तरुण भारत

गुहागरच्या टंचाई कृती आराखडय़ात 45 गावे 169 वाडय़ा

56 नळपाणी योजनांची दुरूस्ती, 36 विहिरींचे वृद्धीकरण, 15 विहिरींमधील गाळ काढणार, तर 64 विंधन विहिरींच्या दुरूस्तीचा प्रस्ताव

प्रतिनिधी / गुहागर

Advertisements

तालुक्यातील 2020-21 च्या टंचाई कृती आराखडय़ामध्ये 7 गावांतील 20 वाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा समावेश केला असला तरी तालुक्यातील सर्वच गावे सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी टंचाई कृती आराखडय़ामध्ये 45 गावांतील 169 वाडय़ांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी नळपाणी योजना दुरूस्ती, विहिरींचे वृद्धीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरूस्ती अशी उपाययोजना घेऊन यावर मात करण्याचे नियोजन आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर पंचायत समितीत टंचाई कृती आराखडा बैठक पार पडली. बैठकीतून प्रत्येक गावातील पाण्याच्या समस्येवर सविस्तर चर्चा करत त्या गावातील विविध योजनांची माहिती व त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर सविस्तर चर्चा व उपाययोजना आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी सूचवल्या. या अगोदर सर्व अधिकारी ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. यामध्ये या योजनांचा पूर्णपणे बट्टय़ाबोळ उडाला आहे. या कामांचे टेंडर घेणारा हा प्रत्यक्ष काम करत नाही. यामध्ये सुशिक्षीत बेरोजगार, सोसायटय़ा यांचा समावेश असून यातून कामाचा दर्जा खालावत आहे. यामुळे यापुढे केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशन योजना राबवली असून यामध्ये सर्व योजना या पाणी पुरवठा विभागाकडून उभ्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक योजना जास्त काळ टीकेल अशा दर्जेदार उभ्या करूया, असे आवाहन उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांना केले. तसेच योजना लवकरात-लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सरपंच व तेथील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, असेही आवाहन आमदार जाधव यांनी केले.

यावर्षीच्या टंचाई कृती आराखडय़ात एकूण 45 गावांमधील 169 वाडय़ांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी तालुक्यातील 7 गावांमधील 20 वाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मासू, झोंबडी, सडेजांभारी, पाचेरीसडा, साखरी त्रिशुल, काताळे, धोपावे या गावांचा समावेश आहे. टंचाईवर मात करण्यासाठी यावर्षी 56 नळपाणी योजनांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. 36 विहिरींचे वृद्धीकरण, 15 विहिरींचा गाळ उपसणे तर 64 विंधन विहिरींच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

धोपावे नळपाणी योजना होणार सुरू

आमदार भास्कर जाधव यांनी टंचाई कृती आराखडा बैठकीनंतर धोपावे येथून आलेल्या ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन धोपावे नळपाणी योजना सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाल्याची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंता अपूर्वा पाटील यांच्यासमवेत चर्चा करून धोपावे नळपाणी योजनेसाठी पाण्याच्या उद्भवाची निर्माण झालेल्या समस्येवर मोडकाघर येथील धरणातून पाणी आणण्यासंदर्भातील उपाययोजना सुरू असल्याचे यावेळी सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, गटविकास अधिकारी अमोल भोसले, तहसीलदार लता धोत्रे, उपसभापती सुनील पवार, सभापती विभावरी मुळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर व सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. 

Related Stories

गणपतीपुळेत बुडणाऱया पाच तरूणांना वाचवले

Patil_p

देवरुख-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळल्याने 2 तास वाहतुक ठप्प

Patil_p

संगमेश्वरजवळ भीषण अपघात

triratna

धोकादायक ठिकाणच्या कुटुंबांची स्थलांतर प्रक्रिया सुरू

Patil_p

रत्नागिरी (संगमेश्वर) : पेढांबे खाडीमध्ये सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर वाळू उपसा

triratna

अपघातप्रकरणी 16 रेल्वे कर्मचाऱयांची होणार चौकशी?

Patil_p
error: Content is protected !!