तरुण भारत

अन्नदाता सुखी भव।

 सध्या देशात अनेक ठिकाणी सरकार विरोधात शेतकऱयांची आंदोलने सुरू आहेत. त्यांच्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी, आपले गाऱहाणे मायबाप सरकारसमोर मांडण्यासाठी हे अन्नदाते शेतकरी एकवटले आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न होतील, अशी आशा करूया.

शेतकऱयाने शेतीच करायचे सोडून दिले तर आपल्यासारख्या सामान्यांचे काय होईल? कशीही परिस्थिती आली, तरी ते शेती करतात, म्हणूनच आपण जगू शकतो. त्यांच्या कष्टातून, घामातून सोन्यासारखे रान पिकते. त्यांचा उद्योगीपणाच याला कारणीभूत असतो. अनेक कर्मयोग्यांनी या उद्योगीपणाचे महत्त्व जाणले, म्हणूनच ते थोर पदाला पोचले. भारतीय संस्कृतीतही उद्योगीपणाचे गोडवे गायिले आहेत. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी:। दैवेन देयमिति कापुरुषा वदन्ति। दैवं निह्रत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या। यंत्ने कृते यदि न सिध्यन्ति कोए त्र दोष:।।   अर्थ :-उद्योग करणाऱया पुरुषसिंहाकडे लक्ष्मी जाते. दैवाने द्यावे असे दुर्बल लोक म्हणतात. दैव मारून स्वशक्तीने पराक्रम कर. प्रयत्न करून यश मिळाले नाही तर कोणाचा दोष?…येथे दैव आणि उद्योग यांचा सुरेख समन्वय केला आहे. जमीन नांगरून मशागत करणे हा प्रयत्नांचा भाग आहे तर पाऊस पडून शेती पिकणार हा दैवाचा भाग आहे. तरीही जर पाऊस नाही पडला, तर दोष कोणाचाच नाही. प्रयत्न माणसांच्या हाती असतात, दैव मात्र नसते. तरीही ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ यावर श्रद्धा असणाऱयांच्या हातूनच मोठी कार्ये घडतात, हे आपण पाहतो. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे, प्रयत्नांती परमेश्वर, असाध्य ते साध्य करिता सायास इत्यादी वाक्प्रचार केवळ वाचण्यापुरते किंवा दुसऱयाला सांगण्यापुरते नाहीत, ते प्रत्येकाने आचरणात आणणे महत्त्वाचे. एका हाताने जशी टाळी वाजत नाही, त्याप्रमाणे उद्योगाशिवाय कर्माचे फळ मिळत नाही. बळीराजा शेतात राबला नाही तर सर्वांनाच प्रिय असणारे धान्य कसे बरे पिकणार? एक कवी म्हणतो… नास्ति मेघसमं तोयं नास्ति चात्मसमं बलम्। नास्ति चक्षु:समो तेजो नास्ति धान्यसमं प्रियम्।।  अर्थ:-मेघाच्या पाण्यासारखे पाणी नाही, आत्मबलासारखे बल नाही, डोळय़ाच्या तेजासारखे तेज नाही, धान्य यासारखे प्रिय काही नाही…..आपली सारी पक्वान्ने, जेवणातील रुचकर पदार्थ धान्यापासून बनतात. ते माणसांना प्रिय असतात. कारण उपाशीपोटी माणूस फार काळ जगू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही. त्याच्या शरीराचे व पर्यायाने मनाचेही पोषण होऊ शकत नाही. म्हणूनच तो बळीराजा. तो सुखी तर आपण सारेच सुखी. म्हणूनच आपण साऱयांनीच त्याला दुवा देत म्हटले पाहिजे, अन्नदाता सुखी भव।

Related Stories

दोष न ठेवावा आम्हासी

Patil_p

मनास समजून घेताना!

Patil_p

केली उत्पन्न विष्णुमाया

Patil_p

जोडा विघडला बंधूंचा

Patil_p

ज्येष्ठ नागरिकांची बसमधली भांडणे

Patil_p

स्पष्ट दिसणाऱया स्वच्छ गोष्टी

Patil_p
error: Content is protected !!