तरुण भारत

नारदांनी पत्ता दिला

महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-

शुक्लमाधवीं द्वादशीनिशीं । स्वप्नी उषाअनिरुद्धेसी। योग झाला मग तयासी । शोणितपुरासी तिहीं नेलें। तेथें उषेचें पाणिग्रहण । केलें गान्धर्वविधानेंकरून। यावत्काळ वनितारत्न। भोगीं वेधून राहिला । बाणासुरासी हा वृत्तान्त । विदित होतां झाला तप्त। सवें घेऊनि प्रचंड दैत्य। अनिरुद्धातें धरूं गेला । येरें परिघप्रहारातळीं । झोडिली शत्रुवर्गाची फळी । प्रचंड दैत्य मारिले बळी। केली रवंदळी रणाङ्गणीं । रथही बाणाचा भंगिला । अन्यरथीं तो वळघला ।  तेणें नागपाशीं बांधिला । निरोधें रक्षिला अनिरुद्ध । भगवंतासी पूर्वींच विदित। तथापि वर्ते अज्ञवत ।  साधावया अवतारकृत्य । करावया दैत्यमदभंग ।

अनिरुद्ध कुठे नाहीसा झाला? त्याला कुणी उचलून नेला याविषयी द्वारकेतील लोक विविध तर्क वितर्क करीत होते. दोन वर्षे झाली तरी अजूनी अनिरुद्धाचा पत्ता सापडला नव्हता. सर्व लोक शोक करीत होते. अशावेळी एकदा देवषी नारद फिरत फिरत शोणितपुरात पोहोचले. तिथे त्यांनी नागबंधनात बांधलेला अनिरुद्ध पाहिला. त्यांना अत्यंत वाईट वाटले. चतुर नारदांनी अनिरुद्ध तिथे कसा आला, त्याला कोणी आणला, पुढे काय झाले याविषयी सर्व माहिती मिळवली व ते थेट द्वारकेत दाखल झाले. ते राजा उग्रसेनासमक्ष हजर झाले. अनिरुद्ध सध्या बाणासुराच्या बंधनात शोणितपुरात आहे असे त्यांनी सर्वांना सांगितले. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. मग नारदांनी तो तिथे कसा पोहोचला याविषयी सांगताना उषेला भवानी मातेने दिलेला वर, तिचे व अनिरुद्धाचे स्वप्नातील मिलन, चित्रलेखेने तिला केलेले सहाय्य, अनिरुद्ध व उषेचा झालेला विवाह, अनिरुद्धाचा पराक्रम व बाणासुराने त्याला नागपाशात बांधून ठेवणे या सर्व घटना सविस्तर वर्णन करून सांगितल्या. वास्तविक सर्वज्ञ असणाऱया भगवान श्रीकृष्णाला हे सर्व माहीत होते, पण अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी तो काहीही बोलला नाही.

नारदमुखें सकळामाजीं । आपण ऐकता झाला सहजीं। अनिरुद्धाची शुद्धि आजी । लागली म्हणोनि प्रकाशी ।सभास्थानीं उग्रसेन । कृष्ण प्रद्युम्न संकर्षण। अनिरुद्धउषापाणिग्रहण। युद्ध दारुण दैत्येंसीं । अनिरुद्धातें नागपाशीं । बाणें बांधिलें रणभूमीसी। यादवीं गोष्टी ऐकूनि ऐसी। परम आवेशीं उठावले । कृष्णचि ज्यांची उपासना। कृष्णावीण न भजती आना ।  कृष्ण दैवत यादवगणां । श्रीकृष्णाज्ञा त्यां होतां । ठोकिल्या प्रस्थानकुंजरभेरी। सन्नद्ध झाले ते शस्त्रास्त्रीं । प्रळययुद्धाची सामग्री । सेना आसुरी भंगावया । लघुतर यादवांचा अंकित । पाहूं न शके त्या कृतान्त ।  तेथ प्रत्यक्ष मन्मथसुत । बांधिती दैत्य हें नवल । आजी विध्वंसूं शोणितपुर । समरिं मारूं बाणासुर ।  आडवा येईल जरी शङ्कर । तरी त्या नि÷gर करूं शिक्षा । परमदुर्मद यादवसैन्य । रात्रंदिवस इच्छिती रण ।  त्यांसी हे वार्ता होतां श्रवण । क्षोभें दारुण उठावले । प्रतापें शोणितपुराप्रति । यादव जाते झाले किती ।  वीरांसहित सेनागणती । ऐक निश्चिती कुरुवर्या ।

Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

जागतिक भाषातही आता स्री -पुरुष समतेचा आग्रह

Patil_p

कृष्णपंक्ती नाहीं उणें

Patil_p

वीज बिल सवलतीने वर्षपूर्ती व्हावी!

Patil_p

विद्यार्थ्यांबरोबरच राजकारण्यांचीही ‘शाळा’ घेणे गरजेचे

Patil_p

सत्यजित रे यांचा नायक!

Patil_p

महाराष्ट्र कोरोनामुक्त कधी होणार?

Patil_p
error: Content is protected !!