तरुण भारत

कुंडईत जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ

मडकई, कुंडई, बांदोडय़ातील पाणी टंचाई होणार दूर

प्रतिनिधी / फोंडा

मडकई मतदार संघातील कुंडई, मडकई व बांदोडा पंचायत क्षेत्रातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी 300 मी. मी. जीआय जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ रविवारी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्याहस्ते करण्यात आला. कुंडई येथे झालेल्या या कार्यक्रमाला मडकई मतदार संघाचे आमदार तथा माजी बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, कुंडईचे सरपंच रामू नाईक, पाणी विभागाचे कार्यकारी अभियंते निवृत्ती पार्सेकर, श्री. म्हापारी, काशिनाथ सराफ, तसेच स्थानिक पंचसदस्य उपस्थित होते.

साधारण रु. 2 कोटी 29 लाख खर्चून ही नवीन जलवाहिनी टाकण्यात येत असून आपो पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून या तिनही पंचायत क्षेत्रात पाणी पुरवठय़ाची ही योजना आहे. ही जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर मडकई, कुंडई व बांदोडा पंचायत क्षेत्रातील टंचाईग्रस्त भागातील पाण्याची समस्या कायमची निकाली लागणार असल्याचे मंत्री पाऊसकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जलजीवन योजनेचा निधी जलवाहिनी बदलण्यासाठी

केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतंर्गत गोवा राज्याला रु. 77 कोटी मंजूर झाले असून जुन्या जलवाहिन्या बदलून, त्याजागी नवीन वाहिन्या टाकण्यासाठी हा निधी वापरला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बऱयाच तालुक्यामध्ये चाळीस वर्षे जुन्या वाहिन्या बदलण्याची गरज आहे. अशा जलवाहिन्यांना लागणाऱया गळतीमुळे 30 टक्के पाणी वाया जात आहे. त्या बदलतानाच त्यांची क्षमता वाढवून 90 ते 100 मी. मी. करण्यात येईल, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारकडून राज्यातील जलपुरवठा व रस्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारला रु. 1500 कोटींचा निधी मिळणार आहे. गोव्यातील जनतेला चांगले रस्ते व चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची सरकारची योजना आहे. राज्यातील सर्व बाराही तालुके टँकरमुक्त करताना नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री पाऊसकर यांनी नमूद केले. शंभर टक्के नळ जोडणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून ज्या घरांना नळांसाठी ना हरकत दाखले मिळाले आहेत, त्या सर्वांपर्यंत नळजोडणी पोचल्याचा दावाही त्यांनी केला.

मे 2021 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होणार

राष्ट्रीय महामार्गाचे काम जलनगतीने पूर्ण करण्यासाठी रु. 150 कोटी मंजूर झाल्याचे सांगून राज्यातील खराब रस्त्यांची डागडुजी सुरु झाल्याचे ते म्हणाले. पावसाळय़ात खराब झालेल्या सर्व महामार्ग रस्त्यांची दुरुस्ती, विस्तार व येत्या जानेवारीपासून हॉटमिक्स थर टाकण्यात येणार आहे. पत्रादेवी ते पोळे व खांडेपार ते अनमोड दरम्याच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे 2021 पर्यंत पूर्ण करणाचे केंद्रीकडून निर्देश देण्यात आले असून जुवारी पुलाचे कामही डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचा नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

मलनिस्सारण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर

मलनिस्सारण प्रकल्पासंबंधी बोलताना, गोवा राज्य कचरा व सिवरेजमुक्त होण्यासाठी असे प्रकल्प आवश्यक आहेत. त्यासाठी नवीन मॉडेलचा अवलंब केला जाणार असून जमीन ताब्यात घेतल्याशिवाय कामाच्या निविदा काढल्या जाणार नाहीत. सर्व बाराही तालुक्यात असे प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 40 टक्के तर कंत्राटदार कंपनीकडून 60 टक्के गुंतवणूक अशा पीपीपी तत्त्वावर मलनिस्सारण प्रकल्प योजना राबविण्यात येणार आहे.

मडकई व कुंडईतील पाण्याची समस्या दूर होईल : सुदिन ढवळीकर

आमदार सुदिन ढवळीकर यांनी या जलवाहिनीमुळे दर दिवशी 800 क्युबिक  मिटर पाणी पुरवठा मडकई, कुंडई पंचायत क्षेत्रातील काही भाग व बांदोड पंचायत क्षेत्रात होणार असल्याचे सांगितले. येत्या सहा महिन्यात काम पूर्ण होऊन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे वरील तिनही पंचायत क्षेत्रातील पाण्याची समस्या निकाली लागेल. 2018 मध्येच या कामाची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. मात्र शिरोडय़ातील पोटनिवडणुक व अन्य कारणांनी त्याला विलंब होत गेला. सध्या रस्त्याचे काम केलेल्या विविध कंत्राटदारांचे रु. 650 कोटी, पाणी विभागाचे काम केलेल्या कंत्राटदारांना साधारण रु. 215 कोटी सरकारकडून देणे बाकी आहेत. त्यामुळे कामे अडकून पडली आहेत. सरकारने त्यांची ही देणी चुकती केल्यास, विकासकामे जलदगतीने मार्गी लागतील, असे ते म्हणाले. मंत्री पाऊसकर व आमदार ढवळीकर यांच्याहस्ते जलवाहिनीच्या कामाचे भूमिपुजन केले.

Related Stories

हाथरस घटनेबाबत काँग्रेसतर्फे पणजीत मुकमोर्चा

Patil_p

बेंदुर्डे येथील घरावर दरड कोसळली

Omkar B

गोवा माईल्समुळे उपासमारीची पाळी

Amit Kulkarni

खाणी सुरु करा, अन्यथा अवलंबितांची जाबाबदारी घ्या

GAURESH SATTARKAR

नियम पाळा, कोरोना टाळा, काळजी घ्या

Omkar B

मांगोरहिलचा कंटेनमेंट झोन आजपासून अनलॉकच्या दिशेने

Omkar B
error: Content is protected !!