25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

पहिला सामना जिंकून न्यूझीलंडची मालिकेत आघाडी

20 मालिका : यजमानांचा 5 गडय़ांनी विजय, फग्युर्सन, नीशमची चमक

वृत्तसंस्था/ ऑकलंड

लॉकी फर्ग्युसनचा भेदक वेगवान मारा आणि जिमी नीशमच्या नाबाद 48 धावांमुळे न्यूझीलंडने पहिल्या टी-20 सामन्यात विंडीजवर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे 5 गडय़ांनी विजय मिळवित मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 21 धावांत 5 बळी मिळविणाऱया फर्ग्युसनला सामनावीराचा बहुमान मिळाला. विंडीजचा कर्णधार पोलार्डचे स्फोटक नाबाद अर्धशतक मात्र वाया गेले.

नीशमने टी-20 मधील वैयक्तिक सर्वोच्च धावा नोंदवताना देवॉन कॉनवेसमवेत 77 धावांची आणि मिचेल सँटनरसमवेत अभेद्य 39 धावांची भागीदारी केली. कॉनवेने 41 तर सँटनरने नाबाद 31 धावा जमविल्या. पावसाचा व्यत्यय आल्याने सामना 16 षटकांचा खेळविण्यात आला आणि नंतरही डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सामन्याचा निर्णय लागला. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकांत 7 बाद 180 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर 16 षटकांत 176 धावांचे सुधारित उद्दिष्ट मिळाल्यानंतर न्यूझीलंडने 15.2 षटकांत 5 बाद 179 धावा जमवित विजय साकार केला.

विंडीजचा कर्णधार पोलार्डने तुफानी फटकेबाजी केल्यामुळे विंडीजला पावणेदोनशेपार धावांपर्यंत मजल मारता आली. त्याने केवळ 37 चेंडूत नाबाद 75 धावा तडकावताना 4 चौकार आणि 8 षटकार ठोकले. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर  आंद्रे फ्लेचर व ब्रँडन किंग यांनी विंडीजला 3.2 षटकांत बिनबाद 58 अशी दणकेबाज सुरुवात करून दिली होती. हमिश बेनेटने टाकलेल्या डावातील तिसऱया षटकात या जोडीने 29 धावा झोडपल्या. पण फर्ग्युसनच्या भेदक माऱयापुढे त्यांचे 5 गडी केवळ एका धावेत बाद झाल्याने बिनबाद 58 वरून 5 बाद 59 अशी त्यांची स्थिती झाली. फर्ग्युसनने आपल्या पहिल्या चेंडूवर बळी मिळविल्यानंतर त्याच षटकात आणखी एक बळी मिळविला. त्याने 4 षटकांत 21 धावा देत 5 बळी मिळविले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 बळी मिळविणारा न्यूझीलंडचा तो दुसरा गोलंदाज आहे. याआधी टिम साऊदीने हा पराक्रम केला होता. पोलार्डने डाव सावरत उपयुक्त भागीदारी केल्या आणि वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती आणि पोलार्डने चौफेर फटकेबाजी करून त्यांना खुशही केले.

उद्दिष्टाचा पाठलाग करताना रॉस टेलर धावचीत झाल्यानंतर न्यूझीलंडची स्थितीही 4 बाद 63 अशी झाली होती. पण कॉनवेने संयमी खेळ करीत डाव सावरला. त्याने ग्लेन फिलिप्ससमवेत उपयुक्त भागीदारी केली. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडने 5 बाद 140 धावा जमविल्या होत्या. फिलिप्सने गुडघ्याला दुखापत झाली असूनही 22 धावांचे योगदान दिले. नंतर नीशम व सँटनर यांनी आवश्यक धावगती राखत आणखी पडझड होऊ न देता संघाला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला. ऑकलंडमधील गेल्या 11 सामन्यातील न्यूझीलंडने मिळविलेला हा दुसरा विजय आहे.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 16 षटकांत 7 बाद 180 : फ्लेचर 34 (14 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), किंग 13 (10 चेंडूत2 चौकार), हेतमेयर 0, पूरन 1, पॉवेल 0, पोलार्ड नाबाद 75 (37 चेंडूत 4 चौकार, 8 षटकार), ऍलेन 30 (26 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), पॉल 0, कॉट्रेल नाबाद 1, अवांतर 26 (16 वाईड). गोलंदाजी : साऊदी 2-22, फर्ग्युसन 5-21, नीशम 1.3 षटकांत 32 धावा, बेनेट 2.3 षटकांत 50 धावा), न्यूझीलंड 15.2 षटकांत 5 बाद 179 : ग्युप्टिल 5, सीफर्ट 17 (13 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), कॉनवे 41 (29 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), फिलिप्स 22 (7 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), टेलर 0, नीशम नाबाद 48 (24 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), सँटनर (31 (18 चेंडूत 3 षटकार), अवांतर 15. गोलंदाजी : कॉट्रेल 1-30, ओशेन थॉमस 2-23, पोलार्ड 1-16, ऍलेन 2 षटकांत 32 धावा, विल्यम्स 2 षटकांत 33 धावा).

विंडीज-न्यूझीलंड खेळाडूंचा ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ला पाठिंबा

सामना सुरू होण्याआधी विंडीज व न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एक गुडघा टेकवत ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीला पाठिंबा दाखविला. क्रिकेट विंडीजने या खेळाडूंचा फोटो पोस्ट करून असमानता आणि वर्णद्वेषाविरुद्धचा लढा यापुढेही चालू राहणार असल्याचे स्पष्ट केले. या वर्षी अमेरिकेत निदर्शन झाले त्यावेळी जॉर्ज फ्लॉईड नामक आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीच्या मानेवर पोलिसांनी गुडघा टेकवल्यानंतर त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. तेव्हापासून या चळवळीला जोर आला आहे. जगभरातील अनेक क्रीडापटूंनी वर्णभेदाविरुद्धच्या या चळवळीला पाठिंबा देताना त्याबाबत आलेल्या अनुभवांचीही माहिती दिली आहे.

Related Stories

अमेरिकन गोलंदाज अली खान अबु धाबीत दाखल

Patil_p

मँचेस्टर युनायटेड उपांत्य फेरीत

Patil_p

एटीपीच्या प्लेअर कौन्सिल निवडणुकीतून जोकोव्हिचची माघार

Patil_p

न्यूझीलंडमध्ये जून महिन्यात टेनिस स्पर्धा

Patil_p

सेहवाग म्हणाला, ‘त्या’ पंचांनाच द्या सामनावीर पुरस्कार

Patil_p

केन्चुकी स्पर्धेत सेरेना खेळणार

Patil_p
error: Content is protected !!