कोची : केरळचे माजी क्रिकेटपटू तसेच वेगवान गोलंदाज सी.के. भास्कर यांचे वयाच्या 79 वर्षी अमेरिकेतील हय़ुस्टन येथे निधन झाले. 1960 च्या दशकामध्ये राष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रामध्ये सी.के. भास्कर हे वेगवान गोलंदाज म्हणून गाजले होते.
भास्कर यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत केरळ आणि तामिळनाडू संघांचे रणजी स्पर्धेत प्रतिनिधीत्व करताना एकूण 42 प्रथमश्रेणी सामन्यात 106 बळी घेतले आहेत. तसेच त्यांनी पाचवेळा एका डावात 5 पेक्षा अधिक बळी मिळविले आहेत. 1964 साली झालेल्या सिलोन संघाविरूद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय संघामध्ये भास्कर यांचा समावेश होता तर या संघाचे नेतृत्व टायगर पतौडी यांनी केले होते. क्रिकेटप्रमाणेच ते ऑलिंपिक स्पर्धेचे मोठे चाहते होते. 1972 च्या म्युनिच ऑलिंपिकपासून ते प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेला उपस्थित होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांनी ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.