तरुण भारत

देव आले…देव आले..अन् सारे पीक खाऊन गेले!

गोधोळी, बाळगुंद भागात दोन कळपांकडून पिकांची हानी : हत्ती-शेतकरी संघर्ष संपणार कधी?

पिराजी कुऱहाडे /  खानापूर

Advertisements

20 वर्षांपूर्वी काळी नदी प्रकल्प झाल्यानंतर त्या भागातील हत्तींचा कळप या भागाला लागून असलेल्या नागरगाळी परिसरात येऊन ठेपला. काळी नदीवर प्रकल्प होण्यापूर्वी या भागातील जंगलात हत्तींचे वास्तव्य होते. पण या प्रकल्पानंतर दांडेली भागातून नागरगाळी भागात दाखल झालेले हत्ती कालांतराने विस्तारीत होत गेले. त्या हत्तींकडून दरवर्षी मेरडा, हलगा, नागरगाळी, बस्तवाड, गोधोळी, गोदगेरी, कुंभार्डा भागामध्ये शेती पिकांचे नुकसान केले जात आहे. यावर्षीही हत्तींच्या पहिल्या कळपाचे हत्तरवाड जंगलातून आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसात गोधोळी भागातील अनेक शेतकऱयांच्या उसाचा फडशा पाडला जात आहे. त्यामुळे शेतकऱयांना पिकांच्या रक्षणासाठी कसरत करावी लागणार आहे.

  एकेकाळी देव आले या भावनेतून शेतकऱयांनी हत्तींना एकदम पिटाळून न लावता चक्क त्यांची पूजाही केली. हत्ती शेतात आले तर उत्पन्न वाढते अशी भावना शेतकऱयांची होती. पण अलीकडच्या काळात हे भावनिक देवच शेतकऱयांना दरवर्षी नुकसान करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यात हत्तींना देव म्हणण्याची भावना दुरापास्त होऊन देव आले अन् सारे पीक खाऊन गेले, म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या गोधोळी, बाळगुंद, गोदगेरी भागात या हत्तींच्या कळपाने थैमान घातले आहे.

तालुक्याच्या दक्षिण भागातील गोधोळी, गोदगेरी, बाळगुंद आदी भागात दोन हत्तींच्या कळपांनी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान सुरू ठेवले आहे. एका कळपात दोन टस्कर व दोन पिल्ले आहेत. तर दुसऱया कळपात दोन तस्करांचा समावेश आहे. सध्या या भागामध्ये सुगी हंगामाला जोर आला आहे. भात पिकांची कापणी व मळणी जोरात सुरू आहे. परंतु हत्ती कळपांपासून भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी सदर हत्तींचे कळप मळणी केलेल्या खळय़ांमध्ये येऊन धान्य फस्त करत आहेत. शिवाय भाताच्या गंज्यांचेही नुकसान करत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. भात पिकाबरोबरच या भागात ऊस पिकाचेही प्रमाण अधिक आहे. सध्या प्रत्येक उसाच्या फडात या हत्तींच्या कळपांनी मोठे नुकसान केले आहे.

गेल्या आठवडय़ाभरात येथील अनेक शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. बाळगुंद येथील मुस्ताक अहमद तिकडी यांच्या शेतातील भाताची मळणी व उसाचे पीक एका कळपाने नुकसान केले आहे. गोधोळी भागातील सुहास कदम, गणपती कदम, मारुती चोपडे, नंदा हळब, रुद्राप्पा बोभाटे, पुंडलिक गावडे, लोकाप्पा चोर्लेकर, अशोक डोगुळकर, मारुती शिंदे अशा अनेक शेतकऱयांचे नुकसान  हत्तींच्या कळपाने केले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे.

खानापुरातील जंगलमय प्रदेशात गवीरडे, चितळ, रानडुकर, हरण, वाघ, अस्वल, बिबटे यासारखे जंगली प्राणी मोठय़ा प्रमाणात आहेत. काही भागात हत्तीsंचे वास्तव्यही आहे. या सर्व प्राणीमात्राला जंगल भागात चारा, पाणी मिळत नसल्याने त्या जंगली प्राण्यांनी सुगीच्या हंगामात नजीकच्या शेतवाडीचाच ताबा घेऊन पिकांवरच ताव मारण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे शेतकरीवर्ग वैतागला असून त्या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण कसे करावे? हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

वनखात्याची कॅरीडॉर योजना लालफितीत

आता तर हे हत्ती खानापूर शहराच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचत आहेत. राजरोसपणे येऊन शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यांना आवर घालण्यात वनखातेदेखील हतबल झाले आहे. यासाठी बॉम्ब, फटाके, वाद्य यांचा उपयोग करण्यात आला. पावसाळा संपल्यावर पुन्हा वनखात्याने हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच त्यांच्याकडून होणाऱया शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वेगवेगळय़ा मार्गांनी प्रयत्न केले. सुरुवातीला नागरगाळी भागातील जंगलात हत्तींना हुसकावून लावण्यात आले. यासाठी नागरगाळी भोवतालच्या संपूर्ण जंगलाला बाहेरील बाजूने मोठी चर मारण्यात आली. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण हत्तींनी बाजूची झाडे तोडून त्या चरीवर टाकून लाकडी साकव उभा केला. त्या लाकडी साकवावरून सारे हत्ती जंगलाबाहेर पडले. आणि पुन्हा त्यांनी आपला मोर्चा शेती पिकाकडे वळविला. हा प्रयत्न विफल झाल्याने जंगलाभोवती सोलार कुंपण घालण्याची योजना आणली. पण हत्ती इतका चतूर प्राणी आहे की, त्या ठिकाणीदेखील सोलारपासून निर्माण होणारा विजेचा धक्का लागू नये, यासाठी बाजूची झाडे तोडून सोलार कुंपणावर टाकून त्यावरून प्रवेश करून पिकांचे नुकसान केल्याच्या घटना आहेत. यामुळे हत्तीना आवरावे कसे, असा वनखात्यासमोरही प्रश्न निर्माण झाला आहे.

नुकसानभरपाई वाढवून देण्याची गरज

एकूणच खानापूर तालुक्यात सुरू असलेला हत्तींचा उपद्रव कमी होणे अत्यंत कठीण बनले आहे. प्रतिवर्षी होणाऱया मोठय़ा नुकसानीमुळे शेतकरीवर्गही वैतागून गेला आहे. वनखात्याने पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ठरवलेले अनुदान अत्यल्प आहे. ऊस पिकाचा विचार करता शेतकऱयांना एकरी कमीतकमी 50 हजार रुपये, भात पिकासाठी एकरी 20 हजार रु. तसेच नारळ झाडासाठी दहा हजार रु., केळीच्या झाडासाठी दोन हजार रु., नुकसानभरपाई देणे क्रमपात्र आहे.  वनखात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन हत्तींपासून शेतकऱयांना मुक्त करण्यासाठी वनखात्याने योजना हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

सोमवारी 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

हब्बनहट्टी गावाजवळ रस्त्यावर सापडली पाचशे रुपयाची नोट

Patil_p

ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा त्रासदायक

Patil_p

परीक्षांबाबत सरकारने योग्य तो खुलासा करावा : अभाविपची मागणी

Omkar B

वैचारिक समृद्धी वाया घालवू नका!

Amit Kulkarni

प्रतिमा कुतिन्होच्या विरोधात गुन्हा दाखल

Patil_p
error: Content is protected !!