तरुण भारत

अन्न व्यवहारांचा ताळेबंद (फूड बॅलन्स शीट)

अन्न व्यवहारांच्या ताळेबंदामुळे देशातील अन्न पुरवठय़ाचे सयुक्तिक आकलन होते. ताळेबंद याचा अर्थ आय-व्यय व्यवहाराचे गणित असे असले तरी फूड बॅलन्स शीट संकल्पनेमध्ये शेतकऱयाला आपल्या शेतमालाच्या मागणी-पुरवठय़ाचे संतुलन साध्य करता येते. सध्या पुरवठाप्रणीत धोरणांच्या प्रभावामुळे अन्न सुरक्षितता, पणन सुविधा व संरचना प्रक्रिया उद्योग आणि ग्राहकांच्या बास्केटसाठी मांडून ठेवलेल्या वस्तू अशी व्यवस्था अस्तित्वात आहे. शेतमालाच्या लागवडीचा निर्णय सर्वस्वी शेतकऱयांचाच आहे. मागणीप्रणीत धोरणामध्ये ग्राहकांच्या बास्केटसाठीच कृषीमालाचे उत्पादन करावे लागते. म्हणून सुरक्षित अन्नव्यवस्था, फोर्क टू फार्म, पोषणमूल्य शेतमालाचे उत्पादन, ग्राहक केंद्री उत्पादन मूल्य निर्मितीची प्रक्रिया अवलंबिली जाते.

ग्राहकांच्या पाहणीनुसार कृषी मालाची निर्मिती करणे म्हणजे मल्टी-क्रायटेरिया मॅपिंगच्या अहवालानुसार अन्नधान्य, फळे, पालेभाज्या, औषधी वनस्पतींची उत्पादने घ्यावी लागतात. हा अहवाल एका सॉफ्टवेअरद्वारे ग्राहकांच्या अभिरुचीची नोंद घेतो आणि त्याप्रमाणे शेतमालाची लागवड होते. मागणी-पुरवठय़ाच्या संतुलनामुळे शेतकऱयाला योग्य किंमत मिळू शकते. रस्त्यावर शेतमाल फेकून देण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी शेतकऱयाला ऍग्रीप्रेन्युअर व्हावे लागते. डिमांड मॅपिंगच्या आधारावर पुरवठा साखळीचे नियोजन करून मूल्यवर्धित प्रक्रिया हाताळावी लागते. शेतमालाच्या उत्पादनाला काही कालावधी लागत असल्याने भविष्यातील मागणीचे प्रारुप (मॅपिंग) अथवा फोरकास्टिंग करावे लागते. बाजारपेठेत कृषिमालाचे फ्लडिंग होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. देशी आणि विदेशातील बाजारपेठांच्या वैशिष्टय़ांचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. त्यानुसार शेतमालाच्या लागवडीचे निर्णय घ्यावे लागतात. बऱयाच वेळा शेतकऱयाला हे जमत नाही म्हणून तो मध्यस्थाकडे सर्व काही सोपवून मोकळा होतो. त्यामुळे मध्यस्थांचे फावते आणि मध्यस्थच मोठा होतो. नाफेडने खरेदी केलेला शेतमाल कवडीमोलाला विकला जात नाही. तो नेहमी नफ्यातच व्यवहार होतो. हे नाफेडच्या वार्षिक अहवालाने लक्षात येते. अन्न व्यवहारांचा ताळेबंदी 1936 पासून अस्तित्वात आहे. लीग ऑफ नेशन्सने पोषणमूल्याची गरज आणि त्याच्या पुरवठय़ाचे गणित प्रथमत: मांडलेले होते. म्हणजे माणूस, जनावर आणि इतर जीवित प्राण्यांच्या उपभोगातील पोषणमूल्ये प्रथमत: पहावी लागतात. त्यानंतर त्याचा प्रचार, जाहिरातबाजी, प्रबोधन करून शेतमालाला मागणी वाढवून घेतली जाते. उदा. बेदाणे व मनुका यांची मागणी ड्रायप्रूट कंटेन्टमुळे वाढली. काही देशांमध्ये हळद अद्यापही वापरली जात नाही. अशा अनेक शेतमाल व प्रक्रिया मालाला मागणी शून्य आहे. कारण त्या वस्तूंच्या उपभोगाचे अज्ञान प्रखर आहे. कोविडच्या निमित्ताने हे सर्व लोकांना ज्ञात होत आहे. शेतमालाच्या विशिष्ट प्रमाणातील आणि संतुलित सेवनामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते अथवा दूध धंद्यामध्ये दुधाची गुणवत्ता व उत्पादन अधिक होण्यासाठी हिरवा चारा, वाळलेला चारा, खुराक आणि आरोग्य यंत्रणेचा वापर होतो. त्या पद्धतीने कृषी मालाचे उत्पादन व विक्री व्यवहारात सुलभता येते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्न व शेती संस्था अशा प्रकारच्या ताळेबंदावर काम करते. प्रत्येक देशासाठी अन्नाचा ताळेबंद तयार केला जातो. तो शेतकऱयांनी पहावा. विशेषत: निर्यात करणाऱया शेतकऱयांनी तो पहावा. तसेच देशाच्या विविध भागांसाठीचा ताळेबंद प्रत्येक देशाने बनविला पाहिजे. म्हणजे शेतमालाचे व्यवहार, व्यापार आणि विक्री व्यवस्था सुलभ होऊन शेतकऱयाला योग्य दाम मिळू शकतो. सध्या शेतकरी माल विकेपर्यंत टेन्शनमध्ये असतो. माल पाठवताना तो नेहमी साशंक राहतो. योग्य दर मिळणे हा तो नशिबाचा भाग समजतो. ही अनियमितता टाळण्यासाठी ऍग्रीप्रेन्युअर होऊन ग्राहकांचे वर्गीकरण, भौगोलिक वर्गीकरण, डिमांड मॅपिंग, सप्लाय संधी आणि प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री यंत्रणेचा शिस्तबद्ध अभ्यास आवश्यक असतो. यालाच आपण अन्न व्यवहारांचा ताळेबंद म्हणतो. सध्या पुरवठाप्रणीत पद्धतीचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे ठरावीक काळात अन्न पुरवठय़ाचे स्वरुप वेळोवेळी मांडले जाते. पण मागणीप्रणीत अन्नाचा आलेख ढोबळ स्वरुपाचा असतो. मानवी शरीराला दररोज 450 ग्रॅ. अन्नधान्य, 250 ग्रॅ. फळे, 120 ग्रॅ. पालेभाज्या, 250 ग्रॅ. दूध इत्यादीची ढोबळपणे गरज असते. त्या हिशेबाने अनेक मालाच्या मागणीचे गणित मांडून, कोणत्या हंगामात, कोणते पीक घ्यावे, त्याचे प्रमाण किती असावे, धोका-अनिश्चितता कशी कमी करता येईल या संबंधीचा डेटा बेस तयार करावा लागतो. तो खूप मर्यादित स्वरुपात आहे. कार्पोरेट कौशल्ये असणारे हे करू शकतात. त्यानुसार ते डावपेचदेखील आखत असतात.

वयोगटानुसार लोकसंख्येच्या मागणीचा ताळेबंद तयार होऊ शकतो. आरोग्य आणि आजारपणाचादेखील विचार यामध्ये होतो. तसेच काही सवयी, परंपरा, दृष्टीकोन आणि पालकांची इच्छा यांचा संयुक्त आणि एकात्मिक विचार करता येतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मुलींना दूध प्यायला कमी मिळते. (अपवाद असू शकतात). याउलट पंजाब-हरियाणामध्ये मुलींना दूध दिलेच जाते. अशा काही गोष्टींचा/बाबींचा मॅपिंग बनवून त्यादृष्टीने उत्पादनाचा आलेख बनविता आला पाहिजे. यालाच आपण फूड बॅलन्स शीट म्हणतो. या प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक म्हणजे डेटा बेस कसा बनवायचा? यासाठी आयसीटी तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. मल्टी क्रायटेरिया मॅपिंगच्या सॉफ्टवेअरने डेटा बेस बनविणाऱया अनेक कंपन्या आहेत किंवा कंपन्यांची स्वत:ची यंत्रणा आहे. त्यांच्याकडून पाहणी करून आपल्या अन्न उत्पादनाचे गणित तयार करता येते. यामध्ये अचूकपणा कमी असला तरी ढोबळ दृष्टिकोन तयार होतो. खासगी कंपन्या याबाबतीत खूप तत्पर असतात.हळद, तंबाखू, ऊस या शेतमालावर प्रक्रिया करणाऱया खासगी कंपन्यांमार्फत सदर पिकांच्या लागवडीचा खासगी सर्व्हे होतो. त्यावरून त्यांचा ताळेबंद तयार होतो. माल किती साठवून ठेवता येतो, यासंबंधीचा व्यावहारिक दृष्टिकोन कंपन्या तयार करतात. तसा शेतकरी कोणतेही नियोजन करीत नाही. त्यामुळे पुरवठय़ावर नियंत्रण रहात नाही. परिणामी किमती पडतात आणि शेतकरी अस्वस्थ होतो. याचा फायदा अनेक राजकारण्यांना होतो, तसा संघटनांनाही होतो. प्रश्न न सोडविता तो सतत भिजत-अनुत्तरीत ठेवायचा म्हणजे पुढारीपण सोपे होते. हे दुष्टचक्र संपविण्यासाठी नव्याने अभ्यासू आणि कार्यतत्पर युवक/युवती कृषी क्षेत्राकडे आकृष्ट झाले पाहिजेत. ते स्वत: शेतकरी न बनता ऍग्रीप्रेन्युअर बनले पाहिजेत. तरच कृषी क्षेत्राचे दारिद्रय़ संपणार आहे. योग्य तंत्रज्ञान, योग्य व अचूक निदान आणि अभ्यास आणि विक्री व्यवस्था स्वत:कडे ठेवून नफा कमविता येतो. सध्या काही तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कंद, भाजीपाला व फळे, साखर व सायरप, ट्री-नट्स (बदाम, अक्रोड, काजू इ.), मांस, अंडी, मासे, दूध व चीज, उत्तेजक पेये (चहा, कॉफी, कोको), मसाल्याचे पदार्थ, वाईन व इतर पेये, तेल व फॅट, चरबी, आईस्क्रीम, बेबी फूड अशा अनेक शेतमालाचे व प्रक्रिया केलेल्या शेतमालाचे फूड बॅलन्सशीट तयार केले जाते. याचा जागतिक व देशी अभ्यास शेतकऱयांनी केला पाहिजे. या शेतमालाचे उत्पादन, साठवणूक, प्रक्रिया, उद्योगासाठीचा कोटा, आयात व निर्यात, पशुखाद्य, बियाणे, नाश होण्याचे प्रमाण यासंबंधीचा ताळेबंद तयार केला पाहिजे. अन्न व्यवहाराचा ताळेबंद तयार करण्याच्या चार पद्धती अस्तित्वात आहेत. पहिल्या प्रकारात बियाणे, पशुखाद्य आणि औद्योगिक वापरानंतर शिल्लक राहणारा (उपभोगासाठी) अन्नसाठा, त्यावरील प्रक्रिया म्हणजे पीठ, डाळ तयार करणे आणि शेवटी ग्राहकांच्या उपभोगासाठी येणाऱया शेतमालाचा समावेश होतो. दुसऱया प्रकारात इनपूट-आऊटपूटच्या सर्व घटकांचा समावेश होतो. म्हणजे शेती उत्पादनावर कारखानदारी वस्तू बनविणाऱया घटकांचा समावेश होतो. (उदा. साखर) यांचा समावेश होतो. तिसऱया नमुन्यात प्रमाणीकरणप्रणीत व्यापारी वस्तू, कारखानदारी वस्तू (उदा. साबण) यांचा समावेश होतो. चौथ्या नमुन्यामध्ये देशनिहाय/राज्यनिहाय उत्पादन, स्थानिक वापर आणि विक्रीयोग्य शेतमालाचा उल्लेख असतो. उत्पादन, साठा, वापर, वाया जाणारा माल आणि त्यातील कॅलरिज, फॅट, मिनरल, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रोटिन इत्यादी घटकांच्यादेखील त्यामध्ये नोंदी केलेल्या असतात.

डॉ. वसंतराव जुगळे : 9422040684

Related Stories

माझा मित्र

Omkar B

अभिवादन: अष्टपैलू महिला अधिकाऱयाला

Patil_p

आजोबांच्या आठवणी

Patil_p

सखुबाई आणि डॉक्टर

Patil_p

जाम्बवत क्षोभला भार

Patil_p

हॉकीचा बलभीम

Patil_p
error: Content is protected !!