तरुण भारत

रोहित-इशांत पहिल्या दोन कसोटीतून बाहेर

उर्वरित दोन सामन्यांबाबतही साशंकता कायम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा व जलद गोलंदाज इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत, त्याचबरोबर 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित 2 सामन्यात देखील ते खेळणार का, याबद्दल साशंकता आहे. हे दोघेही पूर्ण तंदुरुस्त असतील का, हे पुढील एका महिन्याच्या कालावधीत स्पष्ट होऊ शकेल, असे तूर्तास बीसीसीआयला कळवण्यात आले आहे. रोहित व इशांत सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका दि. 17 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी रोहित व इशांतला संघात स्थानही दिले गेले होते. पण, क्वारन्टाईनच्या सक्त नियमांमुळे त्यांच्या उपलब्धतेविषयी अनिश्चितता निर्माण झाली.

तूर्तास, रोहित व इशांत यांना मॅचफिट होण्यासाठी किमान 3 ते 4 आठवडय़ांचा कालावधी लागेल, असा अहवाल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने दिला असल्याचे मंडळातील सूत्राने मंगळवारी वृत्तसंस्थेला कळवले. रोहितने आपण धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरत असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस ट्रेनिंग घेत असल्याचे मागील आठवडय़ात नमूद केले होते. दुसरीकडे, इशांत शर्मा साईड स्ट्रेनमधून सावरत आहे.

‘रोहित, इशांतने प्रवास केला असता तर त्यांना प्रवासी विमानाने यावे लागले असते आणि यासाठी त्यांना क्वारन्टाईनचे कठोर प्रतिबंध पाळावे लागले असते. यामुळे, क्वारन्टाईन कालावधीत त्यांना संघासमवेत सराव करणेही शक्य झाले नसते. आता केवळ क्रिकेट ऑस्टेलियाने त्यांच्या केंद प्रशासनाला राजी केले तरच या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात क्वारन्टाईन असताना सराव करता येणे शक्य होणार आहे’, असे सूत्राने नमूद केले.

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर याच महिन्यात भारतीय संघ चार्टर्ड फ्लाईटने ऑस्ट्रेलियात दाखल झाला आणि त्यांना चार्टर्ड फ्लाईटन आले असल्याने क्वारन्टाईन कालावधीतही सरावाची परवानगी देण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित-इशांत 4 दिवसात ऑस्ट्रेलियात पोहोचले तरच त्यांना खेळण्याची संधी मिळू शकेल, असे नमूद केले होते. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची मालिका ऍडलेड येथील पहिल्या सामन्याने सुरु होईल. त्यानंतर मेलबर्न (26 ते 30 डिसेंबर), सिडनी (7 ते 11 जानेवारी), ब्रिस्बेन (15 ते 19 जानेवारी) येथे उर्वरित 3 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऍडलेड येथील पहिली कसोटी खेळून विराट कोहली मायदेशी परतणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी 2018-19 मधील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 असा विजय संपादन केला होता.

आयपीएलमध्ये मी अगदीच निराशाजनक खेळ साकारला. पण, मागील दोन दिवसाच्या सरावात मला बऱयापैकी सूर सापडला असल्याचे जाणवत आहे. भारताविरुद्ध उत्तम योगदान देईन, असा विश्वास वाटतो.

-ऑस्ट्रेलियाचा आघाडीवीर फलंदाज स्टीव्ह स्मिथ

कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर राखीव फलंदाज

रोहित शर्मा कसोटी मालिकेतील पहिल्या दोन लढतीसाठी तरी उपलब्ध होण्याची शक्यता मावळल्यानंतर भारतीय संघव्यवस्थापन श्रेयस अय्यरला राखीव फलंदाज या नात्याने संघासमवेत थांबण्यास सांगण्याची शक्यता आहे. विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर त्याच्या जागी पर्यायी खेळाडू कोण असेल, हे निवड समितीने स्पष्ट केले नव्हते. त्यावेळी रोहित शर्मा संघात असेल, असे गृहित धरले गेले, जे साहजिकही होते. पण, आता रोहित मालिकेतून जवळपास बाहेर फेकला गेला असल्याने श्रेयस राखीव फलंदाज असू शकतो. सध्याच्या घडीला मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका पूर्ण झाल्यानंतर कसोटी संघात समाविष्ट नसलेले त्यातील खेळाडू मायदेशी परतणार आहेत. सध्याच्या कसोटी संघात कोहलीसह 8 फलंदाज आहेत. रोहित जर वेळेत तंदुरुस्त होऊ शकला नाही किंवा दौऱयाच्या मध्यात आणखी कोणी फलंदाज जखमी झाला तर अशा परिस्थितीत संघव्यवस्थापनाकडे काही पर्याय असणार आहेत.

गोलंदाजीच्या आघाडीवर, भारताकडे 5 वेगवान गोलंदाज आहेत. कसोटीसाठी इशांत उपलब्ध होत नसताना व्यवस्थापन त्याच्यासाठी पर्यायी गोलंदाज तैनात करणार का, याची आता उत्सुकता असेल.

स्टीव्ह स्मिथ अपारंपरिक शैलीचा फलंदाज आहे आणि अशा फलंदाजांसमोर स्वतंत्र रणनीती राबवावी लागते. पाचव्या ऑफस्टम्पच्या रोखाने स्मिथला सातत्याने गोलंदाजी केली तर त्याला रोखता येण्याची शक्यता वाढू शकेल.

-माजी कर्णधार सचिन तेंडुलकर

विराटच्या गैरहजेरीचा उत्पन्नावर परिणाम होणार नाही : क्रिकेट ऑस्ट्रेलिया

भारतीय कर्णधार विराट कोहली ऍडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यानंतर खेळणार नसला तरी त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मालिकेतून मिळणाऱया उत्पन्नावर काहीही परिणाम होणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. कोव्हिड-19 चा क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाला देखील मोठा फटका बसला असून त्यांनी आपल्या कर्मचाऱयांची संख्या कमी केली आहे व त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत, त्यांची वेतनकपातही केली आहे.

दि. 17 डिसेंबरपासून भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱया कसोटी मालिकेच्या माध्यमातून अर्थार्जन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होणे ऑस्ट्रेलियन मंडळाला अपेक्षित आहे. पण, पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतत असल्याने याचा मालिकेवर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपली भूमिका स्पष्ट केली.

‘आम्हाला विराटच्या निर्णयाविषयी पूर्ण आदर आहे. वनडे, टी-20 मालिकेनंतर ऍडलेडमधील पहिल्या कसोटीत नेतृत्व त्याच्याकडे असेल, याचा आनंद आहे’, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी निक हॉकली यांनी नमूद केले.

Related Stories

माद्रीद टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याकरिता दीपा मलिक खेळातून निवृत्त

Patil_p

चेन युफेईला महिला बॅडमिंटन एकेरीचे सुवर्ण

Patil_p

रवि शास्त्रीसह प्रशिक्षक स्टाफचे दुबईत आगमन

Patil_p

रेस वॉकर केटी इरफानसह पाच ऍथलेट्स ‘पॉझिटिव्ह’

Amit Kulkarni

मनीष कौशिक उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!