तरुण भारत

पैसा गेला, बैलही गेला.. गेली पाठीची ‘साला’

 कत्तलखान्याला दिलेल्या बैलाची अखेर तामिळनाडूतून घरवापसी

बैल पाळायला नेतो ची केली बतावणी

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

तालुक्यापासून चार-पाच किमी अंतरावर असलेल्या गावातील ही घटना. गावातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या एका पदाधिकाऱयाचा बैल (पाडा) स्वत:च्या मामासाठी हवा असल्याचे सांगून तो थेट कत्तलखान्याला दिला. घरच्या गाईचा असलेला हा पाडा दिलेल्या ठिकाणी सुखरुप आहे का, हे पाहण्यासाठी तो तालुकास्तरीय पदाधिकारी (बैलाचा मूळ मालक) चौथ्या दिवशी गेला असता खरा प्रकार उघड झाला.

त्यानंतर मात्र, या पदाधिकाऱयाने ‘परशु’ पाजळताच बैल कत्तलखान्याला दिलेल्याला ‘राम’ आठवला. अखेर ज्यांच्यामार्फत हा बैल विकलेला त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर हा बैल चौथ्या दिवशी थेट तामिळनाडूपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. अखेर पदाधिकाऱयाचा रुद्रावतार पाहून हा नेणाऱया दलालामार्फत बैल आणून घरपोच करण्यात आला. मात्र, या साऱयात त्या दलालाचे पैसेही गेले, बैलही गेला, उलट मार खाऊन पाटीची सालेही गेली. या प्रकाराची चर्चा पंचक्रोशीत जोरदार सुरू आहे.

या राजकीय पदाधिकाऱयाच्या घरी जन्मलेला हा बैल (पाडा) होता. तो आता मोठा झाल्यानंतर विकण्याच्या उद्देशाने त्याने व्हॉटस् ऍपच्या डिपीला त्याचा फोटो ठेवला. त्याच्याच गावातील त्या व्यक्तीने (दलाल) आपल्या मामासाठी बैल हवा, असल्याचे सांगत डीपीचा फोटो पाहून त्या पदाधिकाऱयाशी संपर्क साधला. त्यानेही बैल विकायचा असल्याचे सांगितले. मागितलेल्या किमतीला जास्त ओढाताण न करता, त्या पदाधिकाऱयाने बैल देण्याचे मान्य केले. मात्र, अट अशी घातली की, काहीही झाले, तरी बैल कत्तलखान्याला विकायचा नाही. मी कधीही येऊन पाहून जाईन, असेही सांगितले. मात्र, मामाला हवा म्हणून सांगणाऱया त्या दलालाने त्याचे जास्त गांभीर्य न घेता, बैल 14 हजार रुपये देऊन घेऊन गेला.

इथपर्यंत बैलाचा व्यवहार शिस्तीत पार पडला. त्यानंतर तीन दिवस उलटले व चौथ्या दिवशी त्या पदाधिकाऱयाला वाटले की, आपला घरचा बैल नेलेल्या गावात जाऊन तो कसा आहे ते पाहूया. म्हणून वडिलांसह तो त्याच तालुक्यात 10-12 किमी अंतरावर असलेल्या व त्याने गावाचे नाव सांगितलेल्या त्या दलालाच्या मामाच्या गावात गेला. मात्र, त्या गावात त्याचा मामा राहतच नाही. तो त्याच गावालगत असलेल्या पण देवगड तालुक्यातील गावात राहतो, असे निष्पन्न झाले. त्यानंतर या पदाधिकाऱयाने मोर्चा देवगड तालुक्यातील गावात वळविला. मामाच्या घरी पोहोचताच बैल कुठे आहे, कसा आहे? विचारणा केली. मात्र, भाच्याने अशाही अर्थाने आपणाला ‘मामा’ बनविले असल्याचे मामाच्या लक्षात येताच त्याने बैल आपल्याकडे आलाच नसल्याचे सांगत हात वर केले.

या प्रकारानंतर संतप्त झालेल्या त्या पदाधिकाऱयाने मोबाईलद्वारे थेट त्या दलाल युवकाशी संपर्क साधत बैलाबाबत विचारणा केली. त्यानेही बैल मामाकडे असल्याचे सांगताच पदाधिकाऱयाने थेट मामाजवळ फोन दिला. हा पदाधिकारी मामाकडे पोहोचल्याचे समजताच मात्र, त्या युवकाची पाचावर धारण बसली. पदाधिकाऱयाने काही करून आपल्याला बैल परत पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पदाधिकारी घरी पोहोचण्याच्या अगोदर तो दलाल या पदाधिकाऱयाच्या घरी आला. त्यानंतर संतप्त पदाधिकाऱयाने आपल्या ‘परशु’चा वापर करत त्याची ‘राम’ म्हणेपर्यंत पाठ सोलली. त्यानंतर हा बैल दलालाला विकल्याचे त्याने मान्य केले. त्याने विकलेल्या दलालाशी संपर्क साधण्यास सांगून त्याने संकेश्वरला दुसऱया दलालाला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पुढे लिंक लावत जात असता, चौकशी करेपर्यंत हा बैल कर्नाटकमार्गे तामिळनाडूपर्यंत पोहोचला होता.

मात्र, पदाधिकाऱयाने बैल पाहिजेच, अशी भूमिका घेत रुद्रावतार धारण केल्याने या सर्वच दलालांची भीतीने गाळण उडाली. अखेर तामिळनाडूहून हा बैल परत आणून देण्याचे मान्य करत काल बैल परत आणून त्या पदाधिकाऱयाकडे पोहोच करण्यात आला. मात्र, त्याच्याच गावातील ज्याने दलालीसाठी हा पराक्रम केला, त्याला मार पडण्यासोबत पैसाही गेल्याने राम आठवण्याची वेळ आली. या प्रकाराची खुमासदार चर्चा तालुक्यात रंगत आहे.

जनावरे विकणाऱया दलालांचे रॅकेट कार्यरत

अशाप्रकारे बैल, गाई नेणाऱया दलालांचे रॅकेट राजरोस कार्यरत आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. काही ठिकाणी तर रात्रीच्यावेळी सुटलेली जनावरेही बांधून नेऊन विकल्याबाबत चर्चा आहेत. त्यातही जिल्हा, राज्याच्या सीमा ओलांडून ही जनावरे वाहनांतून जातातच कशी? याचाही शोध घेण्याची गरज आहे.

Related Stories

गुन्हे नियंत्रणात सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

NIKHIL_N

अवघी सव्वा महिन्याची असताना मातृछत्र हरपलेल्या तेजस्वीचे यश

NIKHIL_N

कोरोना लस रत्नागिरी जिह्यात दाखल !

Patil_p

लांजात आशानी पुकारले कामबंद आंदोलन

Patil_p

जिल्हा बँकेवरील सत्तेसाठी जोरदार ‘फिल्डिंग’

NIKHIL_N

रत्नागिरी : खेडला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळता मिळेना !

Shankar_P
error: Content is protected !!