तरुण भारत

वॉर अँड पीस

थोर समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्नांची आवर्तने निर्माण झालेली दिसतात. आमटे कुटुंबीयांमधील अंतर्गत कलह, परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपाची परिणती एखाद्याचा जीव जाण्यात व्हावी, हेच मुळात आनंदवनीय परंपरेला छेद देणारे म्हणावे लागेल. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या एकाकी अन् वेदनामय जीवनात आनंद फुलविण्यासाठी 1949 मध्ये ‘आनंदवन’ची मुहूर्तमेढ रोवली. बाबांनी कुष्ठरोग्यांना मानसिक आधार देतानाच त्यांच्यात जगण्याची नवी उमेद जागविली. इतकेच नव्हे त्यांच्याच श्रमातून औद्योगिक वसाहतही उभारत त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. त्यांच्या कठोर साधनेतूनच या रंजल्या-गाजल्या, समाजाने झिडकारलेल्या माणसांना नवा आत्मविश्वास मिळाला. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली. किंबहुना, त्यांचे जीवन स्वयंपूर्ण झाले. बाबांनी पेरलेल्या संस्कार मूल्यातच हे ‘आनंदाचे झाड’ अविरत फुलत राहिले. किंबहुना, अलीकडच्या काळात हे झाड, त्याचा प्रफुल्लितपणा आक्रसून ते काहीसे कोमेजल्यासारखे भासू लागले. हे पाहता त्याच्या संगोपनात कुठे काही कसर तर राहिली नाही ना, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण व्हावा. कोणतीही संस्था असो नि तिला कितीही मूल्याधिष्ठित वारसा असो, त्यात गृहकलह, अर्थकारण, स्वार्थकारण शिरले, की तिचा मूळ उद्देश हरवून ढाचा डळमळल्याशिवाय राहत नाही. आनंदवनची अलीकडच्या काळातील पार्श्वभूमी त्याच दिशेने जाणारी म्हणता येईल. बाबांच्या पश्चात आनंदवनची जबाबदारी डॉ. विकास आमटे यांच्याकडे आली. त्यानंतर त्यांचा मुलगा कौस्तुभ हा येथील कार्यभार पाहू लागला. मात्र, कारभारावरील टीकेनंतर पाच वर्षांपूर्वीच कौस्तुभ यांनी पदाचा राजीनामा दिला आणि डॉ. शीतल यांच्याकडे संस्थेची जबाबदारी आली. सामाजिक क्षेत्रात एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे वारसा हस्तांतरित होणे, हे चांगलेच. तथापि, नव्या पिढीच्या निष्ठा, प्रामाणिक व समन्वयवादी दृष्टिकोन, सामाजिक जाणिवा, वैचारिक पाया किती बळकट आहेत, हे महत्त्वाचे ठरते. आमटेंच्या तिसऱया पिढीचे सामाजिक भानही कदाचित चांगले असेल. किंबहुना, त्यापेक्षा अहंभाव, मीपणा तसेच भाऊबंदकीच अधिक महत्त्वाची ठरली काय, असे म्हणायला निश्चित जागा आहे. डॉ. शीतल या उच्चशिक्षित. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. हे सारे कौतुकास्पदच होय. स्वतंत्र विचारांच्या शीतल यांनी संस्थेला काळानुरूप बदलायचा ध्यास घेतला होता. त्याच अनुषंगाने डॉ. विकास आमटे यांच्यासोबतच्या जुन्या मंडळींना त्यांनी अर्धचंद्र दिला असावा. खरेतर कुठल्याही संस्थेला पुढे जाण्यासाठी व अधिक परिणामकारक कार्य करण्यासाठी कात टाकावीच लागते. अर्थात ती टाकताना जुन्या व अनुभवी पिढीतील काहींचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरते. बाबा कुष्ठरोग्यांच्या हातून वस्तू साकारल्या जाव्यात, याकरिता आग्रही असत. परंतु, मागची काही वर्षे हा प्रकल्प कसाबसा सुरू राहिला. संस्थेचा कारभार कार्पोरेट कल्चर वा एखाद्या खासगी कंपनीसमान केला जात असल्याचा आक्षेपही नोंदविण्यात येत होता. म्हणजे बाबांनी सुरू केलेले प्रकल्प कालबाहय़ झाले होते का? सतरंज्या, जाजम, टॉवेल, चादरी अशा कितीतरी वस्तू बाबांचे साधक बनवत. या साऱयात एक कलात्मकता, सर्जनशीलता होती. ही क्रिएटिव्हिटीच माणसाच्या जगण्याला समृद्ध करीत असते. परंतु, अशा प्रकल्पांना फाटा देऊन सारे काही बदलायचा ध्यास अनाठायी ठरतो. सुवर्णमध्य व परस्परांशी समन्वय साधूनही सारे काही सांधता आले असते. परंतु, नेमकी ‘ताणाताणी’ कशी, कुठे झाली, हे आमटे कुटुंबच जाणोत. डॉ. शीतल व त्यांच्या पतीवर एकाधिकारशाहीचे आरोप होणे, कार्पोरेट कल्चरसह कार्यकर्त्यांच्या छळाच्या तक्रारी पोलिसात दाखल होणे, समितीत पुन्हा कौस्तुभचा प्रवेश होणे, त्यातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून डॉ. शीतल यांच्याकडून महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांसंदर्भात गंभीर आरोप केले जाणे, त्यानंतर काही तासातच हा व्हीडिओ हटविला जाणे, डॉ. शीतल या मानसिक तणावात व नैराश्यात असल्याचा खुलासा डॉ. विकास व प्रकाश आमटे या बंधूद्वयाने करणे नि त्यानंतर डॉ. शीतल यांनी इतके टोकाचे पाऊल उचलणे, हे सारेच धक्कादायक होय. वास्तविक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून डॉ. शीतल या पुढे येत होत्या. ताणतणाव वा नैराश्यासारख्या विषयांवर त्या स्वत: समुपदेशन करत असत. अशा व्यक्तीने इतक्या टोकाला जावे, हेच मुळात आश्चर्यकारक. आत्महत्या हे उत्तर नाही, हे माहीत असूनही त्यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याने असे का करावे? जाण्याआधी एक पेंटिंग रेखाटत त्यावर ‘वॉर अँड पीस’ अशी अस्वस्थता त्या कोरून गेल्या. महान रशियन लेखक लिओ टॉलस्टॉल यांची ‘वॉर अँड पीस’ ही कादंबरी जगप्रसिद्ध आहे. या कादंबरीतून त्यांनी शांततेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. टॉलस्टॉय यांनी धन, ऐश्वर्याऐवजी त्यागास सर्वश्रेष्ठ मानले. आधी स्वत:मध्ये बदल घडविण्याचा संदेश दिला. म्हणूनच महात्मा गांधींच्या विचारांवरही त्यांचा विलक्षण प्रभाव पडला. युद्ध केवळ सीमेवर, दोन देशांतच होते असे नाही. एका संस्थेत, कुटुंबा-कुटुंबात, व्यक्ती-व्यक्तीत जिथे-तिथे युद्ध, लढाया होतात. त्या अर्थी मानवी जीवन हे युद्धांनीच भरलेले. गृहयुद्ध असो वा समूहयुद्ध. जाणिवांच्या अभावाने व अर्थदास्यातूनच प्रश्न निर्माण होतात. मतभेद, वाद यापुढेही झडतच राहतील. पण, सुसंवाद व परोपकारी वृत्तीतूनच शांततामय जग निर्माण होईल. आनंदवनला हाच वारसा आहे. पैशापेक्षा मूल्ये, पारदर्शकता महत्त्वाची, हे ध्यानात घेऊन हीच निर्लेप ‘आनंदी’ परंपरा पुढे सुरू रहावी.

Related Stories

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p

अमरत्व याहून वेगळे काय?

Patil_p

बिहारमधील निवडणुकीत चमत्कार होणार काय?

Patil_p

उत्तराखंडमधील बदल,भाजपपुढील आव्हाने

Patil_p

जड मूक पिशाच्च

Patil_p

संगीतऋषी

Patil_p
error: Content is protected !!