प्रतिनिधी / बांदा
इन्सुलीचे सुपुत्र तथा आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी गुणाजी उर्फ जिजी दत्ताराम जाधव यांचे वयाच्या 68 व्या वषी गुरुवारी रात्री दु:खद निधन झाले.
गुणाजी जाधव यांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून आपले शालेय शिक्षण पूर्ण करून लांजा येथून कृषी पदविका प्राप्त केली होती. त्यानंतर इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणूनही सेवा केली. दरम्यान 1983 मध्ये प्रशिक्षण व भेट खात्यात त्यांची कृषी सहाय्यक म्हणून निवड झाली होती.
अत्यंत प्रामाणिक सरळ साधा स्वभाव व सर्व सामान्याबाबत असलेला जिव्हाळा यामुळे ते शेतकऱयांत लोकप्रिय ठरले. कालंबिस्त, वेर्ले परिसरातून नोकरी करीत मंडळ कृषी अधिकारी बांदा या पदावरून 2007 मधे ते सेवानिवृत्त झाले.
एक प्रामाणिक, निस्वार्थी परोपकारी, मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता. भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ अशा चळवळीतही ते सक्रिय होते. सेवानिवृत्ती बौध्द संघटनेचे ते सावंतवाडी तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. इन्सुली मधील सामाजिक सांस्कृतिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा तसेच विद्या विकास मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात नोकरी करत असताना प्रशालेसाठी त्यांनी योगदान दिले.मात्र गेले वर्षभर ते एका दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे.आंबेडकर चळवळीतील तरुण कार्यकर्ते परेश, जर्मनीत नोकरी निमित्त असणाऱया रुपेश यांचे वडील तर भारतीय बौध्द महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव यांचे ते चुलत भाऊ होते.