संप यशस्वी झाल्याचा कर्मचारी संघटनेचा दावा
महसूल कार्यालयात शुकशुकाट, कोरोनामुळे मोर्चा टळला
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
विविध प्रलंबित मागण्यासाठी कर्मचारी संघटनांनी गुरुवारी केलेल्या लाक्षणिक संपाला सिंधुदुर्ग जिल्हय़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समितीने केला आहे. कोरोनामुळे मोर्चा काढणे टाळत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.
समन्वय समितीचे निमंत्रक राजन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी एस. एल. सपकाळ, राजन कोरगावकर, सचिन माने, संजय पवार, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष नितीन कदम, सचिव सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, चंद्रकांत अणावकर, विजय भोगले, केंद्रप्रमुख संघटनेचे सुहास सावंत, माध्यमिक शिक्षक संघाचे पांडुरंग काळे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रवीण पाताडे, प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संतोष गावडे, सचिव शिवराम मोरे आदी उपस्थित होते.
1982 ची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱयांना लागू करावी व अंशदान पेन्शन योजना रद्द करावी, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शहर भत्ता, अतिकालीक भत्ता व अन्य सर्व भत्ते लागू करावेत, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील घातक तरतुदी मागे घ्याव्यात, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरावीत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचारिकांना किमान वेतन द्यावे, अशा विविध 41 मागण्यांसाठी राज्य व देशातील कर्मचारी संघटनांनी गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. जिल्हय़ातील महसूल कर्मचारी, शिक्षक,
ग्रामसेवक, जिल्हा बँक कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. काही शिक्षक संघटना, जि. प. कर्मचारीही संपात सहभागी झाले होते. त्यामुळे संपाला संमिश्र
प्रतिसाद मिळाला. मात्र, संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनेचे निमंत्रक राजन वालावलकर व एस. एल. सपकाळ यांनी केला आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर नेहमी मोर्चा काढला जातो. या मोर्चात पाच हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी होतात. मात्र, मोर्चा काढल्यास कोरोनाचा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे मोर्चा टाळून जिल्हाधिकऱयांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने महसूल विभागाचे काम ठप्प झाले होते.