मुख्यमंत्र्यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील कृषी विकासासाठी पंचवार्षिक योजना गरजेची असून ती तयार करावी, अशी सूचना यांनी आयसीएआर कर्मचारी व अधिकारीवर्गाला केली.
आल्तिनो-पणजी येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या आयसीएआर बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले शेतीचे नवे तंत्रज्ञान आजच्या शेतकऱयांना आत्मसात होण्यासाठी पंचवार्षिक कृती योजनेचा आराखडा तयार करून कृषी उत्पादन वाढवावे. त्याकरीता हवे असल्यास नोकरभरती करावी. गोव्यात कृषी संवर्धन, उत्पादन विकास यासाठी भरपूर वाव असून फक्त तेथे लक्ष देणे आवश्यक आहे, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. आयसीएआरच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवामधील कर्मचारी अधिकारीवर्गाने एकत्र येऊन संयुक्तपणे काम करावे व पंचवार्षिक आराखडा, कृती योजना तयार करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आयसीएआरचे संचालक डॉ. इ. व्ही चाकुसकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व बैठकीचा हेतू सांगितला. कृषी उत्पादनासाठी शेतकरीवर्ग व इतरांना उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि स्वयंपूर्ण गोवाचे उद्दिष्टय़ साकार व्हावे म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. विविध खात्याचे संचालक, अधिकारी त्या बैठकीस उपस्थित होते.