तरुण भारत

मृत्यूदर 1 टक्क्याखाली आणा !

कोरोना संबंधात पंतप्रधान मोदींची राज्य सरकारांना सूचना : काही मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना विषाणूचा संसर्ग संपविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सध्या कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याने लोक काहीसे निष्काळजी झाल्याचे दिसून येते. या निष्काळजीपणावर आळा घालणे आवश्यक आहे. राज्यांनी कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण एक टक्क्याहून कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करताना केले.

ही चर्चा मंगळवारी झाली. या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा समावेश होता.

पंतप्रधान मोदी यांनी अनेक इतर महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या. राज्य सरकारांनी स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रण आणि जनता प्रबोधन समित्या स्थापन कराव्यात. कोरोना होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची याची माहिती सर्वसामान्य जनतेला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मोदींच्या हस्तक्षेपाची मागणी

दिल्लीतील व देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घ्यावा अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली. दिल्लीत गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात शेतांमधील गवत जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण वाढले. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. या राज्यांमधील गवत जाळण्याच्या समस्येवर केंद्राने हस्तक्षेप करून स्थायी उपाययोजना करावी, असे अनेक मुद्दे केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले.

कराचा वाटा त्वरित द्या

पश्चिम बंगालमध्ये कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, केंद्र सरकारने राज्यांना त्यांचा वस्तू-सेवा करातील वाटा त्वरित द्यावा. तो न दिल्याने राज्यांसमोर आर्थिक पेचप्रसंग उभा राहिला आहे. तो दूर होण्याची आवश्यकता आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

उचलेल्या पावलांची माहिती

कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने उचललेल्या पावलांची माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली. राज्य सरकारने कोरोना व इतर संसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी स्थायी स्वरूपाची पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. फटाक्यांवर बंदी आणून प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न केले आहेत. मास्कसाठी कायदा करण्यात आला आहे, इत्यादी माहिती त्यांनी दिली.

Related Stories

अमेरिकेत मेगा रॉकेटची चाचणी यशस्वी

Patil_p

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या 12 प्रचार सभा

datta jadhav

कच्छमध्ये सलग तिसऱया भूकंप

Patil_p

मतदारांमध्ये उत्साह

Patil_p

नोएडा : ओप्पो कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

pradnya p

देशभरात नवीन 94 रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!