तरुण भारत

बेरोजगारांच्या भावनांशी सरकारचा खेळ

काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10 हजार नोकऱयांचे गाजर दाखवून सरकारने बेरोजगारांच्या भावनांशी खेळू नये. प्रत्येक निवडणुकीवेळी खाणी सुरू करण्याचे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल करणारे सरकार या निवडणुकीत 10 हजार नोकऱयांचे गाजर दाखवत आहे. हे आश्वासन शुद्ध फटिंगपणाचे आहे हे न समजण्याएवढे लोक आता अज्ञानी राहिलेले नाहीत, हे सरकारने लक्षात ठेवावे, अशी समज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे.

काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी उपाध्यक्ष धर्मा चोडणकर आणि एम. के. शेख हेही उपस्थित होते. सरकार जेव्हा 10 हजार नोकऱयांचे आश्वासन देते, त्यासाठी पगारापोटी वार्षिक किमान 350 कोटी रुपये लागतील. एवढे पैसे सरकारजवळ आहेत का? तसे असल्यास दर महिन्यात कर्मचाऱयांना पगार देण्यासाठी कर्जे का घेतली जातात? असे सवाल श्री. चोडणकर यांनी केले. निवडणुकीनंतर खाणींप्रमाणेच हे आश्वासनसुद्धा हवेत विरून जाईल, असा दावा त्यांनी केला.

तसेच एवढे पैसे आहेत तर आधी दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, खलाशी यांचे कित्येक महिन्यांचे थकलेले मानधन द्यावे, तसेच 2017 पासून थकलेले लाडली लक्ष्मी योजनेचे पैसे द्यावे, असे ते म्हणाले. सदर 10 हजार नोकऱयासंबंधी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आलेली नाही हेही त्यांनी निदर्शनास आणले.

एवढी वर्षे खाणींची आश्वासने, आता 10 हजार नोकऱयांचे गाजर

यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक निवडणुकीत खाणी सुरू करण्याची आश्वासने देऊन खाण अवलंबितांच्या भावनांशी खेळ केला. आता डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक आहे. परंतु याही वेळी खाणींचेच आश्वासन दिल्यास लोक विश्वास ठेवणार नाहीत याची जाणीव झाल्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 10 हजार नोकऱयांचे आश्वासन देऊन बेरोजगारांच्या भावनांशी खेळ मांडला आहे. या सरकारने बेरोजगारांना नोकऱया तर दिल्या नाहीच, उलट नोकरीत असलेल्यांना बेरोजगार केले, असे आरोप चोडणकर यांनी केले. बेकारी एवढी का वाढली त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

म्हादईसंबंधी एनआयओचा अहवाल जाहीर करावा

म्हादईचे पाणी कमी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले हे एकाअर्थी बरेच झाले. तरीही म्हादईसंबंधी ते करत असलेली विधाने म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका चोडणकर यांनी केली. कितीतरी वर्षांपासून ही गोष्ट आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे प्रयत्न केले. त्याशिवाय एनआयओ या संस्थेनेही अहवाल तयार करून सादर केला. त्यात म्हादईचे पाणी वळविल्यास काय काय होऊ शकते, पर्यावरणाचा कसा संहार होऊ शकतो, त्यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मात्र सदर अहवाल लपवून ठेवण्यात आला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो जाहीर करावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले.

कर्नाटकात भाजपला बहुमत मिळावे यासाठी गोवा सरकारने म्हादईचा सौदा केला. तिला विकून टाकली. म्हादई हा आपली माता असल्याचे मुख्यमंत्री सांगतात, परंतु स्वतःच्या मातेला ते वाचवू शकले नाहीत. तरीही अद्याप वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारशी कठोर शब्दात बाजू मांडावी व वळविलेले पाणी पुन्हा आणण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी गरज असल्यास काँग्रेसही सरकारच्या खांद्यास खांदा लावून सहकार्य करण्यास तयार आहे. दिल्लीत, कर्नाटकात जेथे जायचे असेल तेथे येण्यास आम्ही तयार आहोत, असे चोडणकर म्हणाले.

पणजीतील 200 जणांचा काँग्रेस प्रवेश

पणजी मतदारसंघातील सुमारे 200 लोकांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गोमंतकीय कन्या पणजीतील रहिवासी तथा उत्तराखंडच्या माजी काँग्रेस मंत्र्याच्या पत्नी अंजली फर्नांडीस दोबाल यांनी त्यांचे नेतृत्व केले. त्यावेळी त्यांचे पती विशाल दोबाल आणि अन्य सहकारी उपस्थित होते. उत्तराखंडमध्ये आपण पतीच्या सोबत काँग्रेस पक्षासाठी आणि तेथील तळागाळातील लोकांसाठी मोठे कार्य केले आहे. आता आपणास गोव्यात काम करण्याची इच्छा झाली असल्याने कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे स्वागत करून पक्षात रितसर प्रवेश दिला. धर्मा चोडणकर यांनी सुत्रसंचालन केले.

Related Stories

राणे द्वयीने सत्तरीतील लोकांना लाचार बनविले

Amit Kulkarni

साखळी परिसरातील मतीमंद मुलांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कीटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण..!

Patil_p

अविश्वास ठराव आणण्यात आमदारांची भूमिका नाही

Patil_p

दोनापावलात 700 कोटींचे कन्व्हेंशन सेंटर

Omkar B

रेव्ह पाटर्य़ांसंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा मायकल लोबो यांची माहिती

Omkar B

भंडारी समाजात फूट घालण्याचे भाजपचे डावपेच

Amit Kulkarni
error: Content is protected !!