तरुण भारत

बेंगळूर, शिमोगा, बळ्ळारीत प्रादेशिक लसीकरण केंद्रे

आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती :  तिसऱया टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर लस वितरण

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

बेंगळूर, शिमोगा आणि बळ्ळारी येथे प्रादेशिक लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील. राज्यात 10 व्हॅक्युम कुलर, 4 फ्रीजर उपलब्ध असून केंद्र सरकारकडून अतिरिक्त 3 व्हॅक्युम कुलर आणि दोन फ्रीजर उपलब्ध होणार आहेत. कोणत्याही त्रुटींविना लस वितरण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. साधारणतः 1,600 ते 1,700 जणांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर राज्यात लस वितरणासाठी सर्व व्यवस्था करण्यात येईल. राज्यात 29,451 लसीकरण केंद्रे स्थापन केली आहेत. लसवितरणासाठी 1,008 वॅक्सिनेटर उपलब्ध करण्यात येतील. तसेच लस साठविण्यासाठी 2,852 कोल्ड स्टोअरेज (शितगृह) निर्माण करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

भारत बायोटेक कंपनीच्या लसीची तिसऱया टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची जबाबदारी आयसीएमआर आणि कंपनीने बेंगळूरमधील वैदेही इस्पितळावर सोपविली आहे. 12 राज्यांमध्ये या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. या राज्यांमधील एकूण 25 भागांमध्ये 25 हजार जणांवर लसीची चाचणी होणार आहे. कर्नाटकात 1,600 ते 1,800 जणांवर चाचणी करण्यात येईल. लसीचे दुष्परिणाम दिसून आल्यास तज्ञ आणि डॉक्टर समस्या सोडवतील, असेही त्यांनी सांगितले.

25 कंपन्यांच्या लसीचे उत्पादन अंतिम टप्प्यात

देशातील एकूण 50 कंपन्यांकडून कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरू आहे. त्यापैकी 25 कंपन्यांच्या लसीचे उत्पादन अंतिम टप्प्यात आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जगातील इतर देशांना देखील भारताकडून लसपुरवठा करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना योद्धय़ांना लस देण्यात येईल. नंतर 50 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील कानाकोपऱयात लस पोहोचविण्यात येईल, अशी माहितीही डॉ. सुधाकर यांनी यावेळी दिली.

लस वितरण व्यवस्थेसाठी 300 कोटी

केंद्र सरकारने कोरोनावरील लसीच्या संशोधनासाठी 900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी लस वितरण व्यवस्थेसाठी 300 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. दररोज 1 लाख 25 हजार जणांची मोफत कोविड चाचणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत एकूण 1 कोटी 20 लाख जणांची मोफत कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

Related Stories

कर्नाटक: भारतीय तटरक्षक दलाकडून समुद्रात अडकलेल्या २४ मच्छिमारांची सुटका

Abhijeet Shinde

बेंगळूर : शाळा वेळेचे पालन करत नाहीत

Abhijeet Shinde

पुढील आदेशापर्यंत केएसआरटीसी नवीन कर्मचारी भरणार नाही

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी एपीएमसी बंद

Abhijeet Shinde

ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम

Abhijeet Shinde

आजपासून राज्यातील 19 जिल्हे अनलॉक

Amit Kulkarni
error: Content is protected !!