तरुण भारत

पाकचे सहा क्रिकेटपटू कोव्हिड-19 ‘पॉझिटिव्ह’

जैवसुरक्षित नियमांचे उल्लंघन केल्याचा न्यूझीलंड मंडळाचा आरोप

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

Advertisements

न्यूझीलंडच्या दौऱयावर आलेल्या पाकिस्तानच्या सहा क्रिकेटपटूंना कोव्हिड-19 ची लागण झाली असल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने गुरुवारी जाहीर केले. पाकिस्तानी खेळाडूंनी जैवसुरक्षित नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांना आता क्वारंटाईन कालावधीत सराव करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील 53 सदस्यांचे जंबो पथक मंगळवारी न्यूझीलंडमध्ये दाखल झाले असून नियमावलीनुसार ते सध्या 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये आहेत. ‘सहा बाधितांपैकी दोघांना याआधीही बाधा झाली होती तर चार जणांना नव्याने लागण झाली आहे,’ असे न्यूझीलंड क्रिकेटने निवेदनाद्वारे सांगितले. मात्र त्यांनी बाधित झालेल्या खेळाडूंची नावे उघड केली नाहीत. या सर्व सहा जणांना आता वेगळय़ा ठिकाणी आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे. पाक या दौऱयात तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. मालिकेची सुरुवात 18 डिसेंबर रोजी टी-20 सामन्याने होणार आहे. ‘आयसोलेशनमध्ये असताना या सहा जणांना सध्या तरी सराव करण्यास परवानगी दिली जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दल निर्णय घेतला जाईल,’ असेही न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे.

या खेळाडूंनी कोव्हिड-19 साठी राबविण्यात येत असलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे न्यूझीलंड मंडळाने म्हटले आहे. मात्र त्याचे निश्चित स्वरूप काय होते, याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. ‘आयसोलेशनच्या पहिल्याच दिवशी पाक संघाने नियमावलीचे उल्लंघन केले असल्याची माहिती यजमान मंडळाला देण्यात आली होती. त्यांच्याशी आता चर्चा करून नियमावली पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल,’ असेही मंडळाने सांगितले.

या वर्षी पाकने इंग्लंड दौरा केला होता, त्यावेळी पाकचे किमान दहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. लाहोरहून येथे निघण्यापूर्वी सर्व खेळाडूंची चार वेळा चाचणी घेण्यात आली होती आणि त्यात ते निगेटिव्ह आढळले होते. वरिष्ठ संघाप्रमाणे पाकचा अ संघही येथे आला असून चार दिवसांचे दोन सामने हा संघ खेळणार आहे. 10 डिसेंबरपासून त्याची सुरुवात होणार आहे.


Related Stories

स्वीडनच्या डय़ूप्लॅन्टिसला पॉल व्हॉल्टचे सुवर्ण

Patil_p

भारतीय महिला रिकर्व्ह संघाचे ऑलिंपिक स्वप्न संपुष्टात

Patil_p

बांगलादेशचे लंकेला 258 धावांचे आव्हान

Patil_p

क्रीडा मंत्रालयाकडून जोसेफ जेम्सना अडीच लाख रूपयांची मदत

Patil_p

स्वायटेक, साबालेन्का, व्हेरेव्ह दुसऱया फेरीत

Amit Kulkarni

रिबेकिनाकडून रॅडुकानू पराभूत

Patil_p
error: Content is protected !!