तरुण भारत

दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी कोहली, अश्विनला नामांकन

आयसीसीने जाहीर केली यादी, पाचही विभागात कोहलीचा समावेश, वनडे, टी-20 साठी रोहितला नामांकन

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisements

आयसीसीने दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कारासाठी भारताच्या विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांचे नामांकन केले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीमुळे त्याला सर्व पाच विभागात नामांकन मिळाले आहे. रोहित शर्माला मात्र सर्वोत्तम वनडे व टी-20 क्रिकेटपटू पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे.

या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी एकूण सात क्रिकेटपटूंचे नामांकन झाले असून त्यात भारताच्या या दोन खेळाडूंचा समावेश आहे. या दोघाव्यतिरिक्त इंग्लंडचा जो रूट, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स, लंकेचा कुमार संगकारा यांचेही या पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूसाठी कोहली, लंकेचा लसिथ मलिंगा, ऑस्ट्रेलियाचा स्टार्क, डीव्हिलियर्स व संगकारा यांच्यासह भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रनमशिन रोहित शर्मा यांचे नामांकन झाले आहे. कोहली व रोहित यांना दशकातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारासाठी अफगाणचा रशिद खान, इम्रान ताहिर, ऍरोन फिंच, मलिंगा व ख्रिस गेल यांनाही नामांकन मिळाले आहे. दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू आणि दशकातील स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी देखील विराट कोहलीने नामांकन मिळविले आहे.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कोहलीची सरासरी 50 हून अधिक धावांची असून त्याने 70 आंतरराष्ट्रीय शतके नोंदवली आहेत. शतके नोंदवण्याच्या यादीत तो रिकी पाँटिंग (71) व सचिन तेंडुलकर (100) यांच्यानंतर तिसऱया क्रमांकावर आहे. याशिवाय सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांच्या यादीतही तो तिसऱया क्रमांकावर असून त्याने आतापर्यंत एकूण 21,444 धावा जमविल्या आहेत. दुसऱया स्थानावरील पाँटिंगने 27,483 तर पहिल्या स्थानावरील सचिन तेंडुलकरने 34,357 धावा जमविल्या आहेत. गेल्या दशकभरात कोहलीने कसोटीत 7000 हून अधिक, वनडेमध्ये 11000 हून अधिक तर टी-20 मध्ये 2600 हून अधिक जमविल्या आहेत. या पुरस्कारांसाठी मतदान घेतले जाणार असून त्याच्या आधारावर विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. अन्य पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.

दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू : कोहली, अश्विन, रूट, विल्यम्सन, स्मिथ, डीव्हिलियर्स, संगकारा.

दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू : कोहली, विल्यम्सन, स्मिथ, जेम्स अँडरसन, रंगना हेराथ (लंका), यासिर शहा (पाकिस्तान).

दशकातील स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार : कोहली, विल्यम्सन, ब्रेन्डॉन मेकॉलम (न्यूझीलंड), मिसबाह उल हक (पाक), धोनी, अनया श्रबसोल (इंग्लंड, महिला), कॅथरिन ब्रंट (इंग्लंड, महिला), महेला जयवर्धने (लंका), डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड).

दशकातील सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू : मेग लॅनिंग, एलीस पेरी, मिताली राज, सुझी बेट्स, स्टेफानी टेलर (विंडीज), झुलन गोस्वामी.

दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू : एलीस पेरी, मेग लॅनिंग, सुझी बेट्स, स्टेफानी टेलर, मिताली राज, सारा टेलर (इंग्लंड).

Related Stories

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Rohan_P

स्पेनचा फडशा पाडत इटली अंतिम फेरीत!

Patil_p

भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने

Amit Kulkarni

9 एप्रिलला आयपीएलची सुरुवात

Patil_p

जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये अभिज्ञाला रौप्य पदक

triratna

आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला 39 पदके

Patil_p
error: Content is protected !!