तरुण भारत

भारतीय संघासमोर आव्हानांचा डोंगर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी वनडे आज

सिडनी / वृत्तसंस्था

‘टर्बो-चार्ज’ झालेल्या यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दुसऱया वनडे सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरेल, त्यावेळी प्रामुख्याने मालिकेतील अस्तित्व कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. यापूर्वी पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली, त्या पार्श्वभूमीवर, या लढतीत अधिक दडपण असेल. हे दडपण ते झुगारुन जोरदार पुनरागमन करु शकणार का, याचे येथे औत्सुक्य असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी या दुसऱया लढतीला सुरुवात होणार आहे.

यापूर्वी पहिल्या वनडेत भारताला 66 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी धावांचा फरक कमी महत्त्वाचा. पण, ज्या पद्धतीने संघाला नामुष्की स्वीकारावी लागली, ते अधिक चिंतेचे ठरले. त्या लढतीतील एकंदरीत चित्र पाहता, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांना अष्टपैलू खेळाडूंमधील पर्याय हाताशी असतील, याची खातरजमा करुन घ्यावी लागेल, हे देखील स्पष्ट झाले.

हार्दिक पंडय़ाने 76 चेंडूत 90 धावांची दमदार, विस्फोटक खेळी जरुर साकारली. पण, चॅम्पियन्स चषक 2017 मधील फायनलप्रमाणे येथेही केवळ त्याचे प्रयत्न विजय संपादन करुन देण्यासाठी अजिबात पुरेसे ठरणारे नव्हते. त्यातच पंडय़ाने आपण इतक्यात गोलंदाजी करु शकणार नाही, असे जाहीरपणे सांगत जखमेवर आणखी मीठ चोळले आहे. अगदी नजीकच्या कालावधीत तो गोलंदाजी करु शकला तरी टी-20 विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ असे प्रयोग करु शकणार नाही, हे देखील तितकेच स्पष्ट असणार आहे. भारताकडे पर्यायी अष्टपैलू खेळाडू नाहीत आणि त्याचप्रमाणे प्लॅन बी देखील नाही. त्यामुळे, भारताला सध्या जो संघ उपलब्ध आहे, त्यावरच आपली रणनीती काटेकोर राबवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

सध्या भारतीय संघात जे आघाडीचे फलंदाज आहेत, त्यांच्यापैकी एकालाही गोलंदाजी येत नाही व जे अव्वल गोलंदाज आहेत, त्यांना फलंदाजी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वतः विराटने आजवरच्या कारकिर्दीत दोन वा तीन षटके टाकली आहेत. पण, तो देखील आता फक्त इतिहास आहे.

खरे आव्हान गोलंदाजांसमोर

कर्णधार ऍरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांचा जो समाचार घेतला, तो पाहता भारतासमोर आजही आव्हानांचा मोठा डोंगर आ वासून उभा असणार आहे. जसप्रित बुमराह व कंपनीसमोरही नव्याने प्रयत्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.

भारताने पहिल्या वनडेत सपाटून मार खाल्ला असला तरी या लढतीत यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी यांना अनफिट जाहीर केल्याशिवाय, अंतिम संघात कोणतेही बदल होणार नाहीत, असे सध्याचे संकेत आहेत. चहल व सैनी यांनी मागील लढतीत आपल्या 20 षटकात तब्बल 172 धावांची खैरात बहाल केली होती. यापैकी, चहल आपला कोटा पूर्ण केल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने मैदानाबाहेर आला होता.

दुसरीकडे, सैनीला पाठदुखीचा त्रास सुरु आहे. सध्या संघव्यवस्थापनाने थंगसरु नटराजनला सैनीला पर्यायी खेळाडू या नात्याने संघात स्थान दिले.  आवश्यकतेनुसार, सैनीऐवजी शार्दुल ठाकुरला देखील पसंती मिळू शकते.

ग्रीनला संधी मिळण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियन मार्कस स्टोईनिस दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याऐवजी अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्णधार फिंच व स्मिथ या दोघांनीही ग्रीन वनडे पदार्पण करु शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार व यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, मयांक अगरवाल, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, टी. नटराजन.

ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हॅझलवूड, सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, कॅमेरुन ग्रीन, मोईसेस हेन्रिक्यूज, ऍन्डय़्रू टाय, डॅनिएल सॅम्स, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक).

सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : सकाळी 9.10 पासून.

थेट प्रसारण : सोनी नेटवर्क

संथ गतीने माऱयाबद्दल भारतीय संघाला दंड

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत संथ गतीने गोलंदाजीबद्दल भारतीय संघाला 20 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारताने या लढतीत 50 षटके पूर्ण करण्यासाठी चक्क 4 तास व 6 मिनिटे इतका वेळ घेतला होता. आयसीसी सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी या कारवाईची घोषणा केली. अगदी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने देखील आपण खेळलेला हा सर्वाधिक वेळ चाललेला वनडे सामना ठरला असल्याची प्रतिक्रिया दिली.

एकापेक्षा एक स्टार फलंदाज असले तरी भारतीय संघाकडे धोनीसारखा निपूण क्रिकेटपटू नाही, ही त्यांची मुख्य चिंता आहे. धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या गैरहजेरीत अशा मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करणे अर्थातच कष्टप्रद असणे साहजिक आहे.

-विंडीजचे महान गोलंदाज मायकल होल्डिंग

Related Stories

टेनिस स्पर्धेतून बार्टीची माघार

Patil_p

भारत- ऑस्ट्रेलिया कसोटीमालिकेला ऍडलेड किंवा ब्रिस्बेनमध्ये प्रारंभ होणार

Patil_p

दक्षिण आफ्रिकेच्या डावात रॉसी व्हान डर डय़ुसेनचे नाबाद शतक

Patil_p

गांगुलीच्या रक्ताचा अहवाल समाधानकारक

Patil_p

मुंबईचा 67 धावांनी विजय

Amit Kulkarni

सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स, एक्सेस इलाईट हुबळी संघ विजयी

Omkar B
error: Content is protected !!