता प्रोजेक्ट करणाऱया ममता बॅनर्जींची बंगालमधील सत्ताच भाजपने घेतलेल्या मुसंडीने संकटात आलेली आहे.  डावे पक्ष केरळात या घडीला सत्तेवर असले तरी येत्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने त्यांना उखडवले नाही तरच ते आश्चर्य ठरेल.

मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील उदयाने बऱयाच नेत्यांचे राजकारणच संपले आहे. त्यात माजी पंतप्रधान देवेगौडा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव प्रभृतींचा समावेश आहे. असद्दुदीन ओवैसीसारख्या नेत्यांच्या उदयाने काँग्रेस तसेच प्रादेशिक पक्षांपुढे एक वेगळे आव्हान उभे राहिले आहे. अरविंद केजरीवाल यांनी दोनदा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे खरे, पण त्यांचा प्रभाव दिल्लीबाहेर कधी पडलाच नाही. पंजाबमध्ये गेल्या निवडणुकीत ते निवडून येणार अशी हवा निर्माण झाली पण केजरीवाल यांचा पक्ष तिथे सत्तेत आला तर तेथील गाडला गेलेला दहशतवाद परत वर उफाळून येईल ही भीती संघ परिवार तसेच भाजपला वाटली आणि आपली मते त्यांनी अलगद काँग्रेसकडे वळवली. केजरीवाल यांच्या पक्षाला खलिस्तानी समर्थकांचा देशाबाहेरून पाठिंबा मिळतो आहे असे चित्र उभे राहिले होते आणि त्यात बऱयाच अंशी सत्य होते. या अशा वेगळय़ा वातावरणामुळेच ‘विरोधी पक्षांना नेता मिळेल का हो नेता?’ हा कळीचा प्रश्न पुढे आला आहे. त्याला ज्या दिवशी समर्पक उत्तर मिळेल तेव्हापासून राष्ट्रीय राजकारण बदलाच्या नवीन वाटेवर लागलेले असेल. ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असा मोदी सरकारचा कारभार काही जाणकारांना वाटू लागला असला तरी एका खंद्या विरोधी पक्षनेत्याच्या अभावामुळे भाजपची सारी पापे झाकली जात आहेत असे चित्र दिसत आहे.

– सुनील गाताडे

Related Stories

का तुटले चिमणे घरटे…

Patil_p

रेती व्यवसायातील बजबजपुरी

Amit Kulkarni

कामगारांची तळमळ, योगींची मळमळ!

Patil_p

नवरत्नांची माळ

Patil_p

सोने आयात 94 टक्क्मयांनी घटली

Patil_p

नववर्ष गोंयकारांना कितपत सुखकारक ?

Omkar B
error: Content is protected !!