तरुण भारत

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे आज

रोहितच्या गैरहजेरीत भारतीय संघ यजमानांचा मुकाबला करणार, नव्या जर्सीमुळे 1992 वर्ल्डकप जर्सीच्या आठवणींना उजाळा

सिडनी / वृत्तसंस्था

कोरोनानंतरच्या नव्या विश्वात व नव्या रंगाढंगातील रेट्रो निळय़ा जर्सीत भारतीय क्रिकेट संघ आज (दि. 27) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे लढतीत आमनेसामने भिडेल. मर्यादित षटकांच्या या मालिकेत रोहित शर्माशिवाय खेळण्याचे कडवे आव्हान भारताला येथे पेलावे लागेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी येथील पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात होणार आहे.

रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय आघाडी फळीला अनेक आव्हाने पेलावी लागतील आणि कर्णधार विराट कोहलीसाठी हीच मुख्य चिंता आहे. रोहित सलामीला उतरणार असेल तर त्याच्याकडून स्फोटक खेळाची अपेक्षा साहजिक असते आणि स्वतः रोहित या अपेक्षेला बऱयापैकी न्याय देत आला आहे. पण, मर्यादित षटकांच्या मालिकेत तो खेळणार नसल्याने भारतासमोर येथे वेगळी स्थिती असू शकते.

भारतीय संघाने यापूर्वी मार्चमध्ये न्यूझीलंडचा शेवटचा दौरा केला, त्यावेळी संघाच्या पदरी निराशा आली होती. त्यानंतर कोरोनामुळे सक्तीच्या ब्रेकनंतर तब्बल आठ महिन्यांनी भारतीय संघ प्रथमच एखाद्या आंतरराष्ट्रीय लढतीसाठी मैदानावर उतरणार आहे. या लढतीच्या माध्यमातूनच भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर सुरु होईल.

ज्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे, अशा रसिकांना मात्र यंदाची जर्सी 1992 आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेतील जर्सीप्रमाणे असल्याने हा बदल कदाचित मानवणार नाही. (भारताला 1992 विश्वचषक स्पर्धेत 9 संघात सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते).

यंदा 3 सामन्यांची वनडे मालिका व तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळताना रोहितच्या गैरहजेरीत संघाचा योग्य समतोल साधला जाईल, याची खबरदारी कर्णधार विराट कोहलीला घ्यावी लागेल. रोहितची दुखापत हा राष्ट्रीय वादाचा मुद्दा ठरला होता, त्यामुळे देखील भारतीय संघव्यवस्थापनाची जबाबदारी येथे साहजिकच वाढलेली असणार आहे.

विराटवर मोठी जबाबदारी

अन्य प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील विराट नेहमी जिद्दीने लढतो आणि या मालिकेतही त्याचा खेळ बहरण्याची अपेक्षा आहे. मात्र, रोहित उपलब्ध नसल्याने विराटला स्वतःच्या खांद्यावर अधिक जबाबदारी घ्यावी लागेल, हे साहजिक ठरु शकते. त्यात, घरच्या भूमीत खेळणारा ऑस्ट्रेलियन संघ, बहरात परतत असणारा स्टीव्ह स्मिथ आणि नेहमीच धावांचा भुकेला असलेला डेव्हिड वॉर्नर या सर्व मुद्यांचा मुकाबला करणे निश्चितच आव्हानात्मक असणार आहे.

बुमराह-शमी यांच्यात रोटेशन

जलद गोलंदाज जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी आजच्या लढतीत निश्चितपणाने खेळतील. मात्र, मर्यादित षटकांच्या या मालिकांनंतर होणारी कसोटी क्रिकेट मालिका अधिक प्रतिष्ठेची असल्याने भारतीय संघ मर्यादित षटकांच्या लढतीत बुमराह व शमी यांना सातत्याने रोटेट करेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे, या दोघांपैकी एकाला विश्रांती दिलेली असेल, त्यावेळी त्यांची कसर भरुन काढण्याचे आव्हान शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी यांच्यावर असणार आहे. अर्थात, सध्या आपल्या सर्वोत्तम बहरात असलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे आक्रमण बीमोड  करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे का, असा प्रश्न येथे साहजिकच उपस्थित होतो.

हार्दिक पंडय़ाला यापूर्वी त्याच्यावर ओझे होऊ नये, यासाठी गोलंदाजी सोपवली गेली नव्हती. पण, या मालिकेत तो पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करु शकला व 6 व्या किंवा 7 व्या स्थानी फटकेबाजी देखील करु शकला तर भारतीय व्यवस्थापनाला दोन फिरकीपटू खेळवण्याची रणनीती अंमलात आणता येऊ शकते. श्रेयस अय्यरने यापूर्वी चौथ्या स्थानी उत्तम प्रदर्शन साकारले असल्याने हे भारतीय संघाचे बलस्थान असणार आहे.

केएल राहुलसाठी ‘ऍसिड टेस्ट’

यष्टीरक्षणाची धुरा सोपवल्या गेलेल्या केएल राहुलसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका एखाद्या ऍसिड टेस्टप्रमाणे असणार आहे. एकीकडे, केएल राहुलला फलंदाजीत प्रभाव दाखवावा लागेल तर दुसरीकडे, त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, यजुवेंद्र चहलसारख्या गोलंदाजांची गुगली बिनचूक वाचत डीआरएस घ्यावा का, याबद्दलही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करावे लागणार आहे. केएल राहुल यष्टीरक्षक म्हणून चमकल्यास भारतीय संघ अवांतर फलंदाज किंवा गोलंदाज खेळवण्याच्या रणनीतीत यशस्वी ठरणार का, हे देखील येथे स्पष्ट होईल.

बहरातील धवनचा सहकारी सलामीवीर कोण?

रोहितच्या गैरहजेरीत डावखुरा फलंदाज शिखर धवनचा सहकारी सलामीवीर कोण असेल, यासाठी युवा फलंदाज शुभमन गिलला संधी द्यायची की त्याच्यापेक्षा किंचीत अनुभवी मयांक अगरवालला निवडायचे, हा पेच विराट कंपनीला सर्वप्रथम निकालात काढावा लागेल. मिशेल स्टार्क किंवा पॅट कमिन्ससारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना सामोरे जाताना भारतीय आघाडी फळीचा कस लागला तर अर्थातच त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार-यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, मायंक अगरवाल, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हॅझलवूड, सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, कॅमेरुन ग्रीन, मोईसेस हेन्रिक्यूज, ऍन्डय़्रू टाय, डॅनिएल सॅम्स, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक).

सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : सकाळी 9.10 पासून.

Related Stories

केकेआरची हैदराबादविरुद्ध विजयी ‘राईड’!

Patil_p

उपांत्य फेरीत कार्लसन, सो यांची विजयी सलामी

Patil_p

एएफसी पात्रता फुटबॉल सामने लांबणीवर

Patil_p

वेन रूनीचा मुलगा केई मँचेस्टर युनायटेडशी करारबद्ध

Patil_p

बलबिर सिंग सिनियर यांना राष्ट्रीय सन्मान मिळावा

Patil_p

अशोक दिंडा गोवा संघातून खेळणार

Patil_p
error: Content is protected !!