तरुण भारत

ग्लोबल टीचर रणजितसिंह

आपल्या देशाने एवढे चारित्र्य व कर्तृत्वसंपन्न शिक्षक पाहिले आहेत की, या गुरूपरंपरेचा प्रवास राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचला आहे. डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यासारख्या देशाचे राष्ट्रपतीपद भूषविलेल्या व्यक्ती या पूर्वाश्रमी शिक्षकच होत्या. या परंपरेचा सन्मान जागतिक पटलावर नेणारी घटना गुरुवारी घडली. युनेस्को आणि वार्की फौंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱया मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार 7 कोटी रू.चा असून, ते मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय आहेत. हा बहुमान केवळ एका व्यक्तीचा नसून समाज घडवण्यासाठी तळमळीने धडपडणाऱया या देशातील समस्त गुरुंचा मानला पाहिजे. शिक्षणक्षेत्रावर मध्यंतरीच्या काळामध्ये मळभ आल्यासारखी परिस्थिती होती. शिक्षकांचे समाजातील स्थानदेखील डळमळीत झाले. शिक्षकांकडे आदराने पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. प्रगत, सुसंस्कृत व कणखर समाज कसा उभा राहील, अशी साशंकता वाटू लागली. अशा नैराश्यजनक व प्रतिकूल परिस्थितीच्या काळात रणजितसिंह डिसलेंसारखे ध्येयवादी शिक्षक नेटाने अविश्रांत समाज उभारणीचे कार्य करीत होते. त्याचीच फलश्रुती म्हणजे डिसले यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतली गेलेली दखल. जगभरातील 140 देशातील 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली, हे विशेष. डिसले यांनी सर्वप्रथम शालेय पुस्तकांना क्युआर कोडची जोड देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या. मुलांचे शिक्षण हसते खेळते करून त्यांच्यात शाळेची आवड निर्माण केली. क्युआरकोडच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात त्यांनी अभिनव क्रांती केली. तब्बल 83 देशातील विद्यार्थ्यांना सध्या ते डिजिटल प्लॅटफॉर्मवरून शैक्षणिक धडे देतात. दुसऱया भाषेत ते ‘जगद्गुरू’ झाले. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर, ‘वर्ल्ड इज माय क्लासरूम’ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणली. डिसले यांचा हा प्रवास सहज सुगम किंवा सोपा नव्हता. सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळी भागातील परितेवाडी हे एक छोटेसे खेडे. या गावात एका जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक म्हणून रूजू झाले. शाळेत पाय ठेवताच त्यांना धक्काच बसला. कारण शाळेचा एकच वर्ग आणि या वर्गाचा वापर चक्क गोठा म्हणून होत होता.दुसरी धक्कादायक बाब म्हणजे परितेवाडीतील ग्रामस्थ या बाबतीत कमालीचे उदासीन. त्यांची याबाबत कोणतीही तक्रार नव्हती. कारण पालकांची मानसिकता अशी होती की, मुलांनी शेतात काम करावे आणि मुलींनी घर सांभाळून त्यांच्या बहीण-भावांची काळजी घ्यावी. अशैक्षणिकतेचा भयाण अंधार असलेल्या अशा पार्श्वभूमीवर गावात शिक्षणाबाबत जागृती करून शाळेमध्ये पटसंख्या वाढवण्याचे त्याचप्रमाणे गावातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे फार मोठे आव्हान डिसले यांच्यासमोर होते. सुरूवातीला त्यांचा दुपारपर्यंतचा वेळ शेतात, वाडय़ावस्त्यांवर जाऊन मुलांना शाळेसाठी गोळा करण्यात तसेच पालकांचे प्रबोधन करण्यात जात होता. परंतु त्यांनी चिकाटी सोडली नाही. शिक्षणाबाबत विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे मतपरिवर्तन करण्यात अखेर ते यशस्वी झाले. त्यांच्यात जागरूकता निर्माण केली. शिक्षणासाठी  त्यांची मानसिकता तयार केली. पाठय़पुस्तक सांगते तेवढेच खरे नाही तर त्यापलीकडेही त्याविषयाचे सर्वांगीण ज्ञान मिळण्यासाठी क्युआरकोडच्या तंत्राला त्यांनी सुरूवात केली. शाळेत वीज नव्हती. स्वखर्चाने त्यांनी लॅपटॉप खरेदी केला. करमणुकीच्या माध्यमातून सुरूवातीला मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्याचा परिणाम असा झाला की, 8-9 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर वर्ग पूर्ण भरला. अशा रीतीने ‘एक गाव’ शाळेसाठी तयार झाले. त्यांच्या धडपडीचे हे पहिले पाऊल होते. आज देशातील 60 लाखांहून अधिक विद्यार्थी क्युआरकोडचा वापर करीत आहेत. तसेच जगभरातील तब्बल 800 शाळातील विद्यार्थ्यांना ते सध्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहेत. एखादा शिक्षक किती महान विचार करू शकतो, हे पुरस्काराची रक्कम मिळाल्यानंतरच्या डिसले यांच्या कृतीतून दिसून आले. पुरस्काराची रक्कम तब्बल 7 कोटी. सामान्य माणूस नेहमीच सामान्यपणे विचार करतो. परंतु डिसले यांनी सर्व रक्कम समाजाच्या उत्कर्षासाठी वाटून टाकण्याचा निर्णय घेतला. कामाचा मोबदला म्हणून मला वेतन मिळते, हा त्यांचा विचार.  पुरस्काराची 50 टक्के रक्कम त्यांनी अंतिम फेरीतील आपल्या दहा सहकाऱयांमध्ये वाटून टाकली. त्यामुळे नऊ देशातील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. शिक्षणक्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱया आपल्या देशातील शिक्षकांसाठी तीस टक्के रक्कम दिली असून, उर्वरित वीस टक्के रक्कम ‘लेटस् क्रॉस द बॉर्डर’ या त्यांच्या नवीन प्रोजेक्टसाठी राखून ठेवली आहे. आपापसात कलह करणाऱया देशात पुढील काळात त्यांना शांती अपेक्षित आहे. भारत-पाकिस्तान, पॅलेस्टाईन-इस्राईल, इराक-इराण, अमेरिका-उत्तर कोरिया या देशांमधील आजचा एखादा विद्यार्थी कदाचित उद्याचा पंतप्रधान असू शकेल. या विचारांच्या अनुषंगाने त्यांनी या देशातील विद्यार्थ्यांना शांततामित्र बनवले आहे. आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने भविष्यात हे फार मोठे पाऊल असू शकते. ग्लोबल टीचर या ऑनलाईन पुरस्काराच्या सोहळय़ाच्या निमित्ताने युनेस्कोचे साहाय्यक महासंचालक यांनी डिसले यांचा गौरव करताना म्हटले आहे की, रणजीतसिंह यांच्यासारखे शिक्षक जगावरचे पर्यावरण बदलाचे संकट थोपवतील. शांतताप्रिय समाजाची निर्मिती करतील. भेदाभेद नाहीसा करतील. जेणेकरून आर्थिक वाढीला चालना मिळेल. डिसलेंसारख्या भारतीयावर जगाने टाकलेली ही जबाबदारी आणि विश्वास हा त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेपेक्षा मोठा आहे, हे निश्चित!

Related Stories

मित्रविंदेचा कृष्णाशी विवाह

Patil_p

राजकारण आणि विकासकारणाची गल्लत

Patil_p

वेळ ‘परीक्षा व मूल्यांकन’ पद्धतीत बदल करण्याची

Patil_p

कोरोना लक्षणरहितांचेच विलक्षण आव्हान

Patil_p

यौवनं धनसंपत्तिः… (सुवचने)

Omkar B

निवडिजे न्यायें पय पाणी

Patil_p
error: Content is protected !!