तरुण भारत

जत्रोत्सवांवर कोरोनाचे नियंत्रण

प्रतिनिधी/ फोंडा

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव कोरोनाच्या सावटाखाली गेल्याने आता फोंडा तालुक्यात जत्रोत्सवांना सुरुवात होत आहे. जत्रोत्सवावरही कोरोनाचे नियंत्रण राहणार असून धार्मिक विधी व पारंपारिक रितीरिवाजांपुरतेच हे उत्सव साजरे करण्याचा बहुतेक देवस्थान समित्यांचा कल दिसतो. सोमवार 30 रोजी बोरी येथील श्री नवदुर्गा देवीचा कार्तिक पौर्णिमेचा जत्रोत्सव साजरा होणारा आहे. नागेशी बांदोडा येथील श्री नागेश देवाचा जत्रोत्सवही त्याच दिवशी आहे.

डिसेंबर महिना म्हणजे फोंडा तालुक्यात जत्रोत्सव व कालोत्सवाचा माहोल असतो. सध्या राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारने नुकतीच वर्तविली आहे. त्यामुळे थंडीच्या काळात खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. या पार्श्वभूमिवर जत्रोत्सवावर मर्यादा येणार आहेत.

बोरी येथील नवदुर्गा देवीच्या जत्रोत्सवात पारंपरिक दिवजोत्सव सामाजिक अंतर राखून होणार आहे. यावेळी केवळ दिवजधारी सुवासिनीनाच मंदिरात दर्शनाला प्रवेश देण्यात येणार असून अन्य भाविकांना ठरल्या वेळेत दर्शन घेण्याची सोय केली आहे. शिवाय पहाटे होणार नौकाविहार शनिवारी रात्री 10.30 वा. आटोपेल. मंदिरच्या परिसरात फेरी मर्यादित स्वरुपात म्हणजे काही मोजकीच मिठाईची दुकाने असतील. श्री नागेश व गावणे येथील श्री पूर्वाचार्य देवस्थानचा जत्रोत्सवही असाच मर्यादित स्वरुपात होणार आहे. पूर्वापार चालत आलेल्या प्रथा व सोपस्कार औपचारिक स्वरुपात असतील. नागेशीच्या दिवजोत्सवात नवीन दांपत्य व पहिल्यांदाच दिवज धरणाऱयांना प्रवेश असेल.

कालोत्सवांवर अनिश्चिततेची मर्यादा

9 डिसें. रोजी मडकई येथील श्री नवदुर्गा देवीचा प्रसिद्ध जत्रोत्सव असाच मर्यादित स्वरुपात व कोरोना संबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरुन साजरा होणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाने सांगितले. देवीला उपवासाचा नवस फेडण्यासाठी येणऱया भाविकांना सामाजिक अंतर राखून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. मात्र मंदिरच्या आवारात फेरी भरविली जाणार नाही. 14 व 15 डिसें. रोजी श्री कपिलेश्वर देवस्थान, खांडेपार शांतादुर्गा, अडकोण महिषासूर, सावईवेरे येथील खामिणी अशा एकाच दिवशी भरणाऱया जत्रांचे स्वरुप आटोपशीर ठेवण्यासंबंधी  सध्या नियोजन सुरु आहे.

जत्रोत्सवाबरोबरच सावईवेरे येथील प्रसिद्ध श्री अनंत देवस्थानचा कालोत्सव तसेच तालुक्यातील अन्य छोटय़ा मोठय़ा कालोत्सवांवरही कोरोनाचे सावट आहे.  काही देवस्थानांनी गर्दी टाळण्यासाठी रथोत्सव, नाटय़प्रयोग व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

खाजे व मिठाई व्यावसायाला फटका

जत्रोत्सवावर आलेल्या या मर्यादांचा थेट फटका खाजे व मिठाई विक्रेते तसेच फेरीत विविध वस्तू विकणाऱया छोटय़ा विक्रेत्यांना बसणार आहे. बऱयाच देवस्थानानी गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या प्राकारात फेरी भरविण्यावर मर्यादा घातल्या आहेत. शिवाय भाविकांचा जत्रोत्सवाला कसा प्रतिसाद लाभेल, यावर फेरीतील विक्रेत्यांचे व्यावसायिक गणित अवलंबून आहे. कोरोनासंबंधी लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यानंतर अनेक व्यवसाय सुरु झाले. मात्र जत्रोत्सवातील खाजे व मिठाई व्यवसाय गेल्या आठ महिन्यापासून थंडावला आहे. एप्रिलमधील शिरगांव येथील प्रसिद्ध लईराई जत्रोत्सव, श्रावण महिन्यात होणारा वास्को येथील दामोदर सप्ताह, मडगावातील दिंडी उत्सव यासह अनेक छोटे मोठे उत्सव कोरोनामुळे मर्यादित स्वरुपात साजरे करावे लागले. त्याचा थेट परिणाम या उत्सवांच्या माध्यमातून खाजे, गूळ व तिळाच्या रेवडय़ा, चणे-शेंगदाणे विकून उदरनिर्वाह करणाऱया स्थानिक व्यावसायिकांवर झाला. जत्रेला गेल्यानंतर देवाचा प्रसाद म्हणून खाजे किंवा बुंदीचे लागू घरी घेऊन येण्याचा अनेक वर्षांचा प्रघात आहे. फोंडा तालुक्यात या खाजे व्यावसायावर उदरनिर्वाह चालवणारी अनेक कुटुंबे आहेत. अगदी पन्नास वर्षाहून अधिक काळ खाजे व मिठाईचा व्यवसाय करणाऱया कुटुंबातील दुसरी व तिसरी पिढी आज या व्यावसायात उतरली आहे. जत्रोत्सवाचा काळ हा त्यांचा व्यावसायिक हंगाम. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचे संपूर्ण वर्ष हा व्यवसाय अडचणीत आहे. जत्रोत्सव काळात मंदिराच्या पायऱयांजवळ बसून फुलविक्री करणाऱया महिला, पानपट्टी, फुगे व खेळणी विकणाऱया फिरत्या विक्रेत्यांची अशीच बिकट स्थिती झाली आहे. नाटक व इतर करमणुकीच्या कार्यक्रमाना यंदाच्या जत्रोत्सवात स्थान नसल्याने कला क्षेत्रातही निराशजनकर वातावरण दिसते.

Related Stories

पालिका निवडणुकाही अचानक जाहीर होण्याची शक्यता

Amit Kulkarni

मला अयोग्य म्हणणारे लोकायुक्त कोण?

Patil_p

ब्रम्हकरमळीतील नागरिकांना जुलाब, उलटय़ा

Amit Kulkarni

वाळपई पालिकेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल

Amit Kulkarni

कोलवाळ तुरुंगात धान्यसाठय़ाचा काळाबाजार

Omkar B

विदेशात अडकलेल्यांना ‘आंग्रिया’ आणणार गोव्यात

Omkar B
error: Content is protected !!