तरुण भारत

भारताची कांगारुंना सणसणीत चपराक!

पहिल्या टी-20 लढतीत विराटसेनेचा 11 धावांनी धडाकेबाज विजय, 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी

कॅनबेरा / वृत्तसंस्था

दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाने फलंदाजीत आपली जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर त्याच्याऐवजी कन्कशन बदली खेळाडू या नात्याने संघात आलेल्या यजुवेंद्र चहलने 25 धावातच 3 बळी गारद केले आणि या उभयतांच्या दमदार योगदानामुळे भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला पहिल्या टी-20 सामन्यात अगदी सणसणीत चपराक दिली. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रारंभी, जडेजाच्या 23 चेंडूतील नाबाद 44 धावांच्या झंझावातामुळे भारताने 20 षटकात 7 बाद 161 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 150 धावांवर समाधान मानावे लागले. 

भारताच्या या पहिल्या विजयात पदार्पणवीर थंगसरु नटराजन (3-30) व ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर (4 षटकात 0-16) यांचे योगदानही तितकेच तोलामोलाचे ठरले. आयसीसी मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी पाहुण्या संघाला ‘समान ताकदीच्या खेळाडूला समान ताकदीच्या खेळाडूचा पर्याय’ या न्यायाने जडेजाऐवजी चहलला संघात समाविष्ट करुन घेण्याची परवानगी दिली आणि ही बाब भारतासाठी विशेष फलद्रूप ठरली. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर मात्र या निर्णयावर तीव्र नाराज असल्याचे दिसून आले.

त्यातच चहलने आपल्या पहिल्या दोन षटकातच ऍरॉन फिंच व स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही बहरातील फलंदाजांना बाद करत जस्टीन लँगरच्या जखमेवर जणू आणखी मीठ चोळले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चहलला सामोरे जाण्याची मानसिकताच नव्हती आणि चहलने त्यांना सातत्याने चकवे देण्याची मालिकाच सुरु केली. चहलने याशिवाय, मॅथ्यू वेडला देखील तंबूचा रस्ता दाखवला आणि 4 षटकात 25 धावात 3 बळी, असे पृथक्करण नोंदवले. विजयासाठी 162 धावांचे आव्हान असताना ऑस्ट्रेलियाला 11 धावा कमी पडल्या.

केएल राहुलची फटकेबाजी

तत्पूर्वी, उपकर्णधार केएल राहुलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपला बहारदार फॉर्म येथेही कायम राखला. मात्र, डावाच्या शेवटी झंझावाती फलंदाजी साकारणारा रविंद्र जडेजा येथे खरा हिरो ठरला. राहुलने 40 चेंडूत 51 धावा केल्या. धवन (1) व कर्णधार विराट (9) मात्र स्वस्तात बाद झाले. मनीष पांडेलाही 2 धावांवर तंबूचा रस्ता धरावा लागला.

11 ते 15 या षटकादरम्यान लेगस्पिनर ऍडम झाम्पा (4 षटकात 1-20) व अष्टपैलू मोईसेस हेन्रिक्यूज (4 षटकात 3-22) यांनी ऑस्ट्रेलियाला किंचीत वर्चस्व प्राप्त करुन दिले. पण, त्यानंतर जडेजा क्रीझवर आला आणि 23 चेंडूत 44 धावांची आतषबाजी करत त्याने संघाला 20 षटकात 7 बाद 161 धावांपर्यंत नेले.

जडेजाच्या फटकेबाजीमुळेच जोश हॅझलवूड व स्टार्कच्या शेवटच्या 2 षटकात भारताला 34 धावांची लयलूट करता आली. सॅमसन (15 चेंडूत 23) व हार्दिक पंडय़ा (15 चेंडूत 16) अनुक्रमे हेन्रिक्यूज व झाम्पाचे बळी ठरले. मिशेल स्टार्कने 34 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

धावफलक

भारत : केएल राहुल झे. ऍबॉट, गो. हेन्रिक्यूज 51 (40 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), शिखर धवन त्रि. गो. स्टार्क 1 (6 चेंडू), विराट कोहली झे. व गो. स्वेप्सन 9 (9 चेंडूत 1 चौकार), संजू सॅमसन झे. स्वेप्सन, गो. हेन्रिक्यूज 23 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे झे. हॅझलवूड, गो. झाम्पा 2 (8 चेंडू), हार्दिक पंडय़ा झे. स्मिथ, गो. हेन्रिक्यूज 16 (15 चेंडूत 1 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 44 (23 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), वॉशिंग्टन सुंदर झे. ऍबॉट, गो. स्टार्क 7 (5 चेंडूत 1 चौकार), दीपक चहर नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 7 बाद 161.

गडी बाद होण्याचा क्रम

1-11 (धवन, 2.5), 2-48 (विराट, 6.4), 3-86 (सॅमसन, 11.1), 4-90 (पांडे, 12.4), 5-92 (केएल राहुल, 13.5), 6-114 (पंडय़ा, 16.5), 7-152 (वॉशिंग्टन सुंदर, 19.3).

गोलंदाजी

स्टार्क 4-0-34-2, हॅझलवूड 4-0-39-0, झाम्पा 4-0-20-1, ऍबॉट 2-0-23-0, स्वेप्सन 2-0-21-1, हेन्रिक्यूज 4-0-22-3.

ऑस्ट्रेलिया : डॅर्सी शॉर्ट झे. पंडय़ा, गो. नटराजन 34 (38 चेंडूत 3 चौकार), ऍरॉन फिंच झे. पंडय़ा, गो. चहल 35 (26 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. सॅमसन, गो. चहल 12 (9 चेंडूत 1 षटकार), मॅक्सवेल पायचीत गो. नटराजन 2 (3 चेंडू), हेन्रिक्यूज पायचीत गो. चहर 30 (20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मॅथ्यू वेड झे. कोहली, गो. चहल 7 (9 चेंडू), ऍबॉट नाबाद 12 (8 चेंडूत 1 षटकार), स्टार्क त्रि. गो. नटराजन 1 (2 चेंडू), स्वेप्सन नाबाद 12 (5 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 5. एकूण 20 षटकात 7 बाद 150.

गडी बाद होण्याचा क्रम

1-56 (फिंच, 7.4), 2-72 (स्मिथ, 9.5), 3-75 (मॅक्सवेल, 10.3), 4-113 (शॉर्ट, 14.6), 5-122 (वेड, 16.6), 6-126 (हेन्रिक्यूज, 17.4), 7-127 (स्टार्क, 18.1).

गोलंदाजी

दीपक चहर 4-0-29-1, वॉशिंग्टन सुंदर 4-0-16-0, मोहम्मद शमी 4-0-46-0, टी. नटराजन 4-0-30-3, यजुवेंद्र चहल 4-0-25-3.

अन् संघात समाविष्ट नसणाऱया यजुवेंद्र चहलने चक्क 3 बळी घेतले!

फिरकीपटू यजुवेंद्र चहलचा भारताने या सामन्यात समावेश केला नव्हता. पण, रविंद्र जडेजाला डावातील शेवटच्या षटकात हेल्मेटवर चेंडू आदळल्यानंतर कन्कशन नियमाचा लाभ घेत भारताने चहलला संघात घेतले आणि कन्कशन नियमानुसार, क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करणे शक्य असल्याने चहलला संधी मिळाली व त्यानेही या संधीचे सोने करत 30 धावात 3 बळी घेतले. जडेजा डावाच्या प्रारंभीही धोंडशिरेच्या दुखापतीने त्रस्त होता. 

कन्कशन बदली खेळाडू या नात्याने सामनावीर ठरणारा चहल पहिला खेळाडू

आंतरराष्ट्रीय सामन्यात कन्कशन बदली खेळाडू या नात्याने संघात समाविष्ट होत सामनावीर पुरस्कारही मिळवणारा यजुवेंद्र चहल हा पहिला क्रिकेटपटू ठरला. या सामन्यात भारताची फलंदाजी असताना रविंद्र जडेजाने 23 चेंडूत 44 धावांची आतषबाजी केली तर जडेजा क्षेत्ररक्षण करु शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने कन्कशन नियमानुसार चहलचा समावेश केला. चहलने आपल्या पहिल्या 2 षटकात ऍरॉन फिंच व स्टीव्ह स्मिथ यांचे बळी घेतले तर नंतर मॅथ्यू वेडला देखील तंबूचा रस्ता दाखवला.  

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगरची सामनाधिकाऱयांशी हुज्जत

भारताने नियमाचा लाभ घेत जायबंदी रविंद्र जडेजाऐवजी कन्कशन म्हणून चहलला संघात घेतले असले तरी ही बाब ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाच्या अजिबात पचनी पडली नसल्याचे स्पष्ट झाले. ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याशी याबाबत हुज्जत घातली व जडेजा  दुखापतग्रस्त झाला असला तरी त्याने डाव पूर्ण केला असल्याचे निदर्शनास आणून दिले. डेव्हिड बून यांनी मात्र आपला निर्णय कायम ठेवला आणि लँगर यांच्यासह ऑस्ट्रेलियन संघाचीही निराशा झाली.

उभय संघातील दुसरी टी-20 उद्या सिडनीत होईल.

Related Stories

बेंगलोर एफसीने साधली नॉर्थईस्टशी बरोबरी

Omkar B

स्मृती मानधनाची वनडे मानांकनात घसरण

Patil_p

भारताचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

Patil_p

मिहिर सावंत केरळा एफसीचे गोलरक्षक प्रशिक्षक

Omkar B

संपूर्ण भारतीय पुरूष बॅडमिंटन संघ आयसोलेशनमध्ये

Patil_p

मदुशनकाचा करार रद्द होण्याची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!