तरुण भारत

दुसऱया लाटेच्या भीतीने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना नियंत्रणात असताना सुद्धा विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने शाळा सुरू  झाल्या तरी त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

शैक्षणिक विकास झाला पाहिजे. शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थी बाहेर पडता कामा नये, शाळा सुरू झाली पाहिजे, हे अगदी खरे आहे. परंतु कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोक्याचा इशारा दिलेला असताना काहीशी घाई गडबड करून सुरू करण्यात येत असलेल्या शाळेची घंटा वाजण्याऐवजी कोरोनाच्या धोक्याची घंटाच वाजू लागली आहे. म्हणूनच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना नियंत्रणात असतानासुद्धा विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने शाळा सुरू झाल्या तरी त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव अजूनतरी सुरू झालेला नाही. कोरोना वाढीचा वेग दोन्ही जिल्हय़ात मंदावलेला आहे. त्यामुळे कोकणात शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. परंतु, कोरोनाच्या दुसऱया लाटेची भीती विद्यार्थी-पालकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आणखी पंधरा, वीस दिवस पुढे जाऊ देऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य ठरला असता.

Advertisements

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने शाळा सुरू झाल्या पाहिजेत याबद्दल कोणाचे दुमत असणार नाही. गेल्या 8-9 महिन्यांपासून विद्यार्थी घरामध्ये अडकून पडले आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली असली, तरी ग्रामीण भागात नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणसुद्धा घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. आज घरात राहून राहून मुले वैतागली आहेत. त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ लागला आहे. शिक्षण प्रवाहाबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही, अशी अवस्था आहे. ही सर्व परिस्थिती पाहिली, तर शाळा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्याची योग्य वेळ येऊ दिली पाहिजे होती आणि नंतरच शाळा सुरू करायला हव्या होत्या.

 कोरोनाच्यप् महामारीमध्ये शाळा सुरू करताना आपला जीव धोक्यात घालून शाळा सुरू करणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे हा धोका पत्करायला कोणी तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांची आजची परिस्थिती पाहिली, तर दोन्ही जिल्हय़ात कोरोना नियंत्रणात आहे. कोविडचे नियम पाळून शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. परंतु, कोरोनाच्या दुसऱया लाटेचा संभाव्य धोका असल्यामुळे शाळा सुरू करण्याची आत्ताची वेळ चुकलेली आहे असेच म्हणता येईल. आणखी 15 दिवस जाऊ देऊन कोरोनाच्या दुसऱया लाटेचा काही प्रभाव आहे का याचा आढावा घेतला असता आणि त्यानंतरच शाळा सुरू केल्या असत्या, तर कोकणामध्ये निश्चितच शाळा सुरू करण्याला विद्यार्थी, पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असता.

मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली गेली. बाजारपेठा, मॉल खुले करण्यात आले. धार्मिक व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली. एसटी सुद्धा पूर्ण प्रवासी क्षमतेने सुरू झाल्या. याचा एवढा परिणाम झाला की, लॉकडाऊनमुळे गेले 8-9 महिने घरी थांबून असलेले नागरिक घराबाहेर पडू लागले. बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली. पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे कोरोना संपला की काय असे वाटू लागले. मग शाळा सुरू करण्याला काय अडचण आहे, असा प्रश्न पडतो. परंतु, शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची फार काळजी घ्यावी लागते. पालकांनाच स्वत:च्या हमी पत्राद्वारे विद्यार्थी शाळेत पाठवावे लागत आहेत.

राज्य शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु, या आदेशानंतर शाळा सुरू करताना योग्य प्रकारे नियोजन झालेले नाही म्हणूनच आज कोकणात कोरोना नियंत्रणात असूनसुद्धा शाळा सुरू करण्याला प्रतिसाद मिळाला नाही. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचा कोरोना तपासणी पूर्ण करून घेतली पाहिजे, ती पूर्ण झालेली नाही. काही ठिकाणी शिक्षकांच्या कोरोना तपासण्या झाल्या, परंतु प्रमाणपत्रच मिळालेले नाही. थर्मल गन, हॅण्डवॉश व इतर साहित्य खरेदी करून घेण्याचाही प्रश्न निर्माण झाला. दुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना साधे मास्क विकत घेणेही शक्य होत नाही अशा परिस्थितीत शासनाकडून मास्क उपलब्ध करून देणे आवश्यक होते. तेही दिलेले नाहीत. अनेक शाळांचे निर्जंतुकीकरणही झालेले नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळा सुरू करत असताना पालकांवरच जबाबदारी टाकली गेल्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याचे धाडस केलेले नाही.

सिंधुदुर्ग जिल्हय़ामधील नववी ते बारावीपर्यंतच्या 270 शाळांमधील फक्त 82 शाळा सुरु झाल्या. तर 42,424 विद्यार्थ्यांपैकी फक्त 3,765 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील 454 शाळांपैकी 200 शाळा उघडल्या, परंतु 82,096 विद्यार्थ्यांपैकी 7,197 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. हे चित्र पाहिले, तर दोन्ही जिल्हय़ात कोरोनाच्या सावटामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. शाळा सुरू करण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळण्याची तयारी शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱया लाटेचा संभाव्य धोका प्रत्येकाच्या मनात आहे आणि म्हणूनच आज कोकणामध्ये कोरोना नियंत्रणात असूनसुद्धा शाळा सुरू करण्यास अल्प प्रतिसाद मिळालेला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोका टळल्यास निश्चितच सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल यासाठी आता दोन्ही जिल्हय़ांच्या प्रशासनाकडून स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन आणखी 15 दिवसानंतर शाळा सुरू करण्याबाबत फेरविचार झाल्यास सर्व शाळा चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतील.

संदीप गावडे

Related Stories

गोहत्येवर बंदी मात्र निर्यातीचे काय?

Patil_p

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p

पाण्डव निवाले संपूर्ण

Patil_p

कोरोनाच्या निमित्ताने विज्ञानाला आक्हान व आवाहन

Patil_p

बैठकीचे फलित काय?

Amit Kulkarni

अन्न सम्मीलन योजना

Patil_p
error: Content is protected !!