तरुण भारत

दंड धरी जेंवि कृतान्त

महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात- बाणासुर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीर सैनिकांसह उषेच्या महालात घुसल्याने जेव्हा अनिरुद्धाने पाहिले, तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परिघ उगारून पवित्र्यात उभा राहिला. जणू कालदंड घेतलेला यमच.

धरावयाचे इच्छेकरून । भोंवता लोटला दैत्यगण ।

Advertisements

सूकरयूथपा जैसे श्वान । चहूंकडुन मेळविती ।

तया श्वानातें सूकरपति । प्रचंडदंष्ट्राप्रहारक्षतीं ।

भंगी तेंवि ते दुर्मति । अनिरुद्धवीरें भंगिले ।

धरावया आपणातें । दुर्मद दैत्य धांवती भोंवतें ।

अनिरुद्धें त्यां परिघघातें । श्वान मानूनि झोडपिलें।

कित्येक खङ्गखेटकधारी । मौर्व परिघ बैसतां शिरिं ।

सुस्नात होवोनियां रुधिरिं । मूर्छित समरिं पहुडती ।

अपर कुंतपट्टीशपाणि । यावज्जन्म अजिंक रणीं ।

ते परिघाचे झोडपणीं । पाठी देऊनि पळाले ।

तोमर मुद्गर शूळ शक्ति । वीर प्रतापें हाणों जाती।

ते झोडिले परिघघातीं । प्रवाह वमिती रुधिराचे ।

परिघघातें भंगलीं शिरें । ते ते सुस्नात झाले रुधिरें ।

कर पद मोडले परिघमारें । पळों माघारे न लाहती ।

करतळ मनगटें कोपर बाहू । मोडूनि पडिले वीर बहु ।

एक दुरूनि हाहाहूहू । करूनि शस्त्रे परजिती ।

सुभट झोडिले परिघघातीं । एकाआड एक लपती ।

कित्येक तृष्णें धरिती दांतीं । गाई म्हणती आम्ही तुझ्या ।

पळतां दाटले देहळीं । साळी जैश्या मूसळातळीं ।

तेंवि परिघें झोडी बळी । प्रळयकाळीं कृतान्तवत् ।

दैवें सांपदली ज्यां वाट । पावला म्हणती ते श्रीकंठ।

भीक मागूनि भरूं पोट । यावरी सुभट म्हणवूं ना ।

परिघघातें झोडितां बळी । भंगली बाणभटांची फळी ।

एक पळती रानोमाळीं । उडिया तळीं घालूनी ।

तें देखोनि बाणासुर । म्हणे हा प्रतापी महावीर ।

समरिं कोणी न धरी धीर । भासे अपर प्रळयाग्नि ।

दुर्धर दैत्यभटांच्या चळथा । परिघघात ओपितां माथां ।

अवलंबिती मृत्युपंथा । पावली व्यथा मम सेना ।

वीर नव्हे हा सामान्य। कोण माउली प्रसवला धन्य ।

अमोघ याची आंगवण। यत्नें करून धरूं यातें ।

युद्धीं भिडतां अहळबाहळीं । हा झोडील परिघातळीं ।

म्हणोनि रथीं बैसला बळी । बाण ते काळीं साटोपें।

परिघें मारितां सुभटथाटी । अनिरुद्ध पावला बाणानिकटीं ।  येरें कार्मुकीं सज्जूनि काठी । वीर जगजेठी विंधिला। परिघें निवारूनि तो शर । अश्व सारथि केले चूर ।  बाण सोडूनियां रहंवर । अतिसत्वर पळाला । आज्ञा करूनि किंकरगणा । पाचारिली प्रचंड सेना।  मघ्यें वेष्टूनि वीरराणा । बाण सणसणा विंधिती। येरें ठोकूनि परिघघातें । प्रचंड वीर पाडिले भोंवते ।  लत्ताप्रहारें काढिलीं आंतें । शरमारातें वारूनी। यावरी कपटी बाणासुर । हृदयीं चिंतूनियां शङ्कर। करितां झाला जो विचार । तो समग्र अवधारा ।

Related Stories

वीजटंचाईचे संकट

Patil_p

विधान परिषद निकालाचा अर्थ

Amit Kulkarni

नेमेचि येते निवडणूक

Patil_p

काँग्रेसमध्ये पत्रामुळे खळबळ, खुर्चीला धक्का

Patil_p

सिंहप्रेत पडिलें आहे

Patil_p

‘ऍक्ट ऑफ गॉड’ अर्थात देवाची करणी

Patil_p
error: Content is protected !!