तरुण भारत

सेन्सेक्स 44 हजार पार : गाठला नवा उच्चांक

सेन्सेक्स 44,655.44 वर स्थिरावला : सन फार्माचे समभाग मजबूत

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

नव्या आठवडय़ातील पहिल्या दिवशी गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद राहिला तरी, दुसऱया दिवशी शेअर बाजाराने तेजीची उसळी घेत नवीन विक्रमांची नोंद केल्याचे पहावयास मिळाले आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावनेमुळे भांडवली गुंतवणूक मजबूत झाल्याने मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सने 506 अंकांची तेजी प्राप्त करत नवा विक्रम नोंदवला आहे.

दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टीनेही 13,100 अंकांचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत स्थितीत राहिला असून अन्य आशियाई बाजारातील सकारात्मक वातावरणाचाही फायदा शेअर बाजाराला मिळाल्याचे दिसून आले आहे. 

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरी-सोबत सेन्सेक्स 505.72 अंकांनी मजबूत होत निर्देशांक दिवसअखेर 44,655.44 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 140.10 अंकांच्या तेजीसह दिवसअखेर 13,109.05 वर स्थिरावला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये सन फार्माचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी वधारले आहेत. सोबत इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि बजाज ऑटोचे समभाग तेजीत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये कोटक बँक, नेस्ले इंडिया, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसीचे समभाग घसरणीत बंद झाले.

विदेशी गुंतवणुकीचा लाभ

उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 7,712.98 कोटी रुपयाच्या समभागांची खरेदी केली होती. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 37 पैशानी मजबूत होत 73.68 वर बंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात शांघाय, टोकीयो, हाँगकाँग आणि सियोल हे बाजार तेजीत राहिले होते. याच वेळी जागतिक बाजारातील ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव काहीसा घसरल्याचे दिसून आले आहे .

Related Stories

टीसीएस कंपनीचा बायबॅक झाला खुला

Patil_p

रिझर्व्ह बँक ठेवणार व्याजदर जैसे थे ?

Amit Kulkarni

आशा-निराशेच्या खेळात…

Omkar B

सहाशे डिलर्सच्या मदतीने मारुतीची विक्री पुन्हा सुरु

Patil_p

बिर्ला सनलाईफचा नवा बिझनेस सायकल फंड

Patil_p

एलईडी दिवे, एसी उत्पादनासाठी सरकार देणार प्रोत्साहन

Patil_p
error: Content is protected !!