कणकवली शेतकरी संघात शेतकऱयांच्या सकाळपासून विक्रीसाठी रांगा
प्रतिनिधी / कणकवली:
शासनामार्फत यावर्षी भात खरेदी वेळेत सुरू करण्यात आल्याने भात विक्रीसाठी शेतकऱयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी सकाळपासूनच भात विक्रीसाठी भात घेऊन येत असल्याचे दिसत आहे. येथील खरेदी विक्री संघात शनिवारी भात घेऊन आलेल्या शेतकऱयांनी सकाळी 7 वा. पासूनच नंबर लावले होते.
कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने गेल्या आठवडय़ापासून भात खरेदीसाठी सुरूवात केली आहे. यावर्षी 1868 रुपये भाताला देण्यात आलेल्या हमीभावासोबतच 700 रुपये बोनस शासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे 2568 रुपये एवढा भाव प्रतिक्विंटल मिळणार आहे. तालुका खरेदी विक्री संघाने यावर्षी आठवडय़ाभरापूर्वी भात खरेदी सुरू केल्यानंतर पहिल्या टप्प्यातच आतापर्यंत 758 क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱयांचा प्रतिसाद पहाता यावर्षी भात खरेदी चांगल्याप्रकारे होण्याची शक्यता दिसत आहे. यावर्षी कनेडी व फोंडाघाट येथेही भात खरेदी सुरू करण्यात आली आहे.
भात खरेदी वेळेत सुरू करण्यात आल्याने शेतकरी खासगीरित्या भात विकत नाहीत. परिणामी शेतकऱयांनाही चार पैसे मिळत आहेत. तसेच या भात खरेदीमध्ये शेतकऱयांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.