तरुण भारत

टेम्पोच्या धडकेत चारवर्षीय मुलाचा मृत्यू

नाडण- मिराशीवाडी येथील घटनाः आजोबांसोबत रस्त्याने चालताना काळाचा घाला

प्रतिनिधी / देवगड:

नाडण मिराशीवाडी येथे रस्त्याच्या बाजूने आपल्या आजोबांसोबत चालत जात असताना तेथील सोहम समीर मिराशी या चारवर्षीय मुलाला टेम्पोची जोरदार धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. टेम्पोचालकाच्याच मदतीने त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास नाडण-मोंड मार्गावरील खालची मिराशीवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडण सडेवाडी येथील नितीन बाळकृष्ण घाडी हे गुरुवारी सकाळी आपल्या ताब्यातील सुपरकॅरी टेम्पो (एम. एच. 07 ए. जे 3333) घेऊन नाडण सडेवाडी येथून मोंडच्या दिशेने जात होते. याच दरम्यान, खालची मिराशीवाडी येथील सोहम मिराशी हा चार वर्षीय मुलगा आपल्या आजोबांसमवेत घरानजीक तेथील रस्त्याच्या बाजूने चालत जात होता. यावेळी भरधाव वेगात असणाऱया नितीन घाडी यांच्या टेम्पोची जोरदार धडक सोहम मिराशी याला बसली. ही धडक एवढी भीषण होती की, सोहमच्या डोक्याला, छातीला, पाठीला व हातापायांना गंभीर दुखापत होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. चालक नितीन घाडी यांनी सोहमला आपल्या टेम्पोतून जामसंडे येथील सरिता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. देवगड ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, या अपघातप्रकरणी व एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी  चालक नितीन घाडी याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 304, 279, 337, 338, मोटार व्हेईकल ऍक्ट 184 नुसार देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत.

Related Stories

पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत

NIKHIL_N

आमचा रोजगार हिरावू नका!

NIKHIL_N

खुराक बनलेल्या तहसीलच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष?

Patil_p

बांद्यात एकमूठ धान्य गरिबांसाठी उपक्रम

NIKHIL_N

दहा टक्केच मुलांना ऑनलाईन शिक्षण शक्य

NIKHIL_N

नव्या शैक्षणिक धोरणाला शिक्षक भारतीचा विरोध

NIKHIL_N
error: Content is protected !!