तरुण भारत

26/11 च्या सूत्रधारावर वक्रदृष्टी

            12 वर्षांनी अमेरिकेचे पाऊल : 50 लाख डॉलर्सचे इनाम घोषित

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

2008 च्या मुंबईवरील हल्ल्यांच्या 12 वर्षांनी अमेरिकेने पाकिस्तानी सूत्रधार साजिद मीरवर 50 लाख डॉलर्सचे (सुमारे 37 कोटी रुपये) इनाम घोषित केले आहे. साजिद मीर हा हाफिज सईदची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे. मुंबईतील हल्ल्यांमध्ये 166 जण मारले गेले होते. मृतांमध्ये अमेरिकेसह अन्य देशांचेही नागरिक सामील होते.

युएस रिवॉर्ड्स फॉर जस्टिस प्रोग्रामकडून यासंबंधी विधान प्रसिद्ध करण्यात आले आहे. साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी दहशतवादी आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. त्याच्या अटकेवर 50 लाख डॉलर्सचे इनाम घोषित केले जात असल्याचे अमेरिकेच्या विभागाने म्हटले आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी हल्ले घडवून आणले होते. यात ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लियोपार्ड कॅफे, चबाड हाउस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस सामील आहे. 10 दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यास सुरक्षा दलांना यश आले होते. उर्वरित 9 दहशतवादी मारले गेले होते. कसाबला 11 नोव्हेंबर 2012 रोजी येरवडा तुरुंगात फासावर लटकविण्यात आले होते.

मीरने रचला कट

साजिद मीर लष्कर-ए-तोयबाच्या कटाचा नियंत्रक होता. त्यानेच हल्ल्याचा कट रचत त्याची तयारी केली होती. शिकागो येथील न्यायालयाने 21 एप्रिल 2011 रोजी मीर याला आरोपी घोषित केले होते. त्याच्यावर विदेशी सरकारांच्या विरोधात कट रचणे, नुकसान पोहोचविणे, दहशतवाद्यांना मदत करणे आणि नागरिकांच्या हत्येचा आरोप आहे.

दहशतवाद्यांना निर्देश

हल्ल्यांदरम्यान मीरने ओलीसांना ठार करण्याचा आणि ग्रेनेड फेकण्याचा निर्देश दहशतवाद्यांना दिला होता. 22 एप्रिल 2011 रोजी मीरच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले होते. 2019 मध्ये मीरला एफबीआयच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्यात आले होते.

Related Stories

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला घाबरू नका!

Patil_p

मेलबर्न शहरात 6 आठवडय़ांची टाळेबंदी

Patil_p

U-19 विश्वचषक : पाकिस्तानला नमवून भारत अंतिम फेरीत

prashant_c

दक्षिण अमेरिका : 70 लाखांहून अधिक

Patil_p

हिवाळय़ात धोका अधिक

Patil_p

कोरोना संसर्ग :चीनमध्ये 24 हजार जणांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!