तरुण भारत

सजगता ही देशाच्या सुरक्षिततेची भिंत!

   पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे प्रतिपादन :‘26/11’च्या हल्ल्यातील शहिदांना कुडाळ येथे आदरांजली

वार्ताहर / कुडाळ:

आपली सजगता देशाच्या सुरक्षिततेची भिंत ठरू शकते. सिव्हील डेसमधील पोलिसांची भूमिका प्रत्येक देशवासियाने निभावल्यास दहशतवादी आपल्या देशात शिरकाव करू शकणार नाहीत. मात्र, देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे, त्यांची जाणीव ठेवून देशप्रेम जागृत ठेवूया, असे आवाहन कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी गुरुवारी येथे केले.

‘26/11’ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान व बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ध्येय प्रतिष्ठान व तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

आपले देशप्रेम आपल्या कृतीतून दिसू द्यावे. आपल्या अवती-भवतीच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून त्या पोलिसांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जनतेनेही उचलली पाहिजे. समाज सुधारण्या बरोबरच राष्ट्रप्रेमही आपल्या दैनंदिन वागण्यातून दिसले पाहिजे, असे सांगत बॅ. नाथ पै शिक्षण संस्था व त्याचे चेअरमन उमेश गाळवणकर याचे उत्तम उदाहरण आहेत. देशासाठी बलिदान केलेल्यांची आठवण काढून त्यांना आदरांजली अर्पण करणे हे देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्य भावनेचे उत्तम उदाहरण ठरावे, असे कोरे म्हणाले.

तत्पूर्वी शहीद स्तंभासमोर पुष्पचक्र अर्पण करुन एन. सी. सी. छात्र, एन. एस. एस. स्वयंसेवक व मान्यवर यांच्या उपस्थितीत शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान तयार करणाऱया सर्व व्यक्तींनाही अभिवादन करीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ध्येय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सामंत, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, चेअरमन उमेश गाळवणकर व विविध अभ्यासक्रमांचे प्राचार्य उपस्थित होते.

संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्रा. प्रणाली मयेकर यांनी वाचन केले. विजय पालकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांना बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. प्रास्ताविक प्रा. अरूण मर्गज, सूत्रसंचालन ऋचा कशाळीकर, तर आभार प्रा. प्रणाली मयेकर यांनी मानले.  विविध अभ्यासक्रमांचे प्राचार्य, बी. एड. चे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या मधुरा इन्सुलकर, पल्लवी कामत व अन्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतम वालावलकर, प्रसाद कानडे, योगेश येरम यांनी मेहनत घेतली. विविध अभ्यासक्रमांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

Related Stories

सातार्डा येथील युवकाचा नदीत बुडून मृत्यू

NIKHIL_N

बेळणेतील मारहाणप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

NIKHIL_N

दुचाकी-टॅम्पोच्या धडकेत 5 जण जखमी

Patil_p

कोवीड -1 9 चाचण्यासाठी व्यक्तीची तीन गटात विभागणी निश्चित

Patil_p

दुर्मीळ पिसोरी हरणाचे चिपळुणात दर्शन!

Patil_p

सातवा वेतनसाठी चारही कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

triratna
error: Content is protected !!