तरुण भारत

नेज येथील 14.32 एकर ऊस आगीत खाक

लाखो रुपयांचा ऊस,  ठिबक, बोअरवेल पंपसेट, पाईपलाईन वितळले

वार्ताहर/ बेडकिहाळ

नेज  (ता. चिकोडी) येथील काडसिद्धेश्वर व हालसिद्धनाथ मंदिर परिसरातील  नेज  सर्व्हेमधील सुमारे 14 एकर 32 गुंठे उसाच्या फडाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवार दि. 4 रोजी दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घडली.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मालाश्री सदाशिव मालगी यांच्या सर्व्हे नं. 204/5 मधील 3 एकर क्षेत्रातील ऊस बेडकिहाळ येथील साखर कारखान्याला गळितास तोड करण्यात येत होता. दुपारच्या सत्रात 6 बैलगाडय़ा भरून कारखान्याला रवाना करण्यात आल्या होता. एका बैलगाडीमध्ये अद्याप ऊस भरण्यात येत असताना पूर्वेकडून एका उसाच्या फडातून अचानक आग लागल्याचे समजले. बघता बघता आग ऊस तोड होणाऱया फडापर्यंत पोहचली. फडातून बैलांना घेऊन ऊसतोड मजूर पळू लागले. याच दरम्यान फडात ऊस भरत असलेल्या बैलगाडीला आग लागल्याने टायरचा मोठा स्फोट झाला. बैलगाडीत भरण्यात आलेल्या उसासह गाडी देखील जळाली. यानंतर वाऱयाचा जोर वाढत असल्याने परिसरातील सर्वच उसाच्या फडांना आग लागत गेली.

यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी त्वरित घटनेची माहिती सदलगा व चिकोडी येथील अग्निशमन दलाला दिली. दुपारी 1 च्या नंतर सदर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्मयात आणण्यासाठी तारेवरची कसरत केली. यावेळी अग्निशमन दल वेळेत हजर झाल्याने पुढील अनेक एकर ऊस जळण्यापासून वाचला.

या घटनेत श्रीकांत आण्णासाहेब नसलापुरे यांचा 7 एकरातील ऊस व सर्व पाईपलाईन, ठिबक सिंचन जळून खाक झाले. तर कल्लाप्पा मनगेनी गावडे यांचा 1 एकर 20 गुंठे क्षेत्रातील ऊस व ठिबक, तर सूर्याप्पा राघू गावडे यांचा 1 एकर  20 गुंठे ऊस व ठिबक तसेच मोटर पंपसेट, केबल जळालेली आहे. तसेच मालाश्री सदाशिव मलागी यांचा 3 एकर 32 गुंठे ऊस व ठिबक सिंचन व प्रवीण बाबासाहेब चौगुले यांचा 1 एकर ऊस व ठिबक सिंचन जळाले. या सर्व शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. या घटनेत सुमारे 14 एकर 32 गुंठय़ावरील ऊस जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

कोरोनाविरोधात संघटित लढा देणे गरजेचे

Patil_p

शंकरगौडा पाटील यांनी दिल्लीत स्वीकारली सुत्रे

Patil_p

एटीएसमधील आणखी दोन जवानांना कोरोना

Patil_p

संतिबस्तवाड प्राथ. कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

Omkar B

युवा समितीतर्फे उद्या जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Patil_p

तालुक्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

tarunbharat
error: Content is protected !!